वन चाईल्ड धोरणामुळं म्हातारा झालेला ड्रॅगन आता आता पोरं जन्माला घालायला लोन द्यायला लागलाय
जगात लोकसंख्या म्हटली की चीन आणि भारत या दोन देशांशी स्पर्धा कोणी करू शकतच नाही. चीन आणि भारत हे लोकसंख्येनं जगातील सगळ्यात मोठे देश. पण इथंही चीन भारताच्या पुढं. पण चीनचा लोकसंख्यावाढ थांबवण्याचा पॅटर्नच वेगळा.
वाढत्या लोकसंख्येवर मग चीननं उपाय शोधला होता ‘वन चाईल्ड’ पॉलिसीचा.
लग्न झालेल्या जोडप्यानं फक्त एकाच अपत्याला जन्म द्यायचा. चीनचं सरकार घरात किती पाळणे हालतात हे मोजयचं आणि एखाद्यानं दोनदा घुगऱ्या वाटल्या की त्याची रवानगी डायरेक्ट जेलमध्ये.चीनच्या या जहाल उपायाचा लवकरच परिणाम झाला. चीनचा लोकसंख्या वाढीचा रेट झपाट्यानं कमी झाला. पण या वन चाईल्ड धोरणाचा चीनचा लोकसंख्येवर फार दूरगामी परिणाम झाले. चीनच्या लोकसंख्येचं सरासरी वय खूप वाढू लागलं. सरासरी वय वाढतं म्हणजे लोकसंख्येत वृद्धांचं प्रमाण वाढतं.
या वन चाईल्ड पॉलिसीमुळं ड्रॅगन म्हातारा होतोय या टायटल खाली बातम्या जगभरातील वृत्तपत्रांत झळकू लागल्या.
चीनने लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी १९८० मध्ये वन चाइल्ड पॉलिसी लागू केली होती जी २०१६ पर्यंत लागू राहिली. चीनच्या सरकारनं वने चाईल्ड पॉलिसी थ्री चाईल्ड पर्यंत नेलीय. तरीही लोकसंख्या वाढ काई होईना. एकदा कमी मुलं जन्माला घालणं अंगवळणी पडल्यानंतर सरकार सांगतंय म्ह्णून मुलांची संख्या वाढवावी एवढी पण चीनची लोकसंख्या देशप्रेमी नाहीए.
संपूर्ण चीन जन्मदर घटण्याच्या समस्येला तोंड देत असला तरी चीनचे ईशान्येकडील तीन प्रांत – जिलिन, लिओनिंग आणि हेलोंगजियांग या समस्येने सर्वाधिक प्रभावित आहेत.
2010 च्या तुलनेत 2020 मध्ये चीनची लोकसंख्या 10.3% कमी झाली. या काळात जिलिनची लोकसंख्या १२.७% कमी झाली.
त्यातूनच या राज्यांनी आता वेगळीच शक्कल लढवलेय. चीनच्या ईशान्येकडील प्रांत जिलिनने लोकांनी लग्न करण्यास आणि मुलांना जन्म देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बँकांना “विवाहित जोडप्यांसाठी विवाह आणि जन्म ग्राहक कर्ज” देण्यास सांगितले आहे.
या बेबी लोन अंतर्गत, जोडप्यांना मूल होण्यासाठी 2 लाख युआन (सुमारे 23 लाख रुपये) पर्यंतचे बँक कर्ज मिळनाराय.
पण आता मुलं जन्मला घालणं हे शेळीपालन आणि वराहपालनसारखं नाहीए की बँकेनं कर्ज दिलं म्ह्णून वाढवला कळप हे बँकांना कोण सांगणार.
आता चीनची लोकसंख्या वाढीचा दर भारतात कमी होत असताना भारताचं काय चालू आहे ते एकदा बघूच?
सगळ्यात आधी टीएफआर ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. एकूण प्रजनन दर (TFR) म्हणजे एक स्त्री तिच्या आयुष्यात किती मुलांना जन्म देते.लोकसंख्यावाढ मोजण्यासाठी देशाचा टीएफआर किती आहे हे पाहण्यात येतं.
२.१ टीएफआर आयडियल मानला जातो. कारण याचा अर्थ होतो जेवढी लोकसंख्या आहे तेव्हडीच लोकसंख्या पुन्हा तयार होतेय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NHFS5) नुसार, भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 वर गेला आहे. देशातील टीएफआर २.१ च्या खाली गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. याचवेळी चीनचा एकूण प्रजनन दर आहे फक्त १.३. टीएफआर मधील या फरकामुळं आता भारत २०२५मध्ये चीनला मागे टाकून जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश होईल असं सांगण्यात येतंय.
बाकी आता लोण वाटून चीन भारताला पुन्हा फाईट देणार का हे येणाऱ्या काळातच कळेल.
Webtitle : Why a Chinese province is offering ‘baby loans’ to couples