नीट आठवून सांगा किती पिक्चरमध्ये बॅकग्राऊंडला आंबेडकरांचा फोटो आणि हिरो दलित बघितलाय

कार्ल मार्क्सचं एक साधं धोरण होतं. कामगारांनी भांडवली वर्गाची सत्ता उलथून टाकायची म्हणजे त्यांचे सगळे प्रश्न सुटतील. एवढंच काय तर हे आपोआप होईल असं भाकीतही मार्क्सनं वर्तवून ठेवलं आहे. पण वर्षेच्या वर्षे लोटली पण मार्क्सची भविष्यवाणी मात्र काय खरं ठरत नाहीये. याउलट दिवसेंदिवस लोकं भांडवलदारांना उलथून टाकण्याऐवजी एकदिवस मीच जगताला सगळ्यात मोठा भांडवलदार होईल याचं स्वप्न बाळगून असतात.

मार्क्स म्हणतो ज्यांच्याकडे संपत्ती आहे आणि ज्यांच्याकडे नाही यांच्यात नेहमी संघर्ष होत राहतो मात्र बाहेर परिस्तिथी वेगळीच इकडं लोकांनी निवांत भांडवलदारी वर्गाचं वर्चस्व मान्य केलेलं. 

मग लोकांच्या असं वागण्याच्या मागचं लॉजिक बरोबर ओळखलं इटलीच्या अँटनींओ ग्राम्सीने. ग्राम्सीने सांगितलं की डॉमिनंट क्लासचं म्हणजे ज्या वर्गाचं समाजावर वर्चस्व असतं त्या वर्गाची विचारधारा, मूल्ये, श्रद्धा यांचाही समाजावर पगडा असतो आणि तो इतका डीप असतो की खालच्या स्तरातल्या लोकांना ते कळून पण येत नाही. शाळा,चर्च, मीडिया यांच्यातून या गोष्टी अशा काही लोकांच्या मनावर बिंबवल्या जातात की खालचा वर्गही वरच्या वर्गाचं अनुकरण करू लागतो.

लै ताण आला असेल तर उदाहरण  देऊन सांगतो,

आपण कितीही गरीब असलो तरी एकद्याला गरीबाचा शाहरुख, गरिबांचा सलमान म्हटलं की आपल्याला आपोआप हसू फुटतं.

भारतीय समाज जिथं वर्गभेदाबरोबरच जातीभेदही असतो. तिथंही ही थेअरी तशीच लागू होते. आपल्या हिंदी सिनेमाचे नायकच बघा ना. आपला बिग बीचा अग्निपथचा विजय दिनानाथ चौहान असू दे की सूर्यवंशमचा हिरा ठाकूर कि मोहब्बतेनमधला नारायण शंकर अगदी कसं नेहमीचं ठरलेल्या वर्गातले कॅरेक्टर्स. अगदी बॅकग्राऊंडला पण तसेच फोटो तेच महापुरुष आणि त्यात बाकीच्या वर्गाला काही वेगळं वाटत नाही. आणि याचं लॉजिक ग्राम्सीने सांगितलं आहेच.

नागराज मंजुळे यांच्या झुंड पिक्चरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या फ्रेममध्ये अमिताभ दिसला आणि  भारतीय चित्रपटसृष्टीतील दलितांचं प्रतिनिधित्व हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

विषय पण तसाच आहे तुम्हीच नीट आठवा आणि सांगा की किती पिक्चरमध्ये तुम्ही आंबेडकरांचा फोटो बॅकग्राऊंडला आणि दलित समाजातला हिरो पहिला आहे.

नाही आठवणार!

कारण ही संख्या हातच्या बोटांवर मोजण्या इतकीच आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा नुसता फोटो हिंदी पिक्चरमध्ये दिसायला स्वातंत्र्यानंतर तीन दशकं जावी लागली होती.

दलित समजातून येणारे हिरो हेरॉईन यांच्या कथा काही वेळा दाखवल्या जात होत्या मात्र जसं ठाकुरांचा बॅकग्राउंड ठसठसीतपणे दाखवलं जात होतं तसं दाखवण्यात येत नव्हतं. 

मात्र हा पायंडा मोडला फुले शाहू आंबेडकर यांच्या मातीतून येणाऱ्या जब्बार पटेलांनी. पटेल हे कदाचित पहिले दिग्दर्शक होते ज्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीत आंबेडकरांचे फ्रेम केलेले पोर्ट्रेट वापरले होते, ज्याची सुरुवात त्यांच्या १९७९ च्या कल्ट मराठी क्लासिक राजकीय नाटक सिंहासनपासून झाली होती. योगायोगाने, त्याच वर्षी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आंबेडकरांच्या अप्रकाशित लेखन आणि भाषणांचे खंड छापण्यास सुरुवात केली.

पुढे स्मिता पाटील-अभिनीत उंबरठा या मराठी पिक्चरमध्ये, आंबेडकरांचे एक मोठे चित्र पाटील यांच्या महिला आश्रमातील कार्यालयाच्या भिंतींवर झळकले होते. पटेल यांच्या आंतरजातीय प्रेमकथा ‘मुक्ता’ मध्येही आंबेडकर पुन्हा  बॅकग्राऊंडला दिसले होते.

Jabbar Patels Marathi movie Mukta 1995.png?compress=true&quality=80&w=800&dpr=1

पुढे जब्बार पटेलांनी २०००मध्ये आंबडेकरांवर बनवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या इंग्रजी-हिंदी चित्रपटात त्यांनी आंबेडकरांच्या जीवनाचे, शिक्षणाचे, राजकीय प्रवासाचे एक ज्वलंत चित्र मांडले होते.

पेरियार यांचे आंदोलन आणि चळवळीचे प्रोडक्ट असलेल्या अण्णादुराई आणि एम करुणानिधी यांच्या डीएमके पक्षाने राजकीय वर्चस्वाबरोबरच  तामिळनाडूच्या सांस्कृतिक पटलावरही दलितांना स्थान  मिळवून दिले.

फुले शाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रातही आंबडेकरांच्या प्रतिमेला पडद्यावर स्थान मिळाले होते मात्र ८० शीचं दशक ओलांडलं तरी उत्तर भारतात मात्र आंबेडकरांचा विचार पडद्यावर दिसत नव्हता.

मात्र ही परिस्तिथी बदलली जेव्हा कांशीराम यांनी DS -4 आणि बामसेफच्या माध्यमातून सांस्कृतिक -सामाजिक लढा आणि पुढे बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून दलितांसाठी राजकीय लढा उभारला.

 याचं पाहिला परिणाम म्हणजे राजेश खन्ना आणि स्मिता पाटील यांच्या आखिर क्यूँ? या चित्रपटात आंबेडकरांची फ्रेम चमकली.

एकदा का ही चाकोरी तोडली का मग मात्र आंबेडकरांची फ्रेम सिनेमामध्ये वारंवार झळकू लागली मग ते ऑस्करपर्यंत पोहचलेल्या राजकुमार रावच्या न्यूटनची गोष्ट असू दे की जॉली LLB -२मधला कोर्टातला सीन.

आणि याच्या एक पाऊल पुढे जाऊन दलित बॅकग्राउंडमधून येणारा हिरो पडद्यावर सुपरहिट करून दाखवला ते नागराज मंजुळे, दक्षिणेतील पा रंजिथ, मारी सेल्वराज, व्हेट्रीमारण या दिग्दर्शिकांनी. नागराज मंजुळेंच्या पिक्चरमधली जब्या, परश्या ही पात्र जाती-पातीचा विचार न करता अख्या समाजानं उचलून धरली.

पा रंजिथ च्या काला मधला रजनीकांत जेव्हा बुद्ध विहाराचा बॅकग्राउंड असताना डायलॉग फेकतो तेव्हा प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतलं होतं. 

पुढे मारी सेल्वराजच्या  कर्णानमध्ये  दलित वास्तूमधून जाणारी बस दलितांसाठी कधीच थांबत नाही हे बघून बसवर दगड मारणाऱ्या पोराचा राग काळजाला भिडतो. सूर्याचा जय भीम आज IMDB वरचा सर्वात हायेस्ट रेटिंग असलेल्या पिक्चरमध्ये जाऊन बसलाय.

त्यामुळं आता तरी समाजातल्या सर्व घटकांच्या रंगेबेरंगी जीवनाला रुपेरी पडद्यावर स्थान मिळेल हीच अपेक्षा. बाकी एवढं सगळं वाचून अजून बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेमचं का पाहिजे असं तुम्ही म्हणत असाल तर का नाही? याचाही एकदा विचार करा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

1 Comment
  1. Dr.Ratnakar kamble says

    “आरक्षण” नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता, चित्रपट आरक्षणावर होता पण संपूर्ण चित्रपटात कुठेही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि डायलॉग नव्हता.

    खरंच नागराज मंजुळे आपण भारतीय समाजव्यवस्थेचं वास्तविक चित्रण करता🙏🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.