फॉक्सकॉनचा 2 लाख कोटींचा प्रकल्प अखेरच्या क्षणी महाराष्ट्रातून गुजरातला कसा गेला?

१० जुलै २०१५ चा दिवस होता. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर होते. तेवढ्यात मुंबईवरून एक फोन आला. फॉक्सकॉनचे सीईओ टेरी गोउ मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ही बातमी ऐकताच आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून फडणवीस तातडीने मुंबईकडे निघाले. 

१० जुलैच्या रात्रीच देवेंद्र फडणवीस आणि टेरी गोउ यांची मुंबई विमानतळा जवळच्या हॉटेल हयात रेजेन्सीमध्ये भेट झाली.

तिथं दोघांनी एकत्र जेवण घेतलं. दोघांत जवळपास तीन तास चर्चा झाली. फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेने टेरी गोउ इतके इंप्रेस झाले की त्यांनी त्यांचा पुढचा बंगलोर, हैद्राबाद इथला दौरा रद्द करण्यास सांगितलं आणि फॉक्सकॉनच्या सिनियर मॅनेजमेंटला त्यांनी तातडीनं शांघाईवरून मुंबईला बोलवून घेतलं.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ जुलैला टेरी गोउ यांनी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची पाहणी केली. त्याचबरोबर फॉक्सकॉनसाठी तळेगाव इथं महाराष्ट्र सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या जागेला देखील टेरी गोउ यांनी भेट दिली. 

फॉक्सकॉनचा सगळा कच्चा माल आणि त्यानंतर तयार प्रॉडक्ट यांची वाहतूक हवाई मार्गानेच होणार असल्याने विमानतळाचं लोकेशन महत्वाचं होतं.

त्यानंतर संध्याकाळाच्या जेवणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी टेरी गोउ यांना वर्षावर येण्याचं निमंत्रण दिलं.

याला डिनर डिप्लोमसी असं इंग्लिश नाव फॅन्सी वाटत असलं तरी माणसाच्या हृदयाची वाट त्याच्या पोटातून जाते हे भारतीयांना त्यातल्या त्यात आपल्या मराठी माणसाला फार पूर्वीपासून माहित आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे ओळखलं होतं आणि त्यांनी टेरी गोउ यांच्या पाहुणचाराची तशी व्यवस्था देखील केली. मुंबईतल्या चाईनीज दूतावासातून खास चायनीज शेफ त्यांनी मागवून घेतला.  टेरी गोउ यांच्यासाठी अस्सल ऑथेंटिक चायनीज जेवणाची सोय करण्यात आली होती. जसा भारतीय माणूस जगात कुठंही गेला तर त्याला भारतीय जेवण खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही तसंच चाईनीज माणसालाही घरापासून कितीही दूर असला तरी त्याचं जेवण त्याला पाहिजेच असतं.

असो वर्षा बंगल्यात करण्यात आलेल्या या पाहुणचाराने  टेरी गोउ चांगलेच खुश झाली.

ही डिनर डिप्लोमसी चालू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी गोउ यांनी गणपतीची एक मोठी मूर्ती भेट म्हणून दिली. गणपतीला चीनमध्ये योगाची देवता म्हटलं जातं आणि गोउ स्वतः रोज न चुकता योग करतात. त्यामुळे गणपतीची मूर्ती  गिफ्ट म्हणून दिल्यानंतर टेरी गोउ आता चेकळायचेच बाकी होते. त्यांनी अंगात डिनर ऍप्रॉन असतानाच तिथं उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांसमोर दोन तीन आसनं देखील करून दाखवली.

मात्र या डिनर डिप्लोमसीचं फळ मिळायला अजून एक महिनाभर वाट बघावी लागणार होती. ऑगस्टच्या सुरवातीला गोउ हे पुन्हा भारत भेटीवर आले आणि यावेळी त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर लागलीच ते गुजरातच्या दौऱ्यावर गेले. गुजरामध्ये जवळपास ते दोन दिवस थांबले.

त्याआधीच ४ ऑगस्टला फॉक्सकॉन आणि गौतम अदाणींचा अदानी एकत्र येऊन सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी एक जॉईंट व्हेंचर उभारणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळं मोदींची भेट, अदानी कनेक्शनच्या उठलेल्या वावड्या यामुळे हा प्रकल्प गुजरातलाच जाईल आणि देवेंद्र फडणवीस यांची डिनर डिप्लोमसी फेल होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यानंतर टेरी गोउ पुन्हा मुंबईत आले.

त्यांनी मुंबईमध्ये मोठमोठ्या बिझनेसमॅनची भेट घेतली. मुंबई आयटीआयटीला भेट दिल्यांनतरही टेरी गोउ इंप्रेस झाले. मात्र या यानंतर फडणवीस यांनी आपल्या डिनर डिप्लोमसीचा शेवटचा डाव खेळला. टेरी गोउ यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी दुपारचं जेवण केलं. 

आणि अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या पाहुणचाराला यश आलं आणि आठ ऑगस्टला फॉक्सकॉनने महाराष्ट्रात ५ बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा MOU साइन केला. सुरवातीच्या टप्यात ऍप्पलसाठी  ट्रान्झिस्टर आणि सेमीकंडक्टरची फॅक्टरी उभा करण्यात येणार होती आणि तळेगाव किंवा खोपोली या दोन जागांपैकी एका ठिकाणी ही गुंतवणूक करण्यात येणार होती. जर ही गुंतवणूक झाली असती तर ती महाराष्ट्राच्या इतिहासातील ती सगळ्यात मोठी परकीय गुंतवणूक ठरणार होती.

एक अक्खी सेमीकंडक्टर इंडस्ट्रीची इकोसिस्टिम महाराष्ट्रात उभी राहिली असती. बंगलोरनंतर खरी एक दुसरी सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्रात उभी राहण्याची शक्यता होती. जेव्हा टेरी गोउ आणि देवेंद्र फडणवीस यांची मार्च महिन्यात फडणविस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चीन दौऱ्यावर असताना पहिल्यांदा भेट झाली होती. तेव्हा टेरी गोउ यांनी फडणवीसांशी झालेल्या चर्चत त्यांना दुसरं झेंगझाऊ बनवण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.  झेंगझाऊमध्ये फॉक्सकॉनची चीनमधील सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे आणि सगळ्यात जास्त आयफोन या शहरातच बनवले जातात.

त्यामुळे फॉक्सकॉनची गुंतवणूक महाराष्ट्रासाठी किती महत्वाची होती हे लक्षात येतं. मात्र हा गुंतवणुकीचा MOU पुढे सरकलाच नाही. २०१७ पर्यंत प्रयत्न झाले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

अखेर २०२० मध्ये तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ऍप्पल आणि फॉक्सकॉनच्या भांडणामुळे ही डील रद्द झाल्याचं जाहीर केलं आणि महाराष्ट्राचं एक सुवर्ण स्वप्न भंगलं.

मात्र हा तर अर्धाच पिक्चर होता. फॉक्सकॉनने पुन्हा एकदा भारतात येयेचं ठरवलं होतं.  महाराष्ट्र पुन्हा एकदा स्पर्धेत उतरणार होता.  राज्यात सिलिकॉन व्हॅली उभारण्याचं दिव्यस्वप्न पुन्हा एकदा दाखवण्यात येणार होतं मात्र महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा एकदा हारणंच लिहलं होतं.

आता फॉक्सकॉन फक्त आणि फक्त सेमीकंडक्टर आणि फॅब्रिकेशनचा कारखाना लावण्यासाठी जमीन शोधात होती.

यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याची संधीही चालून महाविकास आघाडीकडे चालून आली होती. त्यातच यावेळी फॉक्सकॉनशी डील करतेवेळी प्लेयरही वेगळे होते.

यातील सर्वात महत्वाचं नाव म्हणजे अनिल अग्रवाल.

अनिल अग्रवाल हे बलाढ्य वेदांता ग्रुपचे कर्ताधर्ता आहेत. आज २०० कोटी डॉलरची नेट वर्थ असलेले अनिल अग्रवाल फक्त जेवणाचा डबा आणि हांथरुन पांघरून घेऊन बिहारहून मुंबईला आले होते आणि सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईमध्ये त्यांनी किती प्रगती साधली हे आपल्या डोळ्यांसमोर आहे.

तर खनिज सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदांता ग्रुपने आता सेमीकंडक्टरच्या व्यवसायात उतरायचं ठरवलं होतं. त्यासाठी वेदांतची अवनस्ट्रेट (avanstrate ) हि कंपनीही स्थापन करण्यात आली होती. महाराष्ट्रानेही कंपनीला पायघड्या टाकण्यासाठी त्यांच्याशी बोलणी सुरु केली. याबाबत पहिल्या भेटीची नोंद मिळते ती २१ जानेवारी २०२२ची.

त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी अनिल अग्रवाल, अवनस्ट्रेटचे एमडी आकर्ष हेब्बर आणि वेदांताच्या डायरेक्टर प्रिया अग्रवाल यांच्याशी एक ऑनलाइन मीटिंग केली होती. या मीटिंगला प्रफुल्ल पटेल देखील होते.

आदित्य ठाकरे यांना भेटून आनंद झाला. ते सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब सारखे उद्योग महाराष्ट्रात विकसित करण्यासाठी आणि आणण्यासाठी खूप उत्कटतेने बोलले अशा आशयाचं ट्विट अनिल अग्रवाल यांनी या भेटींनंतर केलं होतं.

त्यानंतर भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगाला कलाटणी देऊ शकेल अशी एक डील अनाऊन्स झाली.

१५ फेब्रुवारीला २०२२ला अनिल अग्रवाल यांचा वेदांत समूह आणि  फॉक्सकॉन यांनी एकत्र येऊन एक जॉईंट व्हेंचर  कंपनी स्थापन करण्यासाठी करार केला. भारतात सेमीकंडक्टरच उत्पादन करण्याचं काम ही कंपनी करणार होती.

दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार  या कंपनीतील बहुतांश इक्विटी वेदांतकडे असेल तर फॉक्सकॉन मायनॉरिटी स्टेकहोल्डर असणार होती. वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल हे  कंपनीचे अध्यक्ष असतील असं ठरवण्यात आलं. त्यामुळे आता अनिल अग्रवाल हेच फॉक्सकॉनचा प्रकल्प आणण्यासाठी फोकल पॉईंट असणार होते. फेब्रुवारी महिन्यातच या कंपनीच्या एका टीमने तळेगावच्या जागेची पाहणी देखील केली होती

तिथे फॉक्सकॉणमध्ये सुध्दा लीडरशिप चेंज झाली होती. यंग लिउ हे फॉक्सकॉनचे टेरी गोऊ नंतर फॉक्सकॉनचे सीईओ झाले होते.

यंग लिउ जून महिन्यात भारत दौऱ्यावर आले त्यांनी सर्वप्रथम २३ जूनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर फॉक्सकॉन भारतात सेमीकंडक्टरच उत्पादन करण्यास उत्सुक असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती.

त्यानंतर २४ जूनला लगेचच लगेचच महाराष्ट्राचे तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी midc च्या अधिकाऱ्यांबरोबर यंग लिउ यांची भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

मात्र त्यानंतर सहाच दिवसांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकासआघाडी सरकार पडलं. आता वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉनचा प्रकल्प आणण्याची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारकडे होती.

याबाबत एक मोठी घोषणा झाली ती २६ जुलै २०२२ ला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता -फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राने  हि कंपनी राज्यात आणण्याची रेस जिंकल्याचाच बातम्या प्रसिद्ध झाल्या. कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि महत्वाचं म्हणजे गुजरातला मागे टाकत महाराष्ट्राने जवळपास एक लाख साठ हजार कोटींची गुंतवणूक मिळवल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती.

”वेदांताची तळेगाव पुणे येथे प्रस्तावित गुंतवणूक ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या व्हिजनला समर्पित आहे. आमचा विश्वास आहे की वेदांत आणि फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर उत्पादन कार्यासाठी महाराष्ट्र हा नैसर्गिक पर्याय आहे आणि राज्य सरकार पंतप्रधान आणि भारत सरकारचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे.”

अशी प्रतिक्रिया त्यादिवशी देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

इकडे महाराष्ट्र डील झाल्याच्या अविर्भावात असताना वेदांता मात्र अजूनही वाटाघाटींमध्ये गुंतलीच होती. त्यातच ५सप्टेंबर २०२२ला वेदांताचे अनिल अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नेहमीप्रमाणेच  माननीय पंत्रप्रधानांना भेटून खूप प्रेरणा मिळाली.  पंतप्रधानांबरोबर भारतासाठी ऊर्जा सुरक्षेबरोबर सेमीकंडक्टर उद्योगाबाबत चर्चा झाली. भारतात आणखी एक सिलिकॉन व्हॅली निर्माण करण्याचे स्वप्न फार दूर नाहीये.

मात्र प्रश्न हा होता की मोदींच्या भेटींनंतरही तळेगावच दुसरी सिलिकॉन व्हॅली राहणार का? 

याच उत्तर मिळालं अनिल अग्रवाल यांच्या कालच्या म्हणजेच १३ सप्टेंबरच्या ट्विट मध्ये. या ट्विटमध्येही भारतात दुसरी सिलिकॉन व्हॅली उभारण्याचा रेफरन्स होता मात्र लोकेशन ठरवण्यात आलं होतं गुजरात.

इतिहास घडतो आहे. मला हे सांगण्यात आनंद होतो आहे कि वेदांत-फॉक्सकॉनचा नवीन सेमीकंडक्टर प्लांट गुजरामध्ये स्थापित केला जाईल. वेदांताची ₹1.54 लाख कोटींची महत्त्वपूर्ण गुंतवणूक भारताची आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅलीच स्वप्नं  प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल.

महाराष्ट्राच्या हात तोंडाशी आलेल्या घास निसटला होता. एक लाख प्रत्यक्ष नोकऱ्या आणि अजून एक लाख अप्रत्यक्ष रोजगार महाराष्ट्रच्या हातातून निसटला होता. तळेगावचं पुण्याजवळचं अगदी मोक्याचं लोकेशन, स्किल वर्कर्सची असेलेली उपलब्धता, महाराष्ट्र सरकारने ऑफर केलेले इन्सेंटिव्हस याचा काहीसुद्धा उपयोग झाला नाही. असं सांगण्यात येत आहे की  गुजरातने महाराष्ट्रापेक्षा चांगली डील दिल्याने प्रोजेक्ट गुजरातला शिफ्ट झाला मात्र याची संपूर्ण माहिती अजूनही बाहेर आलेली नाहीये.

त्यामुळे जेव्हा याची माहिती बाहेर येइल तेव्हाच महाराष्ट्र नेमका कुठं मागं पडला हे कळेल.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.