गावसकरच नाय, बॉब मार्लेनं पण आपल्या पोराचं नाव रोहन कन्हायच्या नावावरुन ठेवलंय…

आमच्याकडे एक भिडू कार्यकर्ता आहे, आम्हाला काल म्हणत होता की, विराट कोहलीनं सेंच्युरी मारली तर सगळ्या ऑफिसला पेढे वाटणार. पण विराट ऑफ स्टम्प बाहेरच्या बॉलला बॅट लाऊन आऊट झाला आणि पेढे खाण्याचा चान्स गेला. तेव्हापासून आमचा गडी तोंड बारीक करुन बसलाय. त्याला एकदा गमतीत विचारलं, ‘पोराचं नाव विराट ठेवशील काय?’ तर भावाचं उत्तर होतं… ‘शंभर टक्के. गावसकरनं कन्हायवरुन ठेवलं मग मी कोहलीवरुन ठेवणारच की.’

त्याच्या बडबडीमुळं आठवण झाली रोहन कन्हायची. वेस्ट इंडिजची टीम म्हणजे हॉरर शो होता. गार्नर, रॉबर्ट्स, होल्डिंग आणि मार्शल ही चार जणं बॉलर कमी आणि यमदूत जास्त वाटायचे. वर त्यांची बॅटिंग म्हणजे लॉईड, ग्रिनीज आणि स्वॅगच्या बाबतीत सगळ्या जगाचा बाप असणारा व्हिव रिचर्ड्स. त्यामुळे एक कपिल देवची टीम सोडली, तर सगळ्या टीम त्यांच्यापुढं लिंबू-टिंबू वाटायच्या. पण ही झाली ८० च्या दशकातली गोष्ट.

विंडीजची दहशत त्याच्या आधीपासून होती. १९७५ आणि १९७९ चे सलग वर्ल्डकप मारणारी टीम साधी असणं शक्यच नव्हतं. या खुंखार टीमच्या मूळपुरुषांपैकी एक नाव म्हणजे रोहन कन्हाय.

१९५७ मध्ये रोहन कन्हायनं वेस्ट इंडिजच्या कसोटी संघात पदार्पण केलं. विंडीजकडून खेळणारा तो भारतीय वंशाचा दुसरा खेळाडू ठरला. सर गारफिल्ड सोबर्स, अल्विन कालिचरण, लान्स गिब्स या दिग्गज टीममेट्ससोबत कन्हाय खेळला. सुरुवातीच्या काही कसोटी सामन्यांमध्ये त्यानं ओपनिंग बॅटिंग सोबतच विकेट किपींगही केली. कन्हायची बॅटिंग म्हणजे जबरदस्त फटके. आपल्या गावसकरसारखी सरळ रेषेत येणारी बॅट, जमिनीला लागूनच जाणारा बॉल असले प्रकार त्याच्या शॉट्समध्ये नव्हते. तो हेल्मेट न घालता क्रीझवर उभा राहायचा आणि तोंडासमोरचे बॉलही किरकोळीत हुक करायचा. त्याच्या फॉलिंग हुकची सर तर डिव्हिलिअर्सच्या बॅटिंगला पण यायची नाही.

क्रिकेटच्या भाषेत त्यांची बॅटिंग अनऑर्थोडॉक्स होती. पण त्यातून धावांचा पाऊस मुसळधार पडायचा हेही तितकंच खरं.

भारतीय वंशाचा असला, तरी भारताविरुद्ध त्याची बॅट हमखास चालायची. एकदा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या एका सामन्यात त्यानं २५६ रन्स चोपले होते. ईडन्सवर द्विशतक मारणारा तो पहिला बॅटर ठरला.

वर्ल्डकप धमाका

१९७५ च्या वर्ल्डकप स्पर्धेवेळी सर गारफिल्ड सोबर्स यांनी ऐनवेळी स्पर्धेत खेळणार नाही असं सांगितलं. विंडीजसाठी ही मोठी अडचण होती. कन्हायचं वय तेव्हा ४० वर्ष होतं, डोक्यावरचे केस पांढरे झाले होते. तरी फक्त आपल्या टीमसाठी तो मैदानात उतरला. वर्ल्डकप फायनलमध्ये विंडीज प्रचंड प्रेशरमध्ये असताना त्यानं झुंजार फिफ्टी झळकवली आणि संघाला मॅच मारुन दिली.

गावसकर, कालिचरण आणि बॉब मार्ले, या तीन वाढीव कार्यकर्त्यांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे तिघांच्याही मुलाचं नाव रोहन आहे. गावसकर तर सरळ सरळ सांगतो, की आपल्या आयुष्यात पाहिलेला सगळ्यात भारी बॅटर रोहन कन्हायच होता. त्यामुळं मी माझ्या मुलाचं नाव रोहन ठेवलं. कालिचरण तर कन्हायचा टीममेट, त्यालाही कन्हायच्या बॅटिंगबद्दल आणि त्याच्याबद्दल प्रचंड आदर त्यामुळं त्यानंही आपल्या मुलाचं नाव रोहन ठेवलं.

बॉब मार्ले तर तरुणाईच्या गळ्यातला ताईद. त्याच्या गाण्यांनी सगळ्या जगाला वेड लावलं. पण हा बॉब मार्लेही रोहन कन्हायचा फॅन. आपल्या आयडॉलला ट्रिब्यूट म्हणून त्यानं आपल्या मुलाचं नाव ठेवलं रोहन. रोहन मार्लेनं काहीकाळ रग्बी खेळात आपली चमक दाखवली आणि सध्या तो नावाजलेला व्यावसायिक आहे.

थोडक्यात काय, तर विंडीज असो किंवा भारत रोहन कन्हायची जादू काय ओसरत नसतेय…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.