फाट्यावर मारु नका, पहिल्या डोसप्रमाणंच बूस्टर डोसही घेणं गरजेचं आहे भिडू

आमच्या चौकात एक मामा आहेत. तसं ते आमच्यापैकी कुणाच्याच आईचे भाऊ नाहीत, फक्त आम्हीच नाही तर आमच्या आया पण त्यांना मामाच म्हणतात. मामा तसे पैलवान गडी, वागण्यात अदब आणि जरब दोन्ही. त्यामुळं आमचं बालपण त्यांना घाबरण्यात गेलं. मामांच्या घरची माणसं तशी बाद आहेत, त्यामुळं मामा राहतात एकटेच. आता वय झालं असलं, तरी गडी जगात कशाला घाबरत नाही, अपवाद फक्त इंजेक्शन.

पैलवान असल्यानं मामा आणि आजारांचा तसा फार संबंध आला नाही. पण कोरोनाची लस घ्यायचीये म्हणल्यावर आमचे मामा डोकं धरुन बसले. पार ३३ कोटी देवांच्या शपथा घालून झाल्या, तरी मामा ऐकेनात. शेवटी मटण खिलवण्याचा वाद्यावर पहिला आणि सगळ्या पोरांनी इमोशनल ब्लॅकमेल करुन दुसरा डोस दिला. आम्ही सगळे जरा निवांत झालो आणि तोवर बातमी धडकली की आता तिसरा डोस पण घ्यायला लागणारे.

आता यावेळी आम्ही मामांना अभ्यासपूर्ण भिडणार आहे (कारण तेवढा एकच मार्ग उरलाय.) या बूस्टर डोसचा विषय नेमका काय आहे? दोन डोस घेऊन झाले तरी आता तिसऱ्यांदा सुई का टोचवून घ्यायचीये? आणि एवढ्या लडतरी करुन काय होणार? या सगळ्याची माहिती तुमच्या-आमच्यासकट सगळ्या मामांच्या सोयीसाठी.

हा बूस्टर डोस कुणाला मिळणार आहे?

६० वर्षांवरील नागरिकांना, इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना व आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी अशा फ्रंटलाईन वर्कर्सला आपल्या देशात बूस्टर डोस देण्यात येणार आहे. तिसरा डोस घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असंही सांगण्यात आलं आहे. बूस्टर डोससाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही, त्यामुळं फारशी मेहनत घ्यावी लागणार नाय.

तुम्ही आधीचे दोन डोस कोव्हीशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनपैकी ज्या लसीचे घेतले असतील त्याच लसीचा बूस्टर डोस तुम्हाला घ्यावा लागेल.   

केंद्रावर जायचं, दंडात लस टोचवून घरी यायचं की झालं.

पण दोन्ही डोस घेऊन कोरोना झालेली लोकं आहेत, तिथं तिसऱ्या डोसमुळं असं काय होणार आहे? दम धरा सांगतो.

बूस्टर डोस हा नावाप्रमाणंच एस्क्ट्रा पॉवर (कोरोनाविरुद्ध लढण्याची) देण्याचं काम करतो. बूस्टर डोस शरीरातल्या प्रतिकारक्षमतेला सक्रिय करण्याचं काम करतो, त्यामुळं शरीरात अँटीबॉडीज बनायला लागतात. लसीच्या प्रत्येक डोससोबत रोगप्रतिकार क्षमतेची पातळी वाढत जाते. बूस्टर डोसमुळं प्रतिकारक्षमता आणखी भक्कम होते आणि शरीरात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी लागणाऱ्या अँटीबॉडीजचं प्रमाण वाढतं. सोबतच लसीच्या डोसनुसार वाढत जाणाऱ्या अँटीबॉडीज व्हायरसला निष्क्रिय करण्याचं काम अधिक प्रभावानं व वेगानं करु शकतात.

संशोधनानुसार अशी माहितीही समोर आली आहे की, लसीचा केवळ एक डोस घेतल्यानंतरही लोकांच्या प्रतिकारक्षमतेत चांगली वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झाला तरी सौम्य लक्षणांवर निभावून जातंय. दोन्ही डोस घेतले असतील, तर ताप आणि सर्दीशिवाय फार काही होत नाही. थोडक्यात काय, तर शक्यतो हॉस्पिटलमध्ये जावं लागत नाही. मात्र आता कोविडचे कित्येक व्हेरिएंट समोर आले आहेत. दोन डोसमुळे शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज या नव्या व्हेरिएंटचा सामना करताना काहीशा कमी पडू शकतात. त्यामुळं शरीराला आणखी सुदृढ बनवण्यासाठी बूस्टर डोस घेणं गरजेचं ठरलं आहे.

सध्या झपाट्यानं रुग्णसंख्या वाढत असली, तरी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं किंवा ऑक्सिजनची गरज लागण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं लय लोड घेऊ नका. आमच्या मामांसारखी माणसं तुमच्याही आजूबाजूला असतील, तर त्यांना ही माहिती समजून सांगा आणि तिसरा डोस द्या. आणि हा मास्क, सॅनिटायझर वापरा. चौथा डोस घ्यायची इच्छा नसेल, तर काळजी घ्यायलाच पाहिजे की भिडू.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.