बकार्डी दारूच्या लोगोवर वटवाघूळ का आहे..? प्रश्न साधाय पण उत्तर डिपाय…

कसय न भावांनो कुठल्या बाटलीवर कुठला प्राणी आहे यामुळे आपल्याला काय ठिस्स फरक पडत नाय. बाटलीच्या आतलं कस आहे यावर ठरत असतय. पण झालं अस की लॉकडाऊनच्या निमित्ताने मार्केटमध्ये ओल्ड मॉन्कचं शॉर्टेज आलय. मग ऑप्शन मिळाला तो बकार्डी ब्लॅकचा. आत्ता ही पण रम आणि ती पण रम. शिवाय आपल्या आयुष्यात गम. मग म्हटलं चला बकार्डी तर बकार्डी.

पहिले दोन पेग व्यवस्थित गेले. पण तिसऱ्या पेगला रोजचा बाबा दिसला नाही. तोच ओल्ड मॉन्कवरचा बाबा. त्या ठिकाणी दिसायला लागलं ते वटवाघुळ. भेंडी दारूच्या बाटलीवर कोण वटवाघुळ लावत काय?

विचार करत करत तंद्री लागली. या वटवाघळानं गेली दोन वर्ष जग बंद पाडलय. लय राग आलेला पण परत म्हटलं काहीच नाही तेव्हा हेच वटवाघुळ मदतीला आलय. 

पण दारूच्या बाटलीवर वटवाघुळ का छापलं असलं, चौथ्या पेगला एकटे असाल तर असले प्रश्न सुचतात. मग म्हटलं शोध घ्यावा. लय शोधलं.

मग म्हटलं लिहावं आणि लिहलं…

मुद्दा असाय बकार्डीच्या बाटलीवर वटवाघुळ का आहे, प्रश्न साधाय पण उत्तर डिपाय…

रमकडे जास्त लोकांचा ओढा जास्त असतो म्हणजे पिणार्याला आपण भारी दारू पितोय याचा फील घेता येतो आणि चार चौघात आपण जास्तच भाव खाताना दिसतो.

बकार्डीची स्थापना १८६२ साली फॅकुंडो बकार्डी नावाच्या भिडूने केली. क्युबा देशात त्याने पहिली डिस्टिलरी सुरु केली. ज्यावेळी हि डिस्टिलरी सुरु करण्यात आली तेव्हा तिथे अचानकपणे अनेक वटवाघळांचे थवे येऊन पोहचले म्हणे . छताला उलटे टांगलेले हे वटवाघूळ विचित्र दिसायचे.

बकार्डीची मालकीण अमालिया ज्यावेळी तिथे आली आणि तिची नजर जेव्हा छताकडे गेली ते दृश्य बघून ती दचकलीच. तिने अंदाज लावला कि हे वटवाघळं इथे का जमा झाले असतील तर डिस्टीलरीतल्या वासाने हे थवे इथे आले असावेत. हि वटवाघळं हाकलून लावण्याऐवजी त्याचा लोगो बनवण्याचा निर्णय घेतला.

आता त्यांच्या या निर्णयाला आपल्या लोकांनी तेव्हा बेक्कार शिव्या घातल्या असत्या पण त्यामागे त्यांनी सांगितलेलं लॉजिक जास्त महत्वाचं आहे.

हाच लोगो असण्यामागचं कारण

हा लोगो निवडण्यामागे एक दमदार कारण होतं कि, वटवाघूळ हा रम उद्योग क्षेत्रातला लोकांचा मित्र आहे. उसाच्या शेतातील कीटकांना ते पळवून लावतात आणि उसावर पडणारी कीड जी शेताला हानिकारक असते ती होऊ देत नाही.

दुसरं कारण म्हणजे लॅटिन संस्कृतीत वटवाघळांना चांगल्या भविष्याची सुवार्ता म्हणून बघितलं जातं. या कारणांमुळे त्यांनी हाच लोगो बनवण्याचा निर्धार केला.

बकार्डी दाम्पत्याचा हा निर्णय पुढे योग्य ठरला. क्युबा मधले लोक काय जास्त शिकलेले नव्हतं आणि त्यांना बकार्डी नावाबद्दल काही देणंघेणं नव्हतं. जेव्हा ते दुकानात रम घ्यायला जायचे तेव्हा बाटलीवरचा वटवाघूळ त्या लोकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचा. हि रम खरेदी करताना लोकांना वटवाघळामुळे सोपं जाऊ लागलं आणि हा ब्रँड सगळ्यांच्या ध्यानात राहू लागला.

आजही बकार्डी दर वर्षी २० करोडपेक्षा जास्त बाटल्यांची विक्रमी विक्री करते.

आजवरच्या १६० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात बकार्डीच्या लोगोत बरेच बारीकसारीक किरकोळ बदल झाले मात्र वटवाघूळ हे सगळ्यांच्या ओळखीचं चिन्ह म्हणून बदललं गेलं नाही. हा लोगो जवळपास प्रत्येकाला पाठ आहे.

असा आहे सगळा कारभार. बाकी ब्रेक द चेन च्या शुभेच्छा..

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.