बांगलादेशचा नागीन डान्स कुणामुळं हुकला ?

तुम्हाला आठवत असेल २०१६ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश मॅच होती. बांगलादेशनं मॅच टप्प्यात आणली आणि हाणामारी करुन जिंकायच्या प्रयत्नात सनासन विकेट्स घालवल्या आणि बांगलादेश हरलं, प्लेअर्स आणि चाहत्यांच्या डोळ्यात पाणी.

या गोष्टीला ६ वर्ष झाली, पण परिस्थिती काय बदलली नाही. या वर्ल्डकपमध्येही भारताविरुद्धची मॅच बांगलादेशच्या टप्प्यात होती, पण बांगलादेशी बॅट्समन हाणामारी करायला लागले आणि विकेट जायला लागल्या, परिणाम काय तर बांग्लादेश ५ रन्सनं हरलं आणि सेमीफायनल गाठणं त्यांच्यासाठी अवघड झालं.

पण या मॅचमध्ये नेमकं काय झालं, डकवर्थ लुईस नियम काय असतो आणि बांगलादेशनं नेमकं काय चुकवलं तेच जाणून घेऊ.

दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मॅचमध्ये टॉस बांगलादेशनं जिंकला आणि भारताला पहिली बॅटिंग करावी लागली. ऍडलेडच्या मैदानावर ढगाळ वातावरण असल्यामुळं स्विंगिंग कंडिशन्समध्ये बॅटिंग करणं अवघड जाणार हे फिक्स होतं. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये राहुल आणि रोहितला स्विंगसमोर लेझीम खेळावी लागली. त्यात रोहितचा सोपा कॅच सोडणाऱ्या हसन मेहमूदनं आपल्याच बॉलिंगवर रोहितची विकेटही काढली. 

बांगलादेशी बॉलर्स फार जोरात टाकत नसले तरी बाऊन्स आणि स्विंगचा त्यांनी पुरेपूर वापर केला. त्यामुळंच पॉवरप्लेमध्ये भारताचा स्कोअर ३७ रन्स इतकाच होता. शाकिब अल हसननं टस्किन अहमदच्या चारही ओव्हर सलग संपवल्या. 

टस्किननं १५ रन्सच देत भारतीय बॅट्समनना खऱ्या अर्थानं जखडून ठेवलं, पण त्याला विकेट घेण्यात मात्र यश मिळालं नाही.

फॉर्म, टॅलेंट या सगळ्या गोष्टींवर प्रश्न उठवणाऱ्यांना केएल राहुलनं ३१ बॉलमध्ये फिफ्टी मारत खणखणीत उत्तर दिलं. मात्र या फिफ्टीचं मोठ्या इनिंगमध्ये रूपांतर करण्यात त्याला अपयश आलं. सूर्याचंही असंच काहीसं झालं, त्यानं १५ बॉलमध्ये ३० रन्स मारलेले, पण शाकिबनं सर्कलमधले फिल्डर्स वाढवत त्याच्यावर शॉट खेळण्याचं प्रेशर वाढवलं आणि सूर्या बोल्ड झाला.

मधल्या ६ ओव्हर्स कोहलीकडून एकही बाउंड्री आली नाही, पण आल्या तेव्हा सलग तीन आल्या. हार्दिक आणि स्कायच्या विकेटनंतर वाढलेलं प्रेशर कोहलीनं व्यवस्थित हॅन्डल केलं.

या मॅचमध्ये एक किस्सा झाला, हसन मेहमूदनं शॉर्ट बॉल टाकला आणि कोहलीनं शॉट मारल्या मारल्या नो बॉलचा इशारा केला. स्क्वेअर लेग अंपायरनंही लगेच नो बॉल दिला, यावरुन बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन चिडला.

पण हा नो बॉल देण्याचं कारण विराटचा इशारा नव्हता, तर एका ओव्हरमध्ये एकच खांद्याच्या वर जाणारा बॉल टाकू शकतो, तिथं मेहमूदनं दोन टाकले होते.

कोहली आणि ऍडलेड ओव्हल ग्राऊंडचं कनेक्शन सांगायला हवंच. कोहलीनं आपली पहिली टेस्ट सेंच्युरी याच ग्राउंडवर मारली, २०१४ मध्ये कोहलीच्या करिअरसाठी गेमचेन्जर ठरलेल्या एकाच टेस्टमधल्या दोन सेंच्युरीज याच ग्राउंडवर आल्या, याआधी इथं झालेल्या टी२० मध्ये विराटनं ५५ बॉलमध्ये ९० मारले होते, तर ३६ ऑलआऊटवाल्या टेस्टमध्येही विराटनं पहिल्या इनिंगला ७५ स्कोअर केला होता, आता याच ग्राउंडवर त्यानं पुन्हा एकदा ६४ रन्स मारत टीमला १८४ पर्यंत नेऊन ठेवलं.

या मॅचमध्ये पुन्हा एकदा कोहलीनं मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड मिळवलं.

डीके, अक्षर आणि हार्दिक यांनी विकेट्स अक्षरश: फेकल्या असताना आश्विननं दिलेलं ६ बॉल १३ रन्सचं योगदान महत्त्वाचं ठरलं. बांगलादेशकडून काही सोप्या चुका झाल्या, त्या म्हणजे पाचच बॉलर्स खेळवणं, तीन कॅचेस सोडणं आणि कोहलीला खूप वेळासाठी जखडून ठेवण्यात आलेलं अपयश. 

१८५ रन्सचा पाठलाग करताना लिटन दासनं बांगलादेशला खतरनाक स्टार्ट करुन दिला. अर्षदिपला ३ चव्वे, भुवीला एक सिक्स दोन फोर मारणाऱ्या लिटनचा कॅच किपर कार्तिककडून सुटलाही. पहिल्या ३ ओव्हर्समध्येच बांगलादेशचा स्कोअर ३० रन्स होता. 

लिटननं २१ बॉलमध्ये मारलेल्या टॉप क्लास फिफ्टीमुळं बांगलादेशला फ्लायिंग स्टार्ट मिळाला.

 पॉवरप्लेमध्ये भारताचा स्कोअर होता १ आऊट ३७ होता, तिथं बांगलादेशनं विकेट न गमावता ६० रन्स मारले होते. ७ ओव्हर्सनंतर पाऊस पडला आणि स्क्रीनवर दिसलं की डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेश १७ रन्सनं पुढं आहे.

आता डकवर्थ लुईस रुल काय आहे ? 

फ्रॅंक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन संख्याशास्त्रज्ञ मित्रांनी क्रिकेटला ही देण दिली. या गड्यांनी स्वतः हातात बॅट घेतली नाही, पण नियमाचा खोडा मात्र घालून ठेवला. आता डकवर्थ लुईसमध्ये कसं असतंय, मॅच सुरु असताना पावसाचा व्यत्यय आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमनं किती स्कोअर केलाय, किती विकेट्स आणि ओव्हर्स हातात आहेत या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि नवं टार्गेट दिलं जातं.

आता पाऊस पडला तेव्हा बांगलादेशचा स्कोअर ६६ होता आणि पार स्कोअर ४९.

हा पार स्कोअर ठरवण्यासाठी भारताचा स्कोअर गुणिले बांगलादेशकडे असलेली साधनं भागिले भारताकडे असलेली साधनं असा फॉर्म्युला असतोय.

डकवर्थ लुईसच्या कॉम्पुटराईज्ड फॉर्म्युलामध्ये जी साधनं वापरली जातात ती म्हणजे विकेट्स आणि ओव्हर्स. जर बांगलादेशची एक विकेट पडलेली असती तर पार स्कोअर ५३ असता आणि ३ विकेट्स पडल्या असत्या पार स्कोअर ६५. 

जशा ओव्हर्स कमी होतात, तसं हा फॉर्म्युला वापरुन टार्गेट कमी किंवा जास्त होतं.

पाऊस जास्त वेळ राहिला आणि त्यामुळं ओव्हर्स कमी झाल्या आणि डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला १६ ओव्हर्समध्ये १५१ रन्सचं टार्गेट मिळालं. साहजिकच ५४ बॉलमध्ये ८५ रन्स करायचे होते. पुन्हा पाऊस पडला तर डकवर्थ लुईसचं गणित कसं असेल, हे सुद्धा बांगलादेशला डोक्यात ठेवावं लागणार होतं. 

पण या ब्रेकनंतर बांगलादेशची सुरुवात खराब झाली केएल राहुलच्या परफेक्ट थ्रोमुळं लिटन दास रनआऊट झाला. शांतोनं स्कोअर पळवायचा ट्राय केला, पण तोही गंडला. अर्शदीप आणि हार्दिकनं दोन विकेट्स काढल्या आणि बांगलादेशचा स्कोअर ६ आऊट १०८ झाला. 

शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ३१ रन्स हवे असताना हार्दिकनं ११ रन्स दिले, त्यानं टाकलेले शेवटचे दोन डॉट बॉल मोठा फरक पाडणारे ठरले.

६ बॉलमध्ये २० रन्स डिफेन्ड करण्याची जबाबदारी रोहितनं अनुभवी शमी आणि भुवी ऐवजी अर्शदीप सिंगला दिली. पहिल्या बॉलला सिंगल आली, दुसरा बॉल नुरुल हसननं डायरेक्ट स्टँड्समध्ये मारत सिक्स ठेऊन दिला. तिसरा बॉल डॉट, चौथ्यावर सिंगल, टार्गेट २ बॉल ११. 

अर्शदीपनं दिलेल्या फुलरवर नुरुलनं चार मारला आणि मॅच आणखी खतरनाक झाली. पण शेवटच्या बॉलवर फक्त सिंगल आली आणि भारताचं सेमीफायनल गाठण्याचं मिशन सक्सेसफुल झालं.

खरंतर पाऊस पडल्यामुळं बांगलादेशचं टार्गेट तुलनेनं सोपं झालं होतं. कारण बॉल हातातून सटकत होता, आऊटफिल्डवर पळणं अवघड झालेलं, स्पिनरही प्रभावी ठरणार नव्हते आणि बॉलिंगसाठीही भारताकडे जास्त पर्याय नव्हते. पण या सगळ्याचा फायदा घेत मॅच डीप घेऊन जाण्याऐवजी बांगलादेशच्या बॅट्समननं हवेतून शॉट खेळायचा ट्राय केला, त्यांनी कव्वे उडवले आणि भारतीयांनी फिल्डिंगमध्ये काहीच चूक केली नाही.

 ब्रेकनंतर लिटन दासची एकाग्रता तुटली होती, पण बाकीच्यांनाही सेट होईपर्यंत थांबता आलं नाही आणि लिटन दासनं सोपी करुन दिलेली मॅच बांगलादेशनं अवघड करुन घालवली. 

अर्षदीप, हार्दिकनं फटके पडल्यावरही केलेला टिच्चून मारा आणि रोहित शर्मानं केलेली भारी कॅप्टनशिप या गोष्टी भारतासाठी प्लस ठरल्या. कोहली पुन्हा एकदा बादशहा ठरला आणि सूर्याही, फक्त आता हाच फॉर्म भारताला सेमीफायनलमध्येही कंटिन्यू ठेवावा लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.