कपिलपाजी म्हणाले खरं, पण डॉन ब्रॅडमनच्या पोरावर स्वतःचं नाव बदलायची वेळ का आली होती

अर्जुन तेंडुलकर हे सगळ्या भारतात कायम चर्चेत असणारं नाव, अर्थात सचिन तेंडुलकरचं पोरगं हे त्यामागचं मुख्य कारण. त्यामुळं फारशी संधी मिळाली नसली, तरी अर्जुनच्या करिअरबाबत चर्चा होत असतेच.

भारताचे वर्ल्डकप विनिंग कर्णधार कपिल देव नुकतंच म्हणाले, “तेंडुलकर आडनाव असणं, हे अर्जुनसाठी फायदेशीरही आहे आणि नुकसानकारकही. त्याच्यावर जास्त दबाव टाकू नका, तो तरुण आहे आणि त्यानं त्याच्या खेळाचा आनंद घेतला पाहिजे. डॉन ब्रॅडमनच्या मुलानं आपलं नाव बदललं होतं.”

यातलं शेवटचं वाक्य ऐकलं आणि आमच्या डोक्यातला बल्ब पेटला.

डॉन ब्रॅडमन म्हणजे क्रिकेटमधलं सगळ्यात टेरर नाव. ज्या जमान्यात हेल्मेट नव्हते, ओव्हरला किती बाउन्सर टाकायचे याचं लिमिट नव्हतं, बॅट्समनला फेव्हर करतील असे नियम नव्हते… त्या काळात डोनाल्ड ब्रॅडमन ‘सर डॉन ब्रॅडमन’ बनले होते.

त्यांच्या नावाचा, बॅटिंगचा इतका दबदबा होता की, ब्रॅडमन म्हणजेच क्रिकेट हे समीकरण फिक्स झालेलं. क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळातच ऑस्ट्रेलिया सुपरपॉवर बदली ती ब्रॅडमनमुळेच. आपल्या शेवटच्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाले नसते, तर त्यांचं ॲव्हरेज ९९.९४ राहिलं नसतं.

ते कदाचित १०० किंवा त्याच्या पार गेलं असतं. इतक्या ताकदीचा हा माणूस.

ब्रॅडमन बराच काळ प्रसिद्धीच्या शिखरावर राहिले, अगदी त्यांच्या मृत्यूनंतरही. त्यांच्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये कडक बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक प्लेअरची तुलना ब्रॅडमन यांच्यासोबत होऊ लागली, पार सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंग, विराट कोहली, ॲलिस्टर कूक, स्टीव्ह स्मिथ अशा सगळ्यांची.

यापैकी कुणालाच ब्रॅडमनची सर नसली, तरी कोणत्याही क्रिकेटरसाठी ब्रॅडमनशी तुलना होणं ही साहजिकीच मोठी गोष्ट असते. 

कितीही नको म्हणलं तरी ब्रॅडमनशी झालेली तुलना कुणाला नाय आवडणार..?

पण एक माणूस होता, ज्याला सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जाणारी तुलना, त्यांच्याशी जोडलं गेलेलं नाव या गोष्टींचं प्रेशर सहन नाही झालं.

 हा माणूस दुसरा तिसरा कोण नाही, तर डॉन ब्रॅडमन यांचा मुलगा जॉन ब्रॅडमन होता.

ऑस्ट्रेलियन लोकांसाठी ब्रॅडमन म्हणजे सगळ्यात मोठं नाव होतं, त्यामुळं त्यांच्या मुलाकडूनही त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या होत्या. तो काय करतो? त्यानं काय करायला हवं? आपल्या वडिलांचा वारसा तो चालवतोय का नाही? असे बरेच प्रश्न त्याला लहानपणापासून विचारले जायचे.

लोकांनी आपल्या आयुष्यात सारखं नाक खुपसल्यानं हा गडी वैतागला होता. शेवटी वयाच्या अठराव्या वर्षी त्यानं जरा हिम्मत केली आणि आपल्या वडिलांनाच, ‘आपल्याला आडनाव बदलायचंय’ हे सांगितलं.

सर डॉन ब्रॅडमन यांनी त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, त्यांनी फक्त एका मित्राला पत्र लिहून त्यांना ही गोष्ट खटकतीये आणि याचं वाईट वाटतंय हे सांगितलं. हे समजल्यावर जॉनला कळलं की, ही गोष्ट डॉन यांच्यासाठी किती कठीण आहे.

पण वयाची १८ वर्ष पार केल्यानंतर जॉनसाठी आयुष्य आणखी खडतर झालं. एकतर तो क्रिकेट खेळत नव्हता, ही गोष्टच लोकांना खटकणारी होती. त्यात लहानपणापासुन सुरू झालेला, “तू तुझ्या वडिलांसारखाच मोठा प्लेअर बनणार का?” हा टिपिकल प्रश्न काय जॉनची पाठ सोडत नव्हता.

एका ठिकाणी बोलताना त्यानं सांगितलं होतं की, “सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा मुलगा असणं म्हणजे काचेच्या पिंजऱ्यात असण्यासारखं होतं, जिथं आपण एक्झिबिशनमध्ये ठेवलेल्या इतर वस्तूंसारखे आहोत आणि लोकं आपल्याकडे बघण्याचा आनंद घेतायत असं वाटतं. लोकांनी ‘मी कोण आहे?’ याचा शोध घ्यावा याला मी कंटाळलोय. मला हे पटतच नाही की, माझी ओळख अजूनही कुणाचा तरी मुलगा अशीच केली जाते..? माझी स्वतःचीही ओळख आहे, मी स्वतः एक स्वतंत्र व्यक्ती आहे.

या गोष्टीमुळं वयाच्या ३२ व्या वर्षी त्यानं आपलं नाव बदललं आणि ठेवलं, ‘जॉन ब्रॅडसन.’ खरंतर त्याला ब्रॅडेनहॅम नाव ठेवायचं होतं, पण ब्रॅडसनमध्ये ब्रॅडमनचा अंश होता.

इथून पुढं खऱ्या अर्थानं त्याचं नवं आयुष्य सुरू झालं, जॉनला आणि त्याच्या पत्नीला कधी कुणी डॉन ब्रॅडमन यांच्याबद्दल विचारलं नाही. कित्येकांना या दोघांचं काही कनेक्शन असेल याचा संशयही आला नाही. जॉन पुढं जाऊन ॲडलेड युनिव्हर्सिटीमध्ये पर्यावरण आणि वकिली या विषयांवर लेक्चरर बनला. त्याच्या मुलांनाही ब्रॅडसन हेच आडनाव मिळालं आणि त्यांनाही इतिहास उकरून काढणाऱ्या आणि आजोबांशी तुलना करणाऱ्या लोकांपासून सुटका मिळाली.  

सध्या मात्र जॉन ब्रॅडसन हा जॉन ब्रॅडमन झालाय आणि यामागंही एक स्टोरी आहे…

सर डॉन ब्रॅडमन यांचं वय झालं होतं, अशातच जॉनच्या पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलांनी ठरवलं की आपण पुन्हा एकदा आपलं ‘फॅमिली नेम’ धारण करायला हवं. त्यांनी हा निर्णय जॉनला सांगितला आणि त्यानंही मंजुरी दिली.

हे कुटुंब पुन्हा एकदा ब्रॅडमन फॅमिली म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि डॉन ब्रॅडमन यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.

कपिल देव बोलताना म्हणाले, ”अर्जुन हा सचिनकडे असलेल्या गुणवत्तेच्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला तरी खूप मोठी गोष्ट आहे.”

पण बघायला गेलं, तर तेंडुलकर, गावसकर किंवा बिन्नी यांनी गुणवत्तेची इतकी मोठी व्याख्या बनवून ठेवलीये की अर्जुन, रोहन आणि स्टुअर्टला त्यातली २५ टक्के गाठणंही अवघडच आहे. बापाच्या प्रसिद्धीच्या ओझ्याखाली काहींचे खांदे दबले जातात तर काहींचे नाही… जॉन ‘ब्रॅडमन’ पहिल्या गटात बसला…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.