लोकं मापं काढतात, बघत नाय म्हणतात, तरी ‘बिग बॉस’ हिट ठरतं ते या कारणांमुळं…

तुम्ही म्हणाल काय विषय आणलाय ? बिग बॉस ? आता त्याचं झालं असं की, ट्विटर उघडलं की एक तरी ट्रेंड बिगबॉसचा दिसतो. फेसबुकवर पण एक दोन व्हिडीओ दिसतात आणि त्याच्यावर लव्ह रिऍक्ट करणारी पोरं-पोरी पण ओळखीतलीच असतात. कट्ट्यावर पण लाजत लाजत विषय निघतो आणि कोण आवडतं याची चर्चा रंगते.

एवढं असूनही ‘हा बाबा बिगबॉस लई भारी कार्यक्रम आहे’ असं म्हणणारी फार माणसं काय सापडत नाहीत, उलट बिगबॉस बघता का ? असं विचारल्यावर शिव्याच बसतात.

पण तरीही प्रत्येकवर्षी बिगबॉस हिट ठरतं, टीआरपी मिळतो आणि खतरनाक चर्चाही होते. म्हणूनच डोक्यात आलं की एवढी मापं निघूनही बिग बॉस हिट कसं ठरतं ? त्यांना अशा नेमक्या कुठल्या स्कीमा सापडल्यात ? हे शोधावं.

बिग बॉस ही काय मेड इन इंडिया आयडिया नाही, नेदरलँडच्या बिग ब्रदर या असल्याच शोवरुन ही कन्सेप्ट इंडियन टेलिव्हिजननं उधारीवर घेतली. नोव्हेंबर २००६ मध्ये बिग बॉसचा पहिला सिझन भारतात ऑन एअर गेला. शिल्पा शेट्टीनं युकेमधलं बिग ब्रदर जिंकल्यावर लोकप्रियता अजून वाढली. सध्या सुरू असलेला हा बिग बॉसचा १६ वा सिझन आहे म्हणजे विचार करा.

आता काय काय अज्ञानात सुखी माणसं असतात ज्यांना बिग बॉस म्हणजे काय हे माहीत नसतं. त्यांच्यासाठी उजळणी करू, विषय असा असतो की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या १५-१६ जणांना एक लय मोठ्या बंगल्यात ३ महिने राहायचं असतं. या तीन महिन्यात फोन, इंटरनेट, टीव्ही यातलं काहीच वापरायचं नाही, त्या घराबाहेरच्या कुणाशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. वर घरातल्या घरात टास्क करायचे, यावरुन राडे, भांडणं होणार आणि हे सगळं टीव्हीवर लोकं चवीनं बघणार.

हे लोण एवढं पसरलं की, हिंदीसोबतच मराठी, कन्नडा, तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि बंगाली या भाषांमध्येही बिग बॉस आलं.

बरं एखादा सिझन भांडणं बघितली, मजा घेतली तरी होतंय की, पण नाय प्रत्येक सिझनचा प्रत्येक एपिसोड बघणारे कार्यकर्ते आहेत.

यांना बघूनच प्रश्न पडतो की बिग बॉसमध्ये असं आहे तरी काय ?

पहिला मुद्दा म्हणजे गॉसिप्स.

तोंडावर कितीही नाही म्हणा, गॉसिप्स ऐकणं सगळ्यांना आवडतंय. आता बिग बॉस वाले काय करतात, तर शोमधले दोन कार्यकर्ते तिसऱ्या कार्यकर्त्याबद्दल काय बोलत असले की मुद्दामून ते दाखवतात. आपण त्याच्यात इंटरेस्ट घेतोय आणि आपलं एक नॅरेशन सेट करतोय. मग कोण कुणाबद्दल काय बोलतंय, याच्यावर आपण खऱ्या आयुष्यातही गॉसिप करतो आणि ही रिक्षा गोल गोल फिरत राहते.

गॉसिप हा विषय किती हार्ड आहे हे सांगायचं झालं तर युवाल नोवा हरारी सेपियन्समध्ये लिहितो, ‘Gossip is the foundation of our species’ survival.’

म्हणजे सगळी मानवजातच या गॉसिपच्या आधारावर तगलीये, बिग बॉस वाल्यांनी यावरुनच डाव रंगवलाय, जो लोकं आवडीनं बघतात.

दुसरा मुद्दा म्हणजे कॉंट्रोव्हर्सी.

बिग बॉसची बातमी तुम्ही कधी वाचता ? जेव्हा त्यांच्या घरात कायतर राडा होतो तेव्हा. म्हणजे कधी डॉली बिंद्रा खवळून उठते, तर कधी ‘Pooja, what is this behaviour ?’ हा प्रश्न हिट होतो. आता या मागची बिग बॉसची स्ट्रॅटेजी कशी काम करते ? तर प्रत्येक सिझनमध्ये असा एक तरी जण असतोय, ज्याच्या भोवती वादाचं वलय असतं. आधीच त्याचे राडे घालून झालेले असतात, त्यामुळं या बिग बॉसच्या घरात येऊन हा गडी काय नवीन करणार का याकडे लोकांचं लक्ष असतं.

सनी लिऑन, वीणा मलिक, हिंदुस्थानी भाऊ, राहुल महाजन, साजिद खान ही सगळी लोकं जेव्हा कुठल्या ना कुठल्या कॉंट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली होती, तेव्हाच त्यांना बिग बॉसमध्ये स्थान मिळालं.

जेव्हा बिग बॉसच्या घरात काही राडे झालेत नाहीत, तेव्हा आंदोलनं, विरोध असे विषय रंगले आणि बिग बॉस या शोबद्दल लोकांच्या मनात कुतूहल निर्माण होत गेलं.

तिसरं कारण म्हणजे फॅन्ससोबतचा कनेक्ट

हा कनेक्ट होण्याचं एक माध्यम म्हणजे सोशल मीडिया. दरदिवशी ट्विटरवर एका तरी बिगबॉस स्पर्धकाशी रिलेटेड हॅशटॅग ट्रेंडिंगला असतोय. याचं कारण म्हणजे त्यांचे फॅन क्लब. हे फॅन क्लब ठराविक वेळ आणि दिवस ठरवून एकाच वेळी काही हजार ट्विट्स करतात. याच्यात त्या स्पर्धकाशी रिलेटेड हॅशटॅगही असतोय आणि साहजिकच हा विषय ट्रेंडिंगला येतो.

फक्त आपल्या आवडत्या स्पर्धकाला ट्रेंडिगवर आणण्यापुरता हा फॅन क्लब लिमिटेड नसतो. तर आवडत्या स्पर्धकाला कुणी ट्रोल केलं किंवा निगेटिव्ह कमेंट केली की हा फॅन क्लब त्याच्यावर तुटून पडत असतोय. त्यामुळं या स्पर्धकाची चर्चा होते. मग आपल्या आवडत्या स्पर्धकाचं एलिमिनेशन होऊ नये म्हणून हे गडी खिंड लढवत राहतात आणि सोशल मीडियावरून त्या स्पर्धकाशी एक कनेक्ट तयार होतो.

सोबतच बिग बॉस बघणारे स्पर्धकांशी इमोशनली कनेक्ट होतात, असंही सांगण्यात येतं.

बारकाईनं बघितलं तर बिग बॉसमधल्या अनेक स्पर्धकांनी जिंदगीत स्ट्रगल केलेला असतो. मग ते उलगडून सांगताना त्याला इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक देतात आणि त्याचा लय खतरनाक इम्पॅक्ट पडतो. आता स्ट्रगलच्या स्टोरीवर रिऍलिटी शो मध्ये यशस्वी होण्याची भारतातली परंपरा काय नवी नाही.

सोबतच जर एखाद्या स्पर्धकावर अन्याय होतोय असं वाटलं की, मानवी स्वभावानुसार आपल्या मनात त्याच्याबद्दल सिम्पथी निर्माण होते आणि आपण पुढं काय होणार या आशेवर शो बघत राहतोय.

लोकं बिग बॉस आवडीने का बघतात आणि त्याचा परिणाम काय होतो, याबाबत आणखी डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी बोल भिडूनं मानसोपचार तज्ञ दीपा राक्षे यांच्याशी संपर्क साधला, त्या म्हणाल्या,

‘लोकांच्या आयुष्यात काय होतंय, हे जाणून घेणं हा थोडाफार मानवी स्वभावाचा भाग असतो. ज्या गोष्टी लोकं नॉर्मली बोलायला टाळतात ते गॉसिप तिकडे उघडपणे होतं.

कुणाच्या तरी पर्सनल लाईफमधलं काहीतरी कळलं की लोकं माझं हे असं नाहीये आणि माझं सुद्धा असंच आहे अशा दोन्ही बाजूंनी या गोष्टींशी रिलेट करतात. त्यामुळं गॉसिप हे शो हिट होण्याचं मुख्य कारण आहे.

सेलिब्रेटींच्या आयुष्यात खरंच अशा गोष्टी घडतात का ? या उत्सुकतेपोटी अनेक लोकं असे रिऍलिटी शोज बघतात, कारण सेलिब्रेटींची पर्सनल लाईफ ओपनली बघायला मिळते. पण या सगळ्याचा प्रचंड नकारात्मक परिणाम बघणाऱ्यांवर होतो.

कारण बघून शांत वाटेल, बरं वाटेल असं काहीही या शोजमध्ये नसतं.’

बाकी बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याची टीका होते, ५० लाखांचं बक्षीस म्हणजे काय लय मोठा विषय नाही असंही म्हणतात. पण अगदी लेटेस्ट आकडेवारी बघायची म्हणलं तर बिग बॉस हिंदीला टीआरपीचं १.६ रेटिंग्स आहेत.

होस्ट, स्पर्धक, घरातले ठरवून केलेले आणि न ठरवता झालेले राडे बदलत राहतात, पण मानवी स्वभावाची नस अगदी परफेक्ट ओळखलेलं बिग बॉस दरवेळी हिट ठरतं, एवढं मात्र खरं.

आता तरण्या वयात आपण कसं अभ्यासाच्या पुस्तकाच्या आत दुसरं पुस्तक लपवून वाचायचो, तसंच बिग बॉसचं झालंय. बघतात सगळे फक्त सांगत कोण नाय. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.