हॉटेल, गाड्या सगळीकडे मिळणारं चायनीज फूड भारतात एवढं फेमस कसं काय झालं?

भारतीयांना चिन्यांचं वावडं आहे. त्यात कोरोना आल्यापासून तर अख्ख्या जगालाच त्यांचं वावडं झालंय. पंतप्रधानांनी तर चीनी अॅप्स पासून वस्तूंपर्यंत त्यांचं काहीही वापरण्यावर बंदी घातलीये. पण एक गोष्ट आहे जी भारतातून नष्ट करणं खुद्द पंतप्रधानाना सुद्धा जमलेलं नाही. ती गोष्ट म्हणजे चायनीज फूड.

खरं आपण जे चायनीज खातो ते खरं चायनीज नाहीच असं अनेकदा अनेक जणांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल.पण मग हे चायनीज फूड भारतात आलं कसं, इतकं फेमस झालं कसं आणि जर ते चीनी लोकांचं ऑथेंटिक फूडच नाही तर मग आपण त्या पदार्थांना चायनीज पदार्थ का म्हणतो? या सगळ्याची उत्तरं तुम्हाला इथं सापडतील. 

हॉटेल कुठलं पण असुदे, कुठे पण असुदे. मेनूकार्डवरचे अनेक पदार्थ इकडे तिकडे होत असतात पण त्यावरचं चायनीज फूड सेक्शन हॉटेलच्या मालकाला हटवता येत नसतंय.

फ्राइड आणि शेजवान हे दोन शब्द मेनूकार्ड हातात घेतलं की आपल्या डोळ्यापुढे आलेच पाहिजेत. 

हातातलं मेनू कार्ड कमी होतं म्हणून की काय तर आता झोमॅटो आणि स्विगीवाल्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप्सच्या मेनूमध्ये सुद्धा राइस आणि नूडल्सची लिस्ट लागलेली असते. वर्षानूवर्ष आपण हे पदार्थ चीनी लोकांचे पदार्थ म्हणून खात आलेले असतो. पण मग नंतर असं अचानक लक्षात येतं की चायनात हे पदार्थ सहसा मिळतच नाहीत. आपण जे खातो ते चायनीज नाही तर इंडो चायनीज असतं. 

आज आपण समजून घेऊ की चायनीज आणि इंडो चायनीज ह्यात काय फरक आहे आणि आपण ज्याला चायनीज म्हणतो ते चायनीज भारतात कसं फेमस झालं.

आपण म्हणतो ते चायनीज भारतात कसं फेमस झालं ह्याचं थोडक्यात उत्तर म्हणजे ते चवीला भारी लागतं म्हणून. पण सविस्तर उत्तर शोधायला आणि चायनीज- इंडो चायनीज ह्यातला फरक समजून घ्यायला आपल्याला आधी इतिहासात डोकवावं लागतं.

साधारण ४०० वर्षांपूर्वी चीनी लोकांची भारतात स्थलांतरित होण्याला सुरवात झाली होती 

 या स्थलांतरित झालेल्या चीनी लोकांचं वास्तव्य कोलकत्यात होतं. १७७८ साली भारतात स्थलांतरित झालेला पहिला चीनी हा चहाचा व्यापारी होता. ब्रिटिशांनी दिलेल्या जागी त्याने आपली साखरेची गिरणी सुरू केली आणि इतर चीनी बांधवांना भारतात बोलवून घेतलं. 

१९०१ साली साधारण १६४० चीनी लोकं भारतात वास्तव्यासाठी आले आणि दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी हीच संख्या २६,२५० इतकी झाली होती.

त्यातच होते हाक्का कम्यूनिटीचे लोकं. 

भारतात येऊन स्थाईक झाल्यानंतर त्यांना पोटापाण्यासाठी खटपट करणं भाग होतं. त्यातल्या काही जणांनी रेशीम व्यापार सुरू केला, काही जण लेदर इंडस्ट्रीत घुसले तर काही जणांनी भारतात उपलब्ध असणारं साहित्य वापरुन आपले पदार्थ भारतीयांना खाऊ घालायला सुरवात केली, कोलकत्यात गल्ल्यागल्ल्यांमध्ये तिकडले फेरीवाले या चीनी लोकांनी बनवलेलं चायनीज विकू लागले. 

१९२४ साली भारतातलं पहिलं चायनीज रेस्टॉरंट कलकत्यात सुरू झालं ज्याचं नाव होतं नानकिंग (Nanking) 

हे हॉटेल नंतर इतकं फेमस होत गेलं की दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यासारखे बॉलीवुड स्टार्स सुद्धा इथे चायनीज खायला जायचे. पुढे कोलकात्यात ठिकठिकाणी चायनीज फूड मिळायला लागलं आणि फक्त कोलकाताच नाही तर मुंबईतही चायनीजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत गेली.  

चीन आणि भारत अशा दोन्ही देशांचं फूड कल्चर एकत्र सर्व्ह केलं जात होतं. आणि तेच हे इंडो चायनीज व्हर्जन ज्यात भारतीय पदार्थांना चायनीज ट्विस्ट देऊन तुम्हाला हे पदार्थ खाऊ घातले जातात. भारतात तिखट आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सवय लक्षात घेऊन हे पदार्थ अधिक तिखट केले जाऊ लागले. 

आता आपल्या शेजवान चटणीचच बघा, ही चटणी सुक्या लाल मिरच्यांची बनवलेली असते. शिवाय आपली अस्सल भारतीय आलंलसूण पेस्ट सुद्धा या इंडो चायनीज पदार्थांमध्ये वापरली जाते.  

खरं एक सोया सॉस आणि पदार्थांमधले स्कार्ब्स वगळता चायनीज आणि इंडो चायनीज पदार्थांमध्ये फार कमी गोष्टी कॉमन आहेत. भारतातल्या काही ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक चायनीज खायला मिळतं. ते एकदा खाऊन बघा म्हणजे चायनीज आणि इंडो चायनीज पदार्थांमध्ये किती फरक आहे हे तुमचं तुम्हाला लक्षात येईल.  

आता बघूया आपल्या देशात हे चायनीज इतकं फेमस कसं झालं. भारतात चायनीज फेमस होण्यामागे दोन कारणं महत्वाची ठरतात, एक म्हणजे भारतात नव्वदच्या दशकात झालेलं लिबरलायझेशन  म्हणजेच उदारीकरण. भारताबाहेरचं मार्केट खुलं झाल्यामुळे इथल्या लोकांची पैसे खर्च करण्याची समीकरणं बदलली.

आता कोणत्याही सामान्य माणसाच्या हाती पैसा आला की तो त्याचं काय करतो, तर सेविंग वगळता उरलेला पैसा, कुठलाही सामान्य माणूस खाण्यापिण्यावर खर्च करतो.. म्हणजेच काय तर त्याकाळापासूनच सामान्य लोकांचा बाहेरच्या खाण्याकडे जास्त कल वळू लागला होता.

शिवाय चायनीज पदार्थांची क्रेझ वाढल्याने, लोकांसाठी बाहेर खाणं म्हणजे चायनीज खाणं असं इक्वेशन बनलं होतं.   

आणि दूसरं महत्वाचं कारण म्हणजे मी सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे, या इंडो चायनीज पदार्थांची चव.. त्यांचा विशिष्ट उमामी फ्लेवर, त्यांचे स्टार्च, स्कार्ब्स आणि त्यांचे सोया आणि चीलीसारखे वेगवेगळे सॉस भारतीयांना आवडून गेले. भात आणि भातासोबत ग्रेव्ही हा इकडला पॅटर्न इंडो चायनीज पदार्थांमध्ये आल्याने भारतीय लोकांमध्ये तो लगेचच अडॉप्ट झाला.

शिवाय, मुळातच मसालेदार पदार्थांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या भारतीयांना ह्या चटकदार आणि स्पायसी इंडो चायनीज पदार्थांची चटक लागली.

यातही अजून एक म मी     हत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे चायनीज तेव्हापासूनच बऱ्यापैकी स्वस्त दरात मिळायचं. 

रस्त्यावरच्या गाडीपासून, छोट्या मोठ्या रेस्टॉरंटसमध्ये मिळणारं हे इंडो चायनीज फूड म्हणजे खिशाला परवडणारं होतं आणि लहानांपासून मोठ्यानपर्यंत प्रत्येकाला आवडणारंही.त्यामुळे खऱ्या अर्थाने स्वस्त आणि मस्त असलेलं इंडो चायनीज भारतीयांच्या सवयीचं बनत गेलं आणि फेमस झालं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.