मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळं आरोपीचा रिसॉर्ट तोडला खरा, पण यामुळेच आरोपी सुटू शकतायत…

अंकिता भंडारी हे नाव आतापर्यंत कदाचित तुमच्या वाचनात आलं असेलच. उत्तराखंडमध्ये एका रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या या १९ वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली, मृतदेह एका कालव्यात सापडला. या हत्येवरुन उत्तराखंडमधलं वातावरण तापलं, लोकांनी रस्त्यावर उतरत उत्तराखंड-हरियाणा हायवेही बंद केला. आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना, पोलिसांची गाडी थांबवून आरोपींना मारहाण केली. या सगळ्यात मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलाय.

त्यांचं म्हणणं आहे की, ‘पुन्हा एकदा अंकिताच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात यावं, कारण आम्हाला संशय आहे की तिच्यावर बलात्कार झाला असावा.’

पण सोबतच अंकिताच्या घरच्यांनी आणखी एक महत्त्वाचा आरोप केलाय. तिचे वडील माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘सरकारनं वनंतरा रिसॉर्टची तोडफोड केली, पण या रिसॉर्टमध्ये महत्त्वाचे पुरावे सापडले असते, मग हा रिसॉर्ट तोडण्यात का आला ?’

अंकिताच्या कुटुंबियांच्या या आरोपांनंतर  मुख्यमंत्र्यांनी हे रिसॉर्ट तोडण्याचे आदेश नेमके का दिले ? यावर सगळ्याच स्तरांमधून प्रश्नचिन्ह निर्माण होतायत. या रिसॉर्ट तोडण्याचा अंकिताच्या केसवर नेमका काय परिणाम होऊ शकतो आहे आणि सगळं प्रकरण नेमकं काय आहे ? हेच जाणून घेऊ.

अंकितानं २८ ऑगस्टला हृषिकेशमधल्या वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. हे रिसॉर्ट पुलकित आर्य याच्या मालकीचं आहे, पुलकित आर्य हा भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री विनोद आर्य यांचा मुलगा आहे. इथं काम करत असतानाच, १७ सप्टेंबरला अंकिता बेपत्ता झाली.

माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. त्यानंतर माध्यमांमध्ये ही बातमी पसरली आणि पोलिसांनी तपासाची चक्र हलवली.

मात्र २४ सप्टेंबरला सकाळी अंकिताचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अंकिताच्या खुनाच्या आरोपाखाली रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य, रिसॉर्टचा मॅनेजर सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना अटक केली आहे. या तिघांची चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे.

पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘अंकिता पुलकित, सौरभ आणि अंकित यांच्यासोबत हृषीकेशला गेली होती. तिकडून परत येताना अंकिता आणि इतर तिघांमध्ये वाद झाले. या वादाचा परिणाम म्हणून पुलकित आणि त्याच्या साथीदारांनी तिला गंगेत ढकलून देत तिची हत्या केली. पुलकितनं सुरुवातीला अंकिता आमच्यासोबत हृषीकेशला आली होती आणि आम्ही सगळे परतही आलो होतो. मात्र १९ सप्टेंबरला सकाळी अंकिता रिसॉर्टमधल्या तिच्या रुममधून गायब झाली, अशी माहिती चौकशीत दिली होती. मात्र जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलं आणि रिसॉर्टमधल्या इतरांची चौकशी केली तेव्हा त्याच्या वक्तव्यांमध्ये तफावत आढळली.’

रिसॉर्टमधल्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली की, रिसॉर्टमधून जाताना चार जण गेले होते मात्र येताना तिघंच जण परत आले. सीसीटीव्हीमध्येदेखील हेच आढळून आलं. त्यामुळं पोलिसांनी पुलकित आर्य आणि त्याच्या सहकाऱ्यांभोवतीचा फास आवळला आणि त्यानं गुन्ह्याची कबुली दिली.

या सगळ्या घटनांमुळं भाजपनं पुलकितचे वडील माजी राज्यमंत्री विनोद आर्य आणि ओबीसी कल्याण आयोगाचे अध्यक्ष आणि पुलकितचे भाऊ अंकित आर्य यांची पक्ष आणि पदावरुन हकालपट्टी केली. चिडलेल्या स्थानिक नागरिकांनी वनंतरा रिसॉर्टला आगही लावली.

माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार, ‘पुलकित आणि त्याचे सहकारी रिसॉर्टमध्ये आलेल्या ग्राहकांसोबत अनैतिक संबंध ठेवावेत अशी मागणी अंकिताकडे करत होते. तिनं याला नकार दिला तर कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जात होती, अशी माहिती तिनं आपल्या एका मित्राशी चॅटवर बोलताना दिली होती.’ त्यामुळं या सगळ्या प्रकरणाला नेमकं काय वळण लागणार याची चर्चा सुरु आहेच.

पण सोबतच आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे, हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी हा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिल्याची माहिती विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी दिली आणि शुक्रवारी रात्रीच रिसॉर्टचा बराच भाग पाडण्यातही आला.

सुरुवातीला तातडीनं कारवाई केल्याबद्दल अनेकांनी पुष्करसिंह धामी यांचं कौतुक केलं होतं, मात्र अंकिताच्या कुटुंबीयांनी पुरावे नष्ट झाल्याचा संशय व्यक्त केल्यानं, धामी यांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वनंतरा रिसॉर्टमध्येच अंकिताही राहायला होती, जेसीबीनं सगळ्यात पहिल्यांदा जी रुम पाडली, त्यामध्येच अंकिता राहायची. आता ही रुम पाडण्यात आल्यानं तिथं मातीचा ढिगारा तयार झाला आहे. हॉटेल कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अंकितानं बेपत्ता होण्याच्या आधी या रुममधूनच त्याला फोन केला होता. त्यामुळं याच रुममध्ये तिचं आणि पुलकित किंवा इतर आरोपींचं बोलणं झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

अंकिता या रुममध्ये राहायला असल्यानं इथंच अनेक पुरावे असण्याची शक्यता आहे. मात्र बुलडोझर वापरुन ही रुम पाडण्यात आल्यानं, पुरावे कसे गोळा करणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

त्यात या प्रकरणात आलेला ट्विस्ट म्हणजे, जिल्हा प्रशासनानं ‘आमच्याकडून रिसॉर्ट तोडण्यासाठीचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नव्हते, अशी माहिती दिली.’

त्यामुळं रिसॉर्ट अधिकृतपणे तोडण्यात आला की नाही ? आणि सगळ्यात आधी फक्त अंकिता राहत होती तीच रूम का तोडण्यात आली ? असा प्रश्न अंकिताचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक यांच्याकडून विचारला जातोय.

त्यात पोलिसांनी रिसॉर्टची तपासणी केल्यानंतर काही पुरावे गोळा केले होते आणि सोबतच अंकिताच्या रुममधूनही काही पुरावे गोळा केले होते. त्यानंतर त्यांनी ही रुम सील करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही बुलडोझरद्वारे सगळ्यात आधी हीच रुम तोडण्यात आली.

साहजिकच ही रुम तोडल्यामुळं महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पोलिसांनी मात्र सगळे पुरावे आधीच गोळा केले असल्याचा आणि रुमचं व्हिडीओ सर्वेक्षण केलं असल्याचा दावा केला आहे.

पण त्या रुममध्ये पुरावे असतील आणि तोडफोडीमुळं पुराव्यांशी छेडछाड झाली असेल, तर काय कारवाई होऊ शकते…

जर कोर्टात सादर होऊ शकणारा एखादा पुरावा उध्वस्त केला किंवा त्याच्यात फेरफार केले, तर संविधानाच्या कलम २०४ नुसार कारवाई होऊ शकते. जर पुरावा उध्वस्त केल्याचा गुन्हा सिद्ध झाला, तर दोन वर्षांचा तुरुंगवास, आर्थिक दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा भोगावी लागू शकते.

सोबतच जर कुठले पुरावे उध्वस्त झाले असतील, तर कोर्टात या तीन आरोपींविरुद्ध जेव्हा केस उभी राहील, तेव्हा पुराव्याअभावी सरकारी पक्षाची बाजू कुमकुवत होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळं जिल्हा प्रशासनानं हात वर केलेले असताना, रिसॉर्टवर बुलडोझर नेमका का चालवण्यात आला ? आणि याचा अंकिताच्या केसवर नेमका काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.