साऊथ मुंबईत रिक्षाला बंदी का आहे माहिताय का..? ही आहेत कारणं…
तुम्ही मुंबईचे का? असं विचारल्यावर, साऊथ मुंबईवाले,
“नाही, आम्ही साऊथ मुंबईचे”
असं तोऱ्यात सांगतात. त्यांचा हा तोरा पुणेकरांना पण पुरून उरणारा असतो.
पण प्रश्न असा पडतो, की एरवी ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरवणारी मुंबई ह्या बाबतीत अशी विभागलेली का?
मुंबई – साऊथ मुंबईत असा काय फरक आहे आणि हा फरक ओळखायचा कसा?
आता समजा तुम्ही अख्खी मुंबई पालथी घालत असाल तर काही ठराविक परिसरांमध्ये तुम्हाला अचानक छोट्या गल्ल्या, मोठे टावर, मरणाच्या दारात उभ्या पण तरीही जिवंत असलेल्या चाळी, बापाच्या पैश्यावर उधळलेली बारकी पोरं आणि काळ्या पिवळ्या रंगाच्या टॅक्स्या दिसायला लागतात. तेव्हा समजायचं असतं तुम्ही साऊथ मुंबईत आलात.
साऊथ मुंबईकरांकडे एकवेळ स्वतःची गाडी नसेल पण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये त्यांना काली पिलीच लागते, रिक्षा त्यांना गरीब वाटते. एवढंच काय तर साऊथ मुंबईत रिक्षा थेट बॅनच केलेल्या आहेत.
पण त्यामागे, साऊथ मुंबईकरांना रिक्षा गरीब वाटते हे एवढंच कारण नाहीये, बरं.
आता साऊथ मुंबईत रिक्षा बॅन असण्यामागची कारणं काय बघूया.
मुंबई शहरातल्या सेंट्रल भागात सायन आणि वेस्टर्न भागातल्या बांद्रा ह्या स्टेशनांच्या अलीकडे म्हणजे दक्षिण भागात तुम्हाला ऑटो रिक्षा दिसत नाहीत. तिथे फक्त काली पिली म्हणजे टॅक्सी किंवा हल्लीच्या काळात ओला कॅब्सच फिरताना दिसतात.
ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे,
दक्षिण मुंबई (साऊथ मुंबई) हा मुंबईतला सगळ्यात जुना परिसर मानला जातो. जुना म्हणजे पार ब्रिटिशांच्या काळातलं बरचसं बांधकाम इथेच केलं गेलं जे आजही आपल्याला पाहायला मिळतं. दक्षिण मुंबईतल्या जुन्या दगडी इमारती ब्रिटिशांच्या काळाची साक्ष देत तिथे आजही उभ्या आहेत.
त्यामुळे दक्षिण भागातली मुंबई ही ब्रिटिशांच्या काळापासून अस्तित्वात होती तर मुंबईचा इतर भाग हा स्वातंत्र्य काळानंतर डेवलप होत गेला
आता मुंबई विभागली कशी गेली तर,
दक्षिण (साऊथ) मुंबईत, कुलाबा, चर्चगेट, परळ, फोर्ट, दादर, गिरगाव, नेव्ही नगर, वाळकेश्वर, वरळी, मलबार हिल असे काही परिसर आहेत. तर मुंबईच्या पश्चिम (वेस्टर्न) भागात अंधेरी, वांद्रे, गोरेगाव, मालाड, जुहू, विले पार्ले, जोगेश्वरी हे भाग येतात. पूर्व (सेंट्रल) भागात मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, धारावी, सायन हे भाग तर नवी मुंबईत वाशी, घणसोली, बेलापूर, खारगर, मरोळ, जुईनगर असे काही भाग येतात.
ब्रिटिशांच्या काळात वसलेल्या मुंबईची म्हणजेच साऊथ मुंबईची बांधणी सुद्धा स्वातंत्र्यापूर्वीच केली गेली असल्यामुळे दक्षिण मुंबईतले रस्ते हे बऱ्यापैकी नॅरो (अरुंद) बांधलेले आहेत. त्यामुळे मुळातच हे रस्ते ट्रॅफिकसाठी बनलेले नाहीत. शिवाय फ्लाय ओव्हर्स किंवा मोठमोठे हाय वेज सुद्धा आपल्याला इथे क्वचित पाहायला मिळतात.
म्हणूनच, फ्लाय ओव्हर्स आणि हाय वेज नसल्यामुळे ह्या परिसरात प्रचंड ट्राफिक होण्याचं प्रमाण, शहरांच्या इतर भागांशी तुलना करता अधिक असतं.
तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जरी दक्षिण मुंबईत फिरायचं म्हटलं तरी तुमच्या असं लक्षात येईल, की इथे गाडी चालवणं तसं कॉम्प्लिकेटेड आहे. इकडले रस्ते फार छोट्या आकाराचे आहेत, बरेच ठिकाणी फक्त वन वेज आहेत, खूप ठिकाणी फक्त सिंगल साइड टर्निंग सिस्टम आहे.
आणि अशा ठिकाणी इतके नियम ऑटो रिक्षावाल्यांना पाळायला लावणं कठीणच होतं आणि हे गव्हरमेंटला माहीत होतं.
शिवाय काली पिली टॅक्सी आपलं वर्चस्व इथे टिकवून होतीच. त्यामुळे मुंबईची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता इथल्या रस्त्यांवर आणि ऑलरेडी असणाऱ्या ट्रॅफिकमध्ये आणखीन रिक्षाची भर टाकणं तेव्हा परवडण्यासारखं नव्हतं.
दुसरं महत्वाचं कारण हेच होतं ते म्हणजे,
मुंबईच्या काली पिलीला लय वाढीव इतिहास आणि लय वाढीव महत्व आहे. १९१० नंतरच्या काळात मुंबईमध्ये सार्वजनिक वापरासाठी गाड्यांना परवानगी दिली गेली आणि तेव्हापासूनच टॅक्सी सुरु झाली त्यामुळे मुंबईची काली पिली टॅक्सी ही मुंबईची शान मानली जायची, आणि आजही मानली जाते. महत्वाचं म्हणजे CSMT आणि मुंबई सेंट्रल ही दोन स्टेशनं ह्या टॅक्स्यांचे मोठे हब्स मानले जातात, त्यामुळे साहजिकच टॅक्सीचं भाडं थोडं वाढीव असतं.
आता त्यात कमी भाडं घेणाऱ्या रिक्षा इथे आणल्या तर ह्या टॅक्स्यांचा बाजार उठायला वेळ लागणार नाही आणि मुंबईच्या मोस्ट अडॅप्टेबल, ॲडजस्टेबल मिडल क्लास जनतेला टॅक्सीची सवय मोडून रिक्षाची सवय लावून घेणंही तसं फार काही अवघड नाही हे ओळखून टॅक्सी यूनियन्सनी तशी वेळच आत्तापर्यंत येऊ दिलेली नाहीये.
आता तिसरं कारण आहे ते मगाशी म्हटल्याप्रमाणे साऊथ मुंबईतल्या सो कॉल्ड हाय प्रोफाइल मेंटॅलिटीचं. म्हणजे सामान्य लोकांचा काय विषय नाय, पण पैसेवाल्या असामान्यांचा आहे.
वरळीपासून कुलाब्यापर्यंत कोणताही छोट्यातला छोटा किंवा मोठ्यातला मोठा रस्ता घ्या. रस्त्यावर एखादी तरी स्पोर्ट्स बाइक किंवा पॉश ब्रॅंडेड कार तुम्हाला गुरगुरताना दिसतेच दिसते. त्या पेडर रोडवर तर पार गाड्यांचं शो रूमच रस्त्यावर अवतरलेलं असतंय.
त्यात आपली तीन चाकी कुरकुरणारी नी एका साइडला कलंडणारी रिक्षा शोभून दिसत नाय असं आपलं त्यांचं म्हणणं.
त्यामुळे त्यांची ही रस्त्यावरची इमेज मेंटेन करायला, रिक्षाला सरकारने तिथे जायला बंदी घातलीय. आता आपली इमेज मेंटेन करण्याच्या नादात, पॉश कारमधल्या घुसमटणाऱ्या जीवांना हवेशीर रिक्षाची किंमत कधी लावता येणार नाय हे त्यांचंच दुर्दैव आहे ती वेगळी गोष्ट.
आजही ह्या बाबतीत काहीना काय लडतरी चालूच असतात. दर पाच एक वर्षांनी रिक्षावाले आणि टॅक्सीवाले समोरा समोर येऊन प्रोटेस्ट करत असतात. पण वेगळं असं काय घडत नाही आणि टॅक्सीवाले काय रिक्षावाल्यांना आपल्या हक्काचा हिस्सा बनू देत नाहीत.
हे ही वाच भिडू
- कधी विचार केलाय का टॅक्सीचा रंग काळा-पिवळा का असतो ?
- अहमदनगरच्या फिरोदियांनी एक नवीन वाहन तयार केलं, ज्याला आज आपण रिक्षा म्हणतो.