९० च्या दशकातील एका घटनेमुळे अक्षय कुमार अजूनही कॅनडाचं नागरिकत्व बाळगून आहे

अभिनेता अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट काल ३ जूनला रिलीज झालाय. त्यावर अमित शहा, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत अशा अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिक्रिया देताना ‘हा चित्रपट नक्की पाहावा’ असं आवाहन केलंय. पण या चित्रपटावरून अक्षय कुमारचं जितकं कौतुक केलं जातंय त्यापेक्षा जास्त त्याला ट्रोल केलं गेलंय.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार एका शोमध्ये गेला होता तेव्हा त्याने पृथ्वीराज चौहान यांच्या इतिहासाबद्दल वक्तव्य केलं होतं… 

“शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये भारताच्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत एकही धडा नाहीये. दोन किंवा तीन पुस्तकांमध्ये एखादा पॅरेग्राफ तुम्हाला दिसेल. मात्र याच इतिहासामध्ये मुघलांबाबतचा उल्लेख जास्त केला जातो.” असं अक्षय कुमार म्हणाला होता. 

यानंतर नेटकऱ्यांनी अक्षयचा पिच्छाच केला. अक्षयचा अभ्यास कच्चा आहे, त्याने इतिहासाचे क्लास बंक केले असतील, असं म्हणत असतानाच विषय आला अक्षयच्या कॅनेडियन नागरिकत्वावर.

सातवीच्या इतिहासाच्या एनसीआरटी या पुस्तकामध्ये पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत दोन धडे आहेत. कॅनडा कुमार यांना प्रमोशनमधून वेळ मिळेल तेव्हा त्यांनी हे वाचायला पाहिजे… भारताचा इतिहास कॅनडाच्या इतिहासाच्या पुस्तकात कसा असणार?… कॅनडाच्या नागरिक असलेल्या आऊटसाईडर लोकांना काय माहित असणार भारताचा इतिहास… कॅनडाच्या लोकांनी अर्धवट ज्ञानाच्या जोरावर भारताच्या विषयावर बोलू नये” 

असं काय काय म्हणत लोकांनी अक्षयला त्याच्या नागरिकत्वावरून खूप ट्रोल केलं. 

तसं हे काही पहिल्यांदा नाहीये.. जशी संधी मिळेल तसं अक्षयला यामुद्द्यावर भरपूर सुनावलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून अशा ट्रोल्सना अक्षय सामोरं जातोय. त्याने कितीही देशभक्तीचे चित्रपट केले, तरी त्याच्या मागील ‘कॅनेडियन सिटीझन’ असा शिक्का जात नाही. जेव्हा-केव्हा निवडणूक येतात तेव्हा तर हा मुद्दा अजून प्रकर्षाने समोर येतो, कारण सगळे अभिनेता, अभिनेत्री वोटिंग करतात मात्र फक्त अक्षय कुमार करत नाही, कारण तो भारताचा नागरिक नाहीये.

म्हणूनच प्रश्न पडतो की, अक्षय कुमार भारतात राहतो, इथेच व्यवसाय करतो, त्याला भारताबद्दल खूप आत्मीयता आहे, असंही म्हणतो तरी त्याने कॅनेडाचं नागरिकत्व का घेतलं? 

तर याचं उत्तर आहे.. अक्षय कुमारचं अपयश आणि त्यातून त्याला आलेली निराशा. 

अक्षय कुमार सातवीमध्ये फेल झाला होता. जेव्हा त्याचे वडील त्याला याकारणाने मारत होते तेव्हाच त्याने सांगितलं होतं की, मला अभिनय करायचा आहे, अभ्यासात काही मन लागत नाही. त्यानंतर त्याने अभिनयाचं शिक्षण घेणं सुरु केलं. डान्स, मार्शल आर्ट्सचं भरपूर प्रशिक्षण घेतलं आणि याच जोरावर बॉलिवूडमध्ये ऍक्शन स्टार म्हणून एंट्री घेतली. 

त्याचा पहिला चित्रपट १९८७ मध्ये आला होता ज्यात त्याने मार्शल आर्ट्स प्रशिक्षक म्हणून भूमिका केली होती. मात्र मुख्य भूमिकेत तो दिसला १९९२ च्या दिदार चित्रपटामध्ये. 

याच ९० च्या दशकातील गोष्ट आहे. एकामागून एक चित्रपट अक्षय करत होता. मात्र त्याचे चित्रपट चालत नव्हते. अक्षय कुमारचे १४ चित्रपट लगातार फ्लॉप झाले होते. त्यानंतर अक्षय कुमारला चित्रपटांमध्ये आपण घ्यायला नको, कारण तो चालत नाहीये, अशा चर्चा प्रोड्युसर्समध्ये होत होत्या. 

अक्षय कुमारला याची भनक लागली होती. तो प्रचंड टेन्शनमध्ये आला होता. निराश झाला होता. काय करावं, काय नाही त्याला सुचत नव्हतं.. कदाचित अभिनय क्षेत्रात आपलं करिअर आता संपलं आहे, असं त्याला वाटू लागलं होतं. अशात आपल्याकडे प्लॅन बी रेडी असावा असं त्याला वाटलं. 

हाच प्लॅन बी त्याला कॅनडाच्या नागरिकत्वाकडे घेऊन गेला. 

अक्षय कुमारने २०१९ च्या एका मुलाखतीत स्वतः याबद्दल सांगितलंय. तो म्हणाला.. जेव्हा करियरला उतरती कळा लागली होती, तेव्हा त्याचा कॅनडामध्ये राहणारा एक जवळचा मित्र मदतीसाठी पुढे आला.  मित्राने त्याला कॅनडाला येण्याची कल्पना दिली. 

“तू टेन्शन घेऊ नको, कॅनडाला ये. इथे माझा बिजनेस आहे, त्यात आपण एकत्र काम करू” असं अक्षयच्या मित्राने त्याला सांगितलं. तो मित्रही भारतीय आहे पण तिथेच राहतो. मित्राच्या प्रस्तावानंतर मग अक्षयने प्रक्रिया सुरू केली, त्याने पासपोर्ट आणि इतर गोष्टी मिळवल्या. 

अशाप्रकारे तो कॅनडाचा नागरिक झाला कारण त्याला वाटलं होतं, त्याची बॉलिवूडमधील कारकीर्द संपली आहे. 

मात्र तेव्हाच चमत्कार झाल्यासारखी घटना घडली. अक्षयचा १५ वा चित्रपट हिट ठरला आणि त्याला खूप साऱ्या ऑफर्स आल्या. त्यात त्याची शिस्त आणि अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका करण्याची तयारी बघता डायरेक्टर्सची पहिली पसंत तो बनला. तेव्हापासून त्याच्या करियरने जो पिकअप घेतलाय तो अजूनही कायम आहे. 

मात्र यादरम्यान अक्षयच्या लक्षात आलंच नाही की,  त्याने त्याचा  पासपोर्ट बदलला नाहीये. आणि म्हणून आज तो मुद्दा त्याच्या ट्रोलिंगचा टॉप विषय ठरलाय. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान न केल्याने अक्षय कुमारच्या नागरिकत्वाची झपाटून  तपासणी झाली होती. निवडणुकीच्या काळात एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘बिगर राजकीय’ मुलाखत घेतल्यानंतर देखील हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यानंतर अक्षयने आपला पासपोर्ट बदलण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार अर्ज केला असल्याचं अक्षयने सांगितलं होतं. 

माझी बायको, मुलं भारतीय आहेत, मी टॅक्स देखील भरतो. तरी माझं ‘भारतीयत्व’ सिद्ध करण्यासाठी मला कागदपत्रांची आवश्यकता भासेल असं कधीच वाटलं नव्हतं, अशी खंत व्यक्त करत मला कोणालाही संधी द्यायची नाही आणि म्हणून मी पासपोर्ट बदलण्याचा अर्ज केला आहे, असं अक्षय म्हणाला होता. 

पण ते काम पूर्ण झालं आहे का? याबद्दल अक्षयने अजूनतरी घोषणा केलेली नाहीये. 

कॅनेडियन नागरिक असल्याच्या मुद्यावरून आजही त्याला ट्रोल केलं जात असल्याचं दिसतच असतं. सध्याचा त्याचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट भारतीय राजाचा गौरवशाली इतिहास दाखवणारा असला तरी तो ट्रोलिंगपासून वाचू शकला नाहीये…. 

इतके देशभक्तीचे चित्रपट करत असूनही, चॅरिटीला डोनेशनचं काम करत असूनही अक्षयला भारतीय असल्याचे पुरावे द्या, म्हणून ट्रोल करण्याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये सांगा.. 

 हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.