म्हणून ॲपल, सॅमसंग सारख्या कंपन्या मोबाइलसोबत चार्जर देणं बंद केलंय

ॲपल आयफोन संदर्भांत ब्राझीलमधून एक बातमी आलीये. ब्राझीलमध्ये चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर तिथल्या सरकारने बंदी घातलीये आणि सोबतच ॲपलला २० लाख डॉलर्सपेक्षा जास्त दंड  ठोठावण्यात आलाय. हा विषय सांगण्याचं कारण म्हणजे… याविषयावरून सगळ्यांना कधीना कधी पडलेला प्रश्न पुन्हा डोक्यात आला की ॲपल, सॅमसंग सारख्या कंपन्यांनी मोबाईल सोबत चार्जर देणं का बंद केलंय?

आज जेव्हा याचं उत्तर शोधु म्हटलं तेव्हा समजलं ॲपलने यासाठी अगदी सात्विक कारण सांगितलं आहे पण खरं तर यामागे मोठं गौडबंगाल आहे. काय आहे सगळं मॅटर? जाणून घेऊया…

मोबाइलसोबत चार्जर न देण्याची प्रथा सुरु केली ॲपल कंपनीनं. ॲपलने २०२० मध्ये पहिल्यांदा आयफोन 12 सिरीजमध्ये फोनसोबत चार्जर देणं बंद करण्याची घोषणा केली आणि त्यानंतरच्या सगळ्या सीरिजसाठी हा रुल लागू करण्यात आला. ॲपलनं असं करण्यामागे कारण सांगितलं…

पर्यावरणाचं रक्षण करणं.

कसं? तर मोबाईलसोबत चार्जर दिल्याने बॉक्सची साईज वाढते. त्यासाठी जास्त प्लास्टिक, कार्बन याचा वापर होतो आणि सॉलिड वेस्ट म्हणजेच घनकचरा वाढीस लागतो. तेव्हा जर चार्जर देणं बंद केलं तर बॉक्सची साईज कमी होईल आणि ॲपल कार्बनचा वापर कमी करेल. याने ॲपलच्या पर्यावरणाच्या रक्षणाचं उद्दीष्ट पूर्ण करण्याला हातभार लागेल, असं कंपनी म्हणाली होती.

मात्र मोबाईल घेतला तर चार्जर लागतंच, नाहीतर मोबाईलचा वापर कसा करणार? यावर ॲपलने असा युक्तिवाद केला होता की, दरवेळी चार्जरची गरज लागत नाही. एक चार्जर खूप वर्ष चालू शकतं. नवीन चार्जर मिळालं तर लोक जुनं चार्जर कचऱ्यात फेकतात. म्हणजे पुन्हा कचऱ्यात वाढ. तेव्हा चार्जर दिलं नाही तर ज्यांना चार्जर हवं आहे तेच चार्जर घेतील आणि याने देखील पर्यावरणाचं रक्षण होईल.

ॲपलच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. इको-फ्रेंडलीचा झेंडा हाती घेतलेल्यांना हे क्रांतिकारक पाऊल वाटलं होतं. पण खरं तर ॲपलने जे कारण सांगितलंय त्यामागे छुपी २ कारणं आहेत. 

पाहिलं कारण म्हणजे – रिसेलिंगमधून मिळणारा अधिकचा पैसा

कंपनीने मोबाइलसोबत चार्जर देणं बंद केलं आणि तेच चार्जर वेगळं विकणं सुरु केलं. त्यातही आयडिया अशी केली की ॲडाप्टर आणि केबल दोन्ही वेगळं विकणं सुरु केलं. यामुळे काय झालं तर कंपनीला चार्जरचे वेगळे पैसे मिळू लागले. म्हणजे ॲपलचं 20 W चं ॲडाप्टर जवळपास १९०० रुपयांना मिळतं तर त्याची केबल १८०० रुपयांपर्यंत मिळते. अशाप्रकारे एका चार्जरची किंमत झाली ३७०० रुपये.

लाखाचा आयफोन घेणारे लोक ३-४ हजारांना बघणार नाही, अशी ॲपलची स्ट्रॅटेजी आहे. पण इथे एक लूपहोल हा राहत होता की जर कुणाकडे जुनं चार्जर असेल तर ते नवं घेणार नाहीत. तेव्हा कंपनीने अजून एक शक्कल लढवली. त्यांनी चार्जरचा टाईप बदलला. ॲपलच्या चार्जरला लायनिंग येतात बघा. त्यामुळे हे चार्जर इतर कोणत्याच फोनच्या कामी येत नाही किंवा दुसरे सी-टाईप चार्जर ॲपल फोनला चालत नाही. यामुळे लोकांना वेगळं चार्जर घेणं भागच पडतं.

यातला दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याकडे अनेकदा महागडे फोन सेकंडहँड घेण्याची प्रथा आहे. पण मोबाइलसोबतच चार्जर न मिळाल्याने काय होतं… लोक सेकंडहॅन्ड फोन घेणं टाळतात आणि थोडे पैसे जास्त देऊन नवीनच मोबाईल घेऊ म्हणतात. अशाने या कंपन्यांची फोनची सेलिंग वाढीस लागते.

पण हीच रिसेलिंग स्ट्रॅटेजी या कंपन्यांचं पर्यावरण रक्षणाचं उद्दिष्ट उघडं पाडतेय.

कारण नवीन पॅकेजिंगसाठी जास्त प्लास्टिक, कार्बन याचा वापर होतो. त्यात ते सेफली देण्यासाठी पॅकेजिंगची साईज वाढवलेली तुम्हाला देखील जाणवली असेल. जुन्या चार्जरसोबत असलेल्या पॅकेजिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या तुलनेत वेगवेगळ्या पॅकेजिंगसाठी जवळपास तिप्पट जास्त प्लास्टिक, कार्बन लागतं. यामुळे नव्याने चार्जर, केबल विकणं अजून जास्त कचरा तयार करतंय.

म्हणजे त्यांचं कारण टोटली झिरो आहे. 

याव्यतिरिक्त चार्जर न देण्याचं दुसरं छुपं कारण म्हणजे – कंपनीच्या वायरलेस प्रोडक्ट्सला प्रोत्साहन देणं.

ॲपलने त्यांच्या काही मोबाईलसाठी आता मॅग्नेट असलेले चार्जर ‘फास्ट चार्जर’ म्हणून देणं सुरु केलं आहे. हळूहळू कंपनीला वायरलेस चार्जर सगळ्या सीरिजसाठी लागू करायचे असून वायरवाले चार्जर बंद करायचे आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ही तीच स्ट्रॅटेजी आहे जी ॲपलने २०१६ मध्ये वापरली होती.

२०१६ मध्ये ॲपलने सगळ्यात पहिले मोबाईल पॅकेजिंगमधून इअरफोन्स काढून टाकले होते. तेव्हा देखील पॅकेजिंग कमी करण्याचं कारण दिलं होतं आणि कंपनीने एअरपॉड्स लॉन्च केले होते. हळूहळू आयफोनला असलेले हेडफोनचे जॅकसुद्धा काढून टाकले म्हणजे लोकांना एअरपॉड्स आता घ्यावेच लागतात. हेच आता ॲपल चार्जरसाठी करू शकतं.

असा हा सगळा ॲपलचा गौडबंगाल आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार,ॲपलने इन-बॉक्स चार्जर न दिल्याने ६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त प्रॉफिट कमावला आहे.

बाकीच्या मोबाईल कंपन्यांबद्दल सांगायचं तर जेव्हा ॲपलने हेडफोन आणि चार्जर देणं बंद केलं होतं तेव्हा सॅमसंग, वनप्लस सारख्या कंपन्यांनी ॲपलची थट्टा उडवली होती आणि स्वतःच्या मोबाईलची ॲडव्हर्टाइज करताना चार्जर हमखास ‘फ्री’ म्हणून दाखवलं होतं. मात्र नंतर जेव्हा ॲपलची खरी स्ट्रॅटेजी त्यांना समजली तेव्हा हळूच सॅमसंग गॅलेक्सी S 21 ने देखील चार्जर आणि हेडफोन न देण्याचं जाहीर केलं.

आता तर हळूहळू इतर कंपन्या देखील याच मार्गाने अधिकचा पैसा कमवायच्या फिरातीत दिसतायेत आणि कारण सांगतायेत – तेच पर्यावरणाचं रक्षण.

मात्र खरंच पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर या कंपन्या काय करू शकतात? याबद्दल तज्ज्ञांचं म्हणणंय की मोबाइलसोबत चार्जर देणं बंद करण्यापेक्षा ते इम्प्रूव्ह करणं जास्त इको-फ्रेंडली राहील. चांगल्या मटेरियलचा वापर करून चार्जरची साईज छोटी करून नव्या छोट्या पॅकेजिंगमध्ये बसेल असं चार्जर तयार करता येऊ शकतं. पण कंपन्यांचं खरं उद्दिष्ट बिजनेस करणं आहे, म्हणून त्या या उपायाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतोय, असं तज्ज्ञ सांगतात. 

तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा.

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.