म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुराष्ट्र देशासाठी धोकादायक आहे असं म्हटलं होतं

बातम्या रोज बघत असाल, ऐकत असाल तर देशात काहीतरी बिघडलंय याचा अंदाज तुम्हाला पण आला असेल. नुसतं हिंदू-मुस्लिम एवढंच चाललंय. काश्मीर फाइल्स पिक्चरचे शो चालू असताना थेटरात पार कापाकापीच्या भाषा करण्यात आल्या. इतक्या दिवस गाय पट्ट्यांमध्ये  सारखा पाहायला मिळणारा धार्मिक वाद आता पूर्ण देशभर पसरल्याचं चित्र आहे. कर्नाटकला  तर दक्षिणेतील युपी म्हणण्याची वेळ आली आहे.

म्हणजे वादाची लिस्टच बघा की हिजाब, हलाल झटका नंतर मंदिराबाहेर मुस्लिम दुकानदारांना वस्तू विकण्यास मनाई असे अनेक वाद निर्माण करण्यात आले. त्या जेएनयूमधून तर आता पोरांची टाळकी फोडल्याचे फोटो व्हायरल होणं नवीन नाही राहिलंय.

देशाचा ‘अमृतकाळ’ चालू आहे असं सांगण्यात येतंय मात्र घडामोडी तर सगळ्या ‘राहूकाळ’मागं लागल्यासारख्या चालू आहेत. 

मंदिर वही बनायेंगेच्या नाऱ्यानंतर आता थेट हिंदुराष्ट्र बनवणं हेच ध्येय आहे असं धर्मपंचायतींच्या स्टेजवरनं छाती ठोकपणे सांगण्यात येऊ लागलं आहे. 

ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी

हम लाए हैं तूफान से
कश्ती निकाल के
इस देश को रखना
मेरे बच्चो संभाल के

असं म्हणत आपल्याला देश सांभाळण्याची जबाबदारी दिली होती त्यांना आजची परिस्तिथी बघून किती मनस्ताप झाला असता याचा तुम्हीच विचार करा. तरी अशा या कृत्यांची दाहकता या थोर माणसांनी आधीच ओळखून ठेवली होती. त्यामधलेच एक होते संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

आंबेडकरांनी हिंदुराष्ट्रासारख्या प्रकारांचा पहिल्यापासूनच कडकडून विरोध केला होता. 

देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याच्या प्रकल्पाला आज  बऱ्यापैकी यश मिळाल्याचं जाणकार मानतात. शिखरावर असलेला हिंदू राष्ट्रवाद हे त्याचेच द्योतक असल्याचं निरीक्षण त्यांच्याकडून नोंदवण्यात आलं आहे. भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचे स्वप्न आजच्या काळात वाढताना दिसत असलं तरी ते नवीन स्वप्न नाहीये.  

मुस्लिमांसाठी एक वेगळं स्वतंत्र राष्ट्र आणि हिंदू राष्ट्राची मागणी अगदी जुळ्या भावांप्रमाणे जन्माला आली होती.

 दोघांनी एकमेकांना त्याकाळात साथ दिली होती. हिंदू बहुसंख्य राजवटीची भीती दाखवून  पाकिस्तानची मागणी करण्यात आली होती आणि मुस्लिम अल्पसंख्यांची भीती दाखवून हिंदुराष्ट्राचे मागणी.

आणि याच काळात म्हणजेच १९४० मध्ये डॉ.आंबेडकरांनी  धर्मावर आधारित ‘पाकिस्तान’ च्या मागणीवर आपले विचार ‘पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन’ या पुस्तकात लिहले आहेत.

त्यांनी भारताला  हिंदुराष्ट्र बनवण्याच्या गंभीर धोक्याचा इशारा देताना म्हटले होते की,

 ” जर हिंदुराष्ट्र झाले तर या देशासाठी निःसंशयपणे मोठा धोका निर्माण होईल. हिंदू काहीही म्हणोत, हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला धोका आहे. हिंदुत्वावरील लोकशाही काही कामाची  नाहीये. हिंदू राज कोणत्याही परिस्थितीत थांबवले पाहिजे”

 सुमारे ८० वर्षांपूर्वी आंबेडकरांनी ज्या धोक्याचा इशारा दिला होता तो धोका आज देशापुढं आ वासून उभा आहे. 

पण प्रश्न मुळात हा आहे की आंबेडकरांनी हिंदू राष्ट्राला एवढा कडवा विरोध का केला होता?

तर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही हे कोणत्याही गोष्टीचे मूल्यमापन करण्याचा आंबेडकरांचा मुख्य निकष होते . या निकषात बसणारी कोणतीही विचारधारा, सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था अगदी आर्थिक व्यवस्थाही ते मानायला तयार नव्हते.

त्यांनी त्यांच्या  Annihilation of Caste या पुस्तकात त्यांची आदर्श समाजाची रूपरेषा या शब्दांत मांडली आहे.

 ‘माझा आदर्श हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित समाज आहे.मी इतर कोणत्याही समाजाची कल्पना करू शकत नाही’

आणि याच तत्त्वावर त्यांनी जगातल्या इतिहासातील सर्वात भारी संविधानांपैकी एक मानलं जाणारं  आपलं संविधान उभारलं होतं. आणि हिंदुराष्ट्राची कल्पना आंबेडकरांच्या आदर्श समाजाच्या आणि संविधानाच्या विरोधात जाते हे सत्य आहे.  याच कारणामुळे आंबेडकरांनी जातीभेद असू दे की धर्मभेद यांच्याविरोधात नेहमीच आवाज उठवला.

मात्र आज ८० वर्षांनंतरही आंबेकरांनी दिलेली ही वॉर्निंग आपण गांभीर्याने घेतलेली नाहीये ही शोकांतिका आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

1 Comment
  1. संजय says

    आबेडकर म्हणतात हिंदुराष्ट्र धोक्याची घंटा जास्त वेळ नाही लागणार मुस्लिम राष्ट्र होयला आणि आपले 2 तर त्यांच्या गोठयात 4 असतील आणि कापली जातील हिंदू जसे काश्मिरी पंडित कापली गेली

Leave A Reply

Your email address will not be published.