गांधींनंतर मलाच रिपोर्टिंग तरच शक्य ; या 5 कारणांमुळे डील फिस्कटली

पॉलिटिकल ऍडव्हायजर म्हणून एवढी हवा करणारा प्रशांत किशोर हा भारताच्या राजकारणातला बहुतेक पहिलाच माणूस असेल. अगदी ‘मिडास टच’ असलेला माणुस, तो ज्या पार्टी बरोबर जातो ती पार्टी जिंकतेचं अशी त्यांची प्रतिमा निर्माण करण्यात आली. प्रशांत किशोर यांनी पण वेळोवेळी वेगवेगळ्या चाली खेळून ती इमेज जपली सुदधा.

मागच्या महिनाभरापासून काँग्रेस बरोबर जाण्याची आणि काँग्रेसला पुन्हा ‘अच्छे दिन’ आणण्याच्या त्यांच्या प्लॅनची अशीच चर्चा झाली. पण काँग्रेस आणि प्रशांत किशोर ही डील झालीच नाही.

अनेक दिवसांच्या वाटाघाटींनंतर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेसने दिलेला प्रस्ताव नाकारला आणि  काँग्रेस पक्षामध्ये अजून सुधारणा आवश्यक आहेत असा सल्ला देखील देऊन टाकला.

याआधी प्रशांत किशोर यांनी ६०० स्लाईड्सचं प्रेझेन्टेशन देऊन आपण काँग्रेसला कसं वाचवू शकतो याचा प्लॅन काँग्रेसच्या लीडरशिपला सांगितला होता. तरीही डील झाली नाही.

मात्र हा प्लॅनच काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यामधला डील ब्रेकर ठरला आहे.

या प्लॅनमधले हे आहेत पाच पॉईंट ज्यामुळं प्रशांत किशोर आणि काँग्रेस एकत्र आले नाहीत.

आधी गांधी घराणं नंतर मग मीच 

प्रशांत किशोर यांना पार्टीमध्ये मोठया प्रमाणात चेंजेस करायचे होते. त्यानुसार प्रियांका गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा, सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्षा आणि राहुल गांधी काँग्रेसचे लोकसभेतील नेते अशी रचना किशोर यांना अपेक्षित होती.

त्याच बरोबर प्रशांत किशोर थेट पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना  रिपोर्ट करतील अशी व्यवस्था त्यांना पाहिजे होती. 

मात्र काँग्रेसने त्यांना पक्षातल्या एम्पावर्ड ऍक्शन ग्रुपच्या खाली राहून काम करण्याची ऑफर दिली होती. जी प्रशांत किशोर यांना पचनी पडली नाही.

काँग्रेसचं कम्युनिकेशन ते अगदी तिकीट वाटप यात प्रशांत किशोर यांना फ्री हॅन्ड पाहिजे होता

प्रशांत किशोर यांना काँग्रेसचं संपूर्ण कम्युनिकेशन्स आणि मेसेजिंग हाताळायचं होतं. पक्षाची तिकिटे आणि रणनीती डेटा वापरून ठरवण्यात यावी आणि त्यात कोणाची फेरफार नसावी अशी त्यांची मागणी होती.

मात्र प्रशांत किशोर यांना पक्षात एवढा फ्री हॅन्ड देण्यास काँग्रेस तयार नव्हतं. 

काँग्रेसचा मुख्य मुद्दा असा होता की जर प्रशांत किशोर यांना संपूर्ण संवाद आणि तिकीट वाटप हाताळायला दिलं तर पार्टीच्या इतर नेत्यांचा काहीच रोल राहणार नाही. त्याचबरोबर काँग्रेस वर्किंग कमिटी आणि राज्यातल्या काँग्रेस कमिट्यापण बिनकामाच्या होऊन जातील.

प्रादेशिक पक्षांबरोबर युती

प्रशांत किशोर यांना काँग्रेसची प्रादेशिक पक्षांसोबत युती करायची होती. मोदींना हरवण्यासाठी  केसीआर, जगन आणि ममता यांच्याशी काँग्रेसनं आघाडी करावी अशी प्रशांत किशोर यांची रणनिती होती.

मात्र त्याचवेळी काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं कि या पक्षांशी  युती केली तर हे पक्ष ज्या राज्यांत पावरफुल आहेत तिथं काँग्रेस वाढणार नाही.

त्याचबरोबर प्रशांत किशोर आघाडी करण्यासाठी सांगून त्यांचे क्लाएन्ट असलेल्या या प्रादेशिक पक्षांची केंद्रात सोय करत आहेत अशी देखील शंका काँग्रेस नेते उपस्तिथ करत होते.

राज्याचं सोडा २०२४च्या लोकसभा इलेक्शनचं बघा

प्रशांत किशोर यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करायचे होते. त्यानुसारच त्यांना पक्षाची ध्येयधोरणं ठरवायची होती. त्यांचं पूर्ण प्रेझेंसटेशन याच मुद्यावर आधारित होतं.

 मात्र अनेक राज्यात होणाऱ्या पराभवामुळं काँग्रेस चिंतेत आहे. 

त्यामुळं प्रशांत किशोर यांनी या वर्षी आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करावं अशी काँग्रेसची इच्छा होती.

IPAC चा देखील ही डील ब्रेक होण्यामध्ये मोठा रोल असल्याचं सांगण्यात येतंय

काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यातील वाटाघाटी संपुष्टात येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पक्षाला प्रशांत किशोर हवे होते परंतु त्यांची कंपनी IPAC नको होती. गेली अनेक वर्षे प्रशांत किशोर यांनी  स्वतःला IPAC पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु IPAC च्या कारभारावर त्यांचा किती प्रभाव आहे हे जगजाहीर आहे. 

त्यातच IPAC  ज्यांच्याबरोबर काम करते ते तृणमूल काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसार काँग्रेस हे काँग्रेसच्या मुळावर उठले आहेत हे ही तितकंच खरं आहे. 

 या सर्व करणांमुळं हे बहुचर्चित डील झालीच नाही. बाकी प्रशांत किशोर यांची हवा झाली हि गोष्ट वेगळी मात्र त्याचवेळी त्यांना मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये एंट्री घेता आली नाही हे ही तितकंच खरं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.