पारसनाथ पर्वतावर नक्की कुणाचा हक्क ? जैनांचा कि आदिवासी समाजाचा ?

झारखंडच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पारसनाथ टेकडी चर्चेत आहे. जैन अनुयायांच्या भारतव्यापी आंदोलनातून हा मुद्दा समोर आला. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१९ मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेच्या कलम ३ नुसार, पारसनाथ पर्वताला इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून डेव्हलप करण्याचं घोषित केलं.

पारसनाथ हिल्स या अभयारण्यात श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्माचं पवित्र स्थळ आहे. हे तीर्थस्थळ जैनांसाठी आणि हिंदू धर्मीयांसाठी महत्वाचं असलं तरी पारसनाथ हे आदिवासी समाजासाठी तितकंच महत्वाचं आहे.  संथाल आदिवासी हे पारसनाथ पर्वतावरच्या मरंग बुरुला आपले पवित्र स्थान मानतात. म्हणून आता पारसनाथ पर्वतासाठी जैनांसोबतच आदिवासी समाज देखील समाज आक्रमक झालाय.

मागेच आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात असं म्हणत हा मोर्चा काढण्यात आलेला. संथालांनी मारंग बुरूचा मुद्दा उपस्थित केला.

पारसनाथ डोंगराला मरंग बुरू म्हणून घोषित करा अशी मागणी घेऊन आदिवासी समाज केंद्र आणि झारखंड सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

मरंग बुरु विरुद्ध सम्मेद शिखरजी असा संघर्ष पाहायला मिळतोय, बघूया संपूर्ण विषय काय आहे ?

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ५ तारखेला केंद्रीय पर्यावरण मत्री भुपेंद्र यादव यांना एक पत्र लिहीलं. त्या पत्रामध्ये पारसनाथ पर्वताचा इको-सेंसिटीव्ह झोनमध्ये केलेला समावेश रद्द करण्याची मागणी केली. याच पत्रात सोरेन यांनी म्हटलंय की, ‘या ठिकाणाला धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे.’

पण नेमकी अडचण अशी आहे कि, जैन समाजाचं आंदोलन सुरू आहे म्हणून सरकारने हा भाग धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करायचं ठरवलंय. म्हणजे हा भाग जैन समाजाच्या मागणीप्रमाणे जैन तीर्थक्षेत्र होणार. पण, जैन तीर्थक्षेत्र झाल्यास त्या भागात मांसाहार, मद्य हे असले प्रकार चालणार नाहीत आणि नेमकं आदिवासी बांधवांच्या परंपरांमध्ये प्राण्यांचा बळी देण्याला धार्मिक महत्व आहे. त्यांचा असा आरोप आहे कि आदिवासींचे प्रतीक हिसकावण्याचा प्रयत्न होतोय.  पारसनाथ पर्वत खासकरून संथाल समाजासाठी हा डोंगर राखीव ठेवण्यात आलाय. संथाल समाजाला डोंगरभागात धार्मिक विधी करण्याचा हक्क आणि अधिकार आहे असल्याची भूमिका संथाल समाजाची आहे.

म्हणून संथाल समाज धार्मिक भावना आणि हक्कांसाठी लढत समोर आला आहे.

हा संथाल समाज कोण आहे तर, हा दक्षिण आशियातील मुंडा वांशिक गट आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यातील संथाल हा सर्वात मोठा समाज आहे. ओडिशा, बिहार आणि आसाम या राज्यांमध्येही संथाल समाज आढळतो, या समाजाच्या संख्येवरून त्यांचं राजकीय महत्व देखील अधोरेखित होतं. 

संथालांनी मारंग बुरूचा मुद्दा उपस्थित केला तो असा आहे कि, आदिवासी समाजातील लोकांनी विशेषतः संथाल आदिवासींनी पारसनाथ पर्वताला मरंग बुरू म्हणून पुजल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. संथाल आदिवासी पारसनाथ पर्वताला प्राचीन काळापासून पवित्र स्थळ मानतात. या समजुतीनुसार आदिवासी समाजातील लोकं जैन समाजाला आव्हान देत पारसनाथ डोंगरावरील त्यांच्या हक्काचा दावा करतात.

साधरणपणे सध्याचा वाद दोन धर्मांमधील संघर्ष असल्याचं आपल्याला दिसतं पण हा विषय जेव्हा आपण झारखंडमधील आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थितीशी जोडून पाहतो तेव्हा त्यातून आदिवासींच्या अस्तित्वाचा लढा स्पष्टपणे दिसून येतो. झारखंडच्या निर्मितीला २२ वर्ष होऊन गेलीत मात्र आजही आदिवासी समाज इथे उपेक्षितच आहे.

या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग मिळू लागला आहे,

विशेष म्हणजे इथल्या राजकारणात अनेक आदिवासी नेते आहेत, जे विविध पक्षातून निवडून आलेले आहेत. या आदिवासी नेत्यांना अस्मितेच्या राजकारणात आदिवासी समाजाच्या चिन्हांचे कठोरपणे संरक्षण करावे लागते, कारण ही चिन्हेच त्यांचे राजकारण टिकविण्यास मदत करतात. 

आदिवासी समाजासाठी महत्वाचं प्रतीक असलेलं मरंग बुरु बद्दलची मागणी का होत आहे ?

आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेचे अध्यक्ष नरेश मुर्मू माध्यमांशी बोलतांना सांगतात कि, ‘मरंग’ म्हणजे सर्वात मोठा आणि ‘बुरू’ म्हणजे टेकडी. आदिवासी त्यांच्या देवतेला ‘मरंग बुरू’ असेही म्हणतात. पारसनाथ हे महसुली गावाचे नाव आहे. केंद्र सरकारच्या पत्रापासून वृत्तपत्रे आणि वाहिन्यांपर्यंत पारसनाथ किंवा सम्मेद शिखर जी यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र मरंग बुरू कुठे लिहिले नाही म्हणून आदिवासी समाज चिडला आहे असं ते सांगतात.

दुसरे म्हणजे ‘जैन धर्माचे लोक येथे पाहुणे म्हणून आले होते. आपण पाहुण्यांच्या घरी जातो, काही दिवस राहून परततो कि तिथेच घर बांधायला सुरुवात करतो ? हेच जैन समाजाने केलंय. जैन समाजातील लोकांनी सीएनटी कायद्याचे उल्लंघन करून एकूण ३६ धर्मशाळा व मंदिरे इथे बांधली आहेत. मग मंदिराचा १० किमीचा परिसर जैन धर्मीयांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सुरु आहे हे आदिवासी समाजावर अन्यायकारक, असे त्यांचे म्हणणे आहे.

आता यात संथाल आदिवासी समाजाची मागणी आहे कि, केंद्र सरकारने लेखी स्वरूपात संपूर्ण टेकडी मरंग बुरू म्हणून घोषित करावीत आणि आदिवासींच्या जमिनीवर बांधलेली बांधकामे पाडण्यात यावीत. या मागणीसोबतच आदिवासी हे हि स्पष्ट करतात कि, जैन समाजाच्या लोकांची तीर्थयात्रेसाठी येण्याची आम्हाला कोणतीही अडचण नाही. फक्त तुम्ही तुमचा अधिकार दाखवू नका असं आदिवासी समाजाचं म्हणण आहे.

तर येथील आदिवासी नेत्यांचं म्हणने आहे कि, ही टेकडी आदिवासींची आहे.  पारसनाथ पर्वत हा मरंग बुरू होता आणि राहील !

त्यामुळे आता पारसनाथ पर्वतावर नक्की कुणाचा हक्क ? जैनांचा कि आदिवासी समाजाचा ? हा प्रश्न निम्रान होतोय आणि याच प्रश्नामुळे दोन समाजात तेढ निर्माण होतेय.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.