सगळं टॉलिवूड हिट ठरत असताना, देवरकोंडा आणि लायगर का आपटले…

आधी फॉरेनमधला कुठला स्टार भारतात आला की बॉलिवूडच्या हिरो-हिरॉईनला भेटायचा. त्यांची कॉपी मारायला जायचा. एखाद्या स्टारनं शाहरुखसारखे हात बाजूला केले, तरी आपल्याकडचं पब्लिक पागल व्हायचं. आता मात्र कुठला स्टार आपल्याकडं आला की पुष्पाची ऍक्टिंग करत झुकेगा नही म्हणतो.

हा बदल काय एका रात्रीत घडला नाही. आधी फक्त डब झालेल्या पिक्चरपुरतं मर्यादित असलेलं साऊथचं मार्केट बाहुबलीनंतर खतरनाक बदललं आणि त्यात जसं बॉलिवूड ढासळलं तसा तर साऊथच्या पिक्चरला आणखीनच बूस्टर मिळाला.

आता अगदी जवळचंच उदाहरण घ्यायचं म्हणलं, तर २०२१-२२ मध्ये पुष्पा, आरआरआर, विक्रम, केजीएफ-२ या साऊथच्या पिक्चरनंच जास्त हवा केली.

बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या कार्यकर्त्यांचे पिक्चर पडले, त्यात विजय देवरकोंडासारखा पॉप्युलर स्टार लायगर पिक्चरमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार ही बातमी आली. लोकांना वाटलं आता काही खरं नाही, कारण देवरकोंडा साऊथमध्ये खुंखार हिट ठरला होता. बॉलिवूडमध्ये मात्र त्याचा कार्यक्रम गंडला आणि लायगर सपाटून आपटला. पण साऊथचा प्रत्येक पिक्चर आणि प्रत्येक हिरो बॉलिवूडमध्ये चालतोय, मग देवरकोंडा आणि लायगरचं नेमकं गंडलं तरी काय ?

सगळ्यात आधी बघुयात कमाईचे आकडे. रिलीझ झालेल्या दिवशी लायगरनं भारतात ४.१० कोटी रुपये कमावले. तर याच तुलनेत आरआरआरनं पहिल्या दिवशी २० कोटी कमावले होते आणि केजीएफ-२ नं कहर करत ५३.९५ कोटी रुपयांचा बिझनेस केला होता.

पिक्चरला सगळ्यात मोठी कमाईची संधी असते, ती विकेंडला. उदाहरण बघायचं तर आरआरआरनं विकेंडला ७५.५७ कोटी रुपये कमावले होते, तर केजीएफ-२ नं जवळपास १९४ कोटींचा बिझनेस केला होता. या तुलनेत लायगरला मात्र १३.५० कोटीच कमावता आलेत.

आतापर्यंत लायगरला पिक्चरला ५० कोटींचा मार्कही क्रॉस करता आलेला नाही.

जगप्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन, रावडीपणामुळं प्रसिद्ध असणारा देवरकोंडा आणि गोडगोजिरी अनन्या पांडे, राजमाता शिवगामीनी अर्थात रम्याक्रिष्णन, आपला मकरंद देशपांडे असली स्टारकास्ट, बॉक्सिंगची स्टोरी, त्याला लव्हस्टोरीचा तडका असला सगळा ऐवज असूनही लायगर काय चालला नाही. आता का चालला नाही याचीच कारणं बघुयात.

मुख्य कारण म्हणजे बॉयकॉटचा ट्रेंड. हा ट्रेंड तसा बॉलिवूडवाल्यांना टार्गेट करूनच सुरु असला, तरी लायगरच्या निमित्ताने देवरकोंडा आणि साऊथची इंडस्ट्रीही यात घावली. त्याचं झालं असं, या पिक्चरच्या प्रोड्युसर्समध्ये चार्मी कौरच्याही आधी एक नाव येतं ते म्हणजे करण जोहर. 

ता बॉलिवूडला विरोध करणाऱ्यांपैकी अनेक जण करण जोहरच्या विरोधात आहेत. त्याच्या पिक्चर्सविरुद्ध बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू आहे, त्यामुळं करण जोहर साऊथच्या पिक्चरचा प्रोड्युसर असला, तरी बॉयकॉटच्या रडारवर आलाच आणि त्याचा परिणाम कमाईवर झाला.

काही लोकं करण जोहरमुळं बॉयकॉट करत होती, तर काही जण अनन्या पांडेमुळं. आता अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी, त्यामुळं तिच्यावर नेपोटीझमचा टॅग चिटकलेलाय. हा मुद्दा धरुनही लायगर बॉयकॉट करण्यात यावा असा ट्रेंड चालला. आणखी एक ट्रेंड चालला तो पिक्चरचा हिरो विजय देवरकोंडामुळं.

ट्रोलिंग आणि बॉयकॉटच्या मुद्द्यावर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना देवरकोंडा म्हणाला होता, ‘देख लेंगे कोन रौकता हे’ त्याच्या या वक्तव्यावरुन वाद झाला आणि सोशल मीडियावर बॉयकॉट लायगर, बॉयकॉट विजय हा ट्रेंड फॉर्ममध्ये आला.

दुसरा विषय झाला उद्धटपणाचा. कितीही म्हणलं तरी बॉलिवूडवर प्रेम करणारीही जनता काही प्रमाणात आहे, मात्र देवरकोंडाचं एक जुनं स्टेटमेन्ट व्हायरल झालं आणि त्यावरुन किस्सा रंगला. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, की ‘शाहरुख खान काही फिल्म इंडस्ट्रीचा शेवटचा सुपरस्टार नाही. तो सुपरस्टार बनू शकतो तर मी का नाही ?’ आता यावरून शाहरुखचे फॅन चिडले आणि देवरकोंडा परत एकदा घावला.

त्यात एका थिएटर मालकानंही सांगितलं की विजय देवरकोंडा फार उद्धट आहे. यामुळं सोशल मीडियावर पिक्चरच्या पॉजिटीव्ह चर्चा होण्याऐवजी निगेटिव्ह चर्चा होऊ लागल्या. देवरकोंडानं त्या थिएटर मालकाची भेट घेतली, पाया पडून आशीर्वाद घेतले, पण त्यानं काय बॉक्स ऑफिसवरचं डॅमेज कंट्रोल झालं नाही.

आणखी एक कारण सांगण्यात येतं ते म्हणजे स्टोरी. लायगरची स्टारकास्ट तगडी असली, तरी स्टोरीमध्ये फार काही वेगळं नाही. साऊथचे चाललेले पिक्चर पाहिले, तर बाहुबली आणि विक्रमनं स्वतःचं एक वेगळं विश्व उभं केलंय. आरआरआर, केजीएफ आणि पुष्पा हे तर नुसत्या ऍक्शन सिनसाठी लोकांनी परत परत पाहिलेत. हे पिक्चर लार्जर दॅन लाईफ आणि प्रचंड बजेटमध्ये बनलेले असले, तरी त्यांची खरी ताकद ही स्टोरी आणि वेगळेपणात होती. 

लायगरला ही जादू काय जमली नाही आणि पिक्चर फुसका बार ठरला.

गीता गोविंदम, अर्जुन रेड्डी, डिअर कॉम्रेड, टॅक्सीवाला, येवाडे सुब्रमण्यम हे देवरकोंडाचे पिक्चर खतरनाक हिट ठरले होते. त्यातही त्यानं अशाच काहीशा रावडी भूमिका केल्या होत्या, मात्र तोच पॅटर्न लायगरमध्ये चालला नाही. इथं त्याचा कार्यक्रम सप्पय गंडला. बॉलिवूडमधल्या डेब्यूमध्ये विजय देवरकोंडाला चांगलंच अपयश आलं.

साऊथमध्ये खतरनाक हवा करणारे सगळेच अभिनेते बॉलिवूडमध्ये हिट होतात असं नाही. रामचरणच्या जंजीरचं जोरदार मार्केटिंग झालं होतं, मात्र पिक्चरला २३ कोटींचाच बिझनेस करता आला. रोलेक्स हे नाव ऐकल्यावर डोळ्यांसमोर येणाऱ्या सूर्याचाही रक्तचरित्र-२ चालला नव्हता, पृथ्वीराजचा ऐय्या पडला होता, नागा चैतन्यनं लालसिंग चड्ढामध्ये काम केलं मात्र त्याचं नावही कुठे चर्चेत आलं नाही. 

रजनीकांत, कमल हसन, धनुष या लोकांनी मात्र दोन्हीकडच्या इंडस्ट्रीवर राज्य केलं. विजय देवरकोंडा नेमका पहिल्या यादीत आला. आता गडी म्हणलाय की, लायगरचा सिक्वेल येणार, खरं पैशे कोण लावणार हा मोठा प्रश्न आहे ? 

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.