पेपरातल्या हेडलाईनचा वेगळा अर्थ निघाल्यामुळे भुजबळांना सेना सोडावी लागली होती..?

भुजबळ साहेब सेनेत जाणार. गेल्या पंधरा दिवसातली सर्वाधिक चर्चेली जाणारी बातमी. आज जाणार का उद्या जाणार माहित नाही पण जाणार हि चर्चा जोरात आहे. शिवसेनेत भुजबळांना परत घेण्यावरून देखील वाद आहेत. असा लखोबा लोखंडे परत नकोच म्हणणारे, नाशिकचं सेनेचं राजकारण भुजबळांशिवाय वाढवणारे कट्टर शिवसैनिक यात आघाडीवर आहेत. शेवटचा चेंडू मात्र उद्धव ठाकरेंच्याकडे आहे. आत्ता त्यावर काय होतय ते वेळच सांगेल. तूर्तास आम्ही सांगतो, 

भुजबळांनी सेना का सोडली होती..? 

मुंबईच भायखळा भाजी मार्केट. इथे एक तरुण आपल्या आईसोबत भाजी विकायचा. तो VJTI कॉलेजला डिप्लोमा देखील करत होता. या दरम्यान मुंबईत शिवसेना आपली पाळेमुखे घट्ट रोवत होती. त्याच काळात मराठी माणूस म्हणून हा तरुण बाळासाहेबांकडे ओढला गेला. शिवसैनिक झाला.

आक्रमकता पाहून बाळासाहेबांनी त्याला पहिल्या फळीत घेतलं. शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणून त्याची ओळख झाली. 

तो तरुण म्हणजे छगन भुजबळ. 

पुढे काय झालं तर छगन भुजबळ यांच वर्चस्व सेनेत वाढत गेलं. सुरवातीच्या काळात म्हणजे १९७३ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. ७३ ते ८४ या दरम्यान ते महापालिकेत विरोधी पक्षनेता होते. ८५ च्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदा भगवा फडकला आणि भुजबळांना मुंबई महानगरपालिकेचे महापौर करण्यात आलं.

याच वेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भुजबळ आमदार झाले.

१९८५ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. भुजबळांनी विधानसभेत विरोधी पक्ष कसा असतो हे पहिल्यांदा दाखवून दिलं. नाही म्हणायला यापुर्वी अत्रेसारखे नेते सभागृह गाजवायचे पण त्यामध्ये आक्रमक शैली नसायची. भुजबळ हे  हाडाचे शिवसैनिक होते. विधानसभेत त्यांना बोलण्यासाठी बंदी घालण्यात आली तेव्हा फक्त हातवारे करुन भाषण करण्याचा पराक्रम देखील त्यांनी केला. 

याच दरम्यान शिवसेनेचा पहिल्या फळीतला पहिला नेता म्हणून छगन भुजबळांना ओळख मिळू लागली. बाळासाहेब ठाकरेंच्या खालोखाल सत्ताकेंद्र म्हणून भुजबळांच नाव घेतलं जात होतं. चार वर्षे गेली आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे वातावरण निर्माण होवू लागले. 

येणाऱ्या निवडणुकांमध्ये सेना मुंबईच्या बाहेर वाढवण्याची गरज होती. त्यासाठी छगन भुजबळांनी चांगलीच कंबर कसली होती. एक एक शिवसैनिक हेरून त्याला तिकीट देण्यासाठी भुजबळांनी पुढाकार घेतला होता. बाळासाहेब ठाकरेंनी देखील भुजबळांचे प्रयत्न ओळखून त्यांनी सुचवलेल्या शिवसैनिकांना पक्षाचे तिकीट दिले. 

निवडणुका लागल्या. छगन भुजबळांचा झंझावात संपुर्ण महाराष्ट्रात फिरत होता. भुजबळांबद्दल सांगायचं झालं तर त्या वेळी वेषांतर करुन भुजबळ बेळगावला जावून मराठीत भाषण देवून आले होते. त्यांचा स्टंट चांगलाच गाजला होता. विधानसभेतील प्रश्नांमुळे छगन भुजबळांच नाव रोज चर्चेत यायचं. असेही दिवस होते की, तेव्हा महाराष्ट्रात सेनेची सत्ता नसताना फक्त आणि फक्त भुजबळांच नाव रोजच्या बातमीत असायचं.

भुजबळांनी आपल्या हिम्मतीवर २० हून अधिक शिवसैनिकांना निवडून आणलं. भुजबळांच्या प्रयत्नातून तिकीट देण्यात आलेली माणसे विजयी झाले. 

पण यापुर्वी एक घटना घडली होती. निवडणुका झाल्यानंतर झालेल्या घडामोडींना ती बातमी कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत. एका इंग्रजी दैनिकांने भुजबळांच्या या प्रयत्नांबद्दल हेडलाईन दिली होती.

ती हेडलाईन होती, 

भुजबळ सेनेला मुंबईबाहेर घेवून जात आहेत, मराठवाड्यात सेनेला मोठ्ठ यश मिळण्याची शक्यता..! 

निवडणुकीपुर्वी छापून आलेल्या या बातमीनंतरच भुजबळांच्या नशिबाची चक्रे उलटी फिरु लागली. भुजबळ महत्वाकांक्षी होत असू पुढे जावून ते धोका देतील अशा आशयाच्या बातम्यांची पेरणी मातोश्रीवर होवू लागली. त्यातूनच निवडणुकिनंतर भुजबळांचे बळ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

निवडणुक झाल्यानंतर भुजबळांना पहिला धक्का देण्यात आला तो म्हणजे, विरोधी पक्षनेतेपदी भुजबळांऐवजी मनोहर जोशींची नियुक्ती करुन. 

भुजबळांच नाव इतकं गाजत असताना देखील मनोहर जोशींना देण्यात आलेली संधी चुकीची होती. आपण OBC आहोत म्हणून आपल्याला संधी नाकारून ब्राम्हण असणाऱ्या जोशींना हि संधी देण्यात आल्याची टिका भुजबळांनी केली. 

भुजबळांचा हा पहिला वार थेट सेनाप्रमुखांवर होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात बंड म्हणजे साक्षात मृत्यूला आव्हान देण्याचा प्रकार होता. शिवसैनिकांमध्ये राडा संस्कृती कमालीची फोफावली होती. भुजबळांच्या एका वाक्याने देखील होत्याच नव्हतं होवू शकत होतं. त्यातच निमित्त झालं ते मंडल आयोगाचं. सेनेने मंडल आयोगाला विरोध केला. स्वत: बाळासाहेब ठाकरे या विरोधात होते. अशा वेळी मंडल आयोगाच्या निमित्ताने भुजबळांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात टिका करण्यास सुरवात केली. 

भुजबळांसारख्या मोठ्या नेत्यांची अचूक अवस्था ओळखली ती म्हणजे शरद पवारांनी. 

कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉंग्रेस नेते रामराव आदिक व बाळासाहेब ठाकरे एका मंचावर उपस्थित होते. तेव्हा बाळासाहेबांनी छगन भुजबळांवर तोंडसुख घेतलं.

इतक्यावर न थांबता बाळासाहेब आदिकांना म्हणाले, 

आमच्यातला कचरा तुम्ही घेवून जावा. 

बाळासाहेबांच्या या विधानानंतर छगन भुजबळांचे शिवसेनेत राहून तडजोड करण्याचे दिवस संपले असल्याच लक्षात आलं. मोक्के पे चौक्का मारणाऱ्या शरद पवारांनी लोणावळा येथे भुजबळांची भेट घेतली आणि त्यांना कॉंग्रेसमध्ये येण्याच आमंत्रण दिलं. 

भुजबळांनी आपल्या जवळच्या लोकांना झालेल्या निवडणुकीत तिकीट दिलं होतं. २० हून अधिक आमदार भुजबळ समर्थक होते. पक्षांतर बंदिच्या कायद्यामुळे भुजबळांबरोबर किमान २० आमदार कॉंग्रेसमध्ये येण्याची शक्यता होती. पण शिवसैनिक व बाळासाहेबांच्या दहशतीपुढे भुजबळांसोबत फक्त नऊच आमदार गेले. 

१९९१ चं नागपूर अधिवेशन आणि भुजबळ गेले. 

या अधिवेशनात भुजबळ सहा आमदारांसोबत कॉंग्रेसमध्ये गेले. त्याक्षणी भुजबळांच्या पाठीमागे राज्यभरातून सैनिक लागले. कधी, कुठे आणि कशाप्रकारे शिवसैनिक भुजबळांवर हल्ला करतील याचा नेम नव्हता. सुरवातीच्या काळात नागपुरच्या पॉवर हाऊस व नंतर पद्मसिंह पाटील यांच्या बंगल्यावर भुजबळ लपून राहिले. 

पद्मसिंह पाटील यांच्या बंगल्यावर भुजबळ लपून बसले असतानाच रात्रीच्या वेळी तिथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आले. आज भुजबळांना संपवायचं अशा इराद्यानेच तो हल्ला करण्यात आला होता. त्या वेळी भुजबळ साधी ब्लॅकेट ओढून बाकड्यावर झोपून राहिले. आलेल्या सैनिकांना बाकड्यावर झोपलेली व्यक्ती भुजबळ असतील अशी शंका देखील आली नाही. भुजबळ वाचले. 

शरद पवारांनी भुजबळांना महसुल मंत्री केलं. त्यांच्या आजूबाजूला ब्लॅक कमांडोचं जाळ उभा करण्यात आलं. तरिही सैनिकांच्या हल्याची भिती होतीच. भुजबळ मंत्रीपदावर होत. हळुहळु करत त्यांनी मुंबईचा संपर्क वाढवला. कमांडोच्या जाळ्यात ते फिरू लागले. 

पुढे १९९५ साली महाराष्ट्रात निवडणुका लागल्या. माझगाव मधून छगन भुजबळ पराभूत झाले. त्यानंतर भुजबळांना विधानपरिषदेवर घेवून विरोधी पक्षनेते करण्यात आलं. या काळात किणी सारखी प्रकरणे बाहेर काढून भुजबळांनी शिवसेनेच्या नाकात दम आणला. याचीच परिणिती म्हणजे भुजबळांवर पुन्हा हल्ला करण्यात आला. 

९८ च्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी भुजबळांना येवल्यातून संधी दिली. कॉंग्रेसची संपुर्ण फळी त्यांच्या मागे उभी करुन भुजबळांना येवल्यातून निवडून आणलं. सेनेमुळे भुजबळांच्या आयुष्यातलं मुंबई सुटलं आणि पवारांमुळे नाशिक हे नवीन घर झालं. आजोळ असल्याने भुजबळांना आपला गट बांधणं सोप्प गेलं. 

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.