सोशल मीडियावर बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा ट्रेंड का होतंय ? नेमका विषय काय ?

आमिर खानचा एक लई फेमस किस्सा आहे. त्याचा कयामत से कयामत तक पिक्चर येणार होता. त्यावेळी प्रमोशन करण्यासाठी आजसारखे ऑप्शन नव्हते, आमिर अजून स्टारही झाला नव्हता. त्यामुळं त्यानं आपल्या मित्रांसोबत मुंबईतल्या रिक्षांना पिक्चरचे पोस्टर चिटकवायला घेतले. तेव्हा लोकं त्यालाच विचारायची, ‘इस पिक्चर का हिरो कोन है ?’ पण त्याहीपेक्षा खतरनाक गोष्ट म्हणजे एका रिक्षावाल्यानं चिडून आमिरसमोरच त्याचं पोस्टर फाडून टाकलं होतं.

आज हा किस्सा आठवला याचं कारण म्हणजे, ट्विटर आणि सगळ्या सोशल मीडियावरच सुरू असलेला बॉयकॉट लालसिंग चढ्ढा हा ट्रेंड. तुम्हीही एखाद-दुसरी पोस्ट बघितली असणार, पण नेमका विषय काय आहे ? लोकं आमिर खानचा पिक्चर बॉयकॉट करा का म्हणतायत आणि बॉलिवूडमध्ये बॉयकॉटचा ट्रेंड कधीपासून सुरु झाला ? हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.

आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा रिलीझ होतोय या ११ ऑगस्टला. त्याचं प्रमोशनही सुरू आहे, मात्र विषय गाजतोय तो बॉयकॉटचा. 

लाल सिंग चढ्ढा हा हॉलिवूडच्या गाजलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या पिक्चरचा रिमेक आहे. फॉरेस्ट गम्प हा पिक्चर १९९४ मध्ये आलेला, टॉम हँक्सच्या अभिनयानं हा पिक्चर अजरामर ठरला आणि त्याचा कल्ट तयार झाला. हँक्सनं केलेला रोल आता लाल सिंग चढ्ढामध्ये आमिर खान करणार आहे आणि त्याच्यासोबत करीना कपूर, मोना सिंग, नागा चैतन्य दिसणार आहेत. 

हे झालं पिक्चरचं आता वळूयात बॉयकॉटच्या मुद्द्याकडे.

सोशल मीडियावरुन बॉयकॉटची मागणी होणारा लाल सिंग चढ्ढा हा काय पहिलाच पिक्चर नाही. याआधीही बॉयकॉट बॉलिवूड म्हणत सोशल मीडियावरुन अनेक पिक्चर्सला विरोध झालाय. हा बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर आला. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूड आणि त्यातलं नेपोटिझम जबाबदार आहे, असा आरोप अनेकांनी केला आणि बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड होऊ लागलं. बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा ट्रेंड होण्यामागच्या अनेक कारणांपैकी हे सुद्धा एक कारण आहे.

सोशल मीडिया युझर्सनं आणखी कोणती कारणं दिलीत ते सांगतो, एक कारण आहे आमिर खानची २०१५ ची मुलाखत. 

त्या मुलाखतीत तो म्हणाला होता, “मी आणि किरण बोलत असताना तिनं विचारलं की आपण भारत सोडायला हवा का ? तिनं असा प्रश्न विचारणं माझ्यासाठी धक्कादायक होतं. तिला आमच्या मुलांची काळजी आहे, तिला भीती वाटते की आजूबाजूचं वातावरण कसं असेल, तिला रोजचं वर्तमापत्र  उघडायचीही भीती वाटते.” 

पुढं त्यानं देशातल्या असहिष्णूतेबद्दल वक्तव्य केलं. त्यावरुन तेव्हा देशात लईच राडा झाला होता. कुणी आमिरची बाजू घेतली, तर कुणी त्याला विरोध केला, आमिरवर गुन्हेही दाखल झाले होते. त्याच २०१५ च्या वक्तव्यावरुन आमिर खानला टार्गेट केलं जातंय आणि लाल सिंग चढ्ढा बॉयकॉट करण्याची मागणी होतीये.

दुसरं कारण म्हणजे आमिर खानचा २०१४ मध्ये आलेला पिक्चर, पिके. 

या पिक्चरनं दणकट पैसे कमवले, पार फॉरेनमध्येही बिझनेस केला. पण या पिक्चरमधल्या काही दृश्यांमुळंही कॉंट्रोव्हर्सी झाली होती. या दृश्यांमुळं हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे आरोप झाले होते. तेव्हा मजबूत गदारोळ उठला आणि आता आमिरच्या प्रत्येक पिक्चरवेळी पिकेचा उल्लेख करत त्याचे इतर पिक्चर्स न पाहण्याचं आवाहन करण्यात येतं, तसंच आता लाल सिंग चढ्ढाच्या वेळेस होतंय.

तिसरं कारण आहे, आमिरचं एका मुलाखतीमधलंच वक्तव्य.

त्याचा फना पिक्चर रिलीझ होणार होता, तेव्हा त्यानं ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांना एक मुलाखत दिली आणि २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलींबाबत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. अनेक युझर्सनं हा व्हिडीओ शेअर करत लाल सिंग चढ्ढा बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

नेपोटिझम, बॉलिवूडवरचा रोष, आमिर खानची वक्तव्य ही कारणं तर आहेतच, पण बॉयकॉटचा ट्रेंड आणखी फॉर्ममध्ये आला तो करीना कपूरच्या वक्तव्यामुळं. 

बॉयकॉट आणि नेपोटीझमबद्दल बोलताना करीना कपूरनं, ‘आम्ही कुणाला आमचा पिक्चर बघावा म्हणून जबरदस्ती करत नाही’ अशा आशयाचं वक्तव्य केलं आणि लोकं चांगलीच चिडली. करीनावर टीका झाली आणि पिक्चर बॉयकॉट करण्याचा ट्रेंड आणि जोरात सुरु झाला.

ही सगळी झाली सोशल मीडिया युझर्सच्या पोस्टमध्ये दिसणारी कारणं. याच्यापलीकडे जाऊन पाहायचं झालं, तर २०२२ मध्ये भूलभुलैय्या २, द काश्मीर फाईल्स वगळता इतर बॉलिवूडच्या पिक्चर्सनं फारसं यश मिळवलेलं नाही. कित्येक बिग बजेट पिक्चर बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले.

तेच दुसऱ्या बाजूला पुष्पा, केजीएफ २, आरआरआर, विक्रम या दाक्षिणात्य चित्रपटांनी मात्र दणक्यात पैसे छापले. साहजिकच बॉलिवूडच्या टिपिकल मसाला फिल्म्सला साऊथच्या लार्जर दॅन लाईफ हिरोंनी लई मागे टाकलं आणि हा बॉयकॉटचा ट्रेंड उभा राहिला असंही बोललं जातंय.

त्यामुळं बॉयकॉटचा फटका बसला नाही बसला, तरी दाक्षिणात्य पिक्चर्सपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवण्याचं आव्हान आता बॉलिवूडसमोर नक्कीच आहे.

या सगळ्या ट्रेंडवर आमिर खाननंही एक वक्तव्य केलंय, तो म्हणाला, “मला या गोष्टीचं दुःख वाटतं की  मला भारताबद्दल प्रेम नाही, असा बऱ्याच जणांचा समज आहे. पण ही वस्तुस्थिती नाही, माझं माझ्या देशावर मनापासून प्रेम आहे. कृपया माझे पिक्चर बघा ते बॉयकॉट करू नका.”

आता मुद्दा असाय की लोकांनी या मुद्द्यावरुनही आमिरला ट्रोल केलंय. कित्येकांनी लाल सिंग चढ्ढा बघण्यापेक्षा पैसे दान करु असं म्हणलंय, तर काही जणांनी आमिरला पाठिंबाही दर्शवलाय. या सगळ्या राड्यात फॉरेस्ट गम्पचा हा ऑफिशिअल रिमेक भारतात हिट होणार की फ्लॉप ? या बॉयकॉटच्या ट्रेंडमुळं पिक्चरवर आणि आमिर खानवर परिणाम होणार का ? हा मोठा प्रश्न आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.