कुस्ती पंढरीला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवायला २१ वर्षे का लागली ?

कुस्तीची पंढरी म्हणुन ओळखलं जाणारं कोल्हापूर हे शहर. राजर्षी शाहू महाराजांच्या राजश्रयामुळे येथील कुस्ती बहरत गेली. या तांबड्या मातीची किर्ती जग भर पोहोचली. हजारो नामांकीत मल्ल या करवीर नगरीत घडले. देशातीलच नव्हे तर जगातील प्रमुख कुस्ती केंद्र म्हणुन कोल्हापूरची ओळख सर्वश्रृत होती. परंतु अलीकडच्या दोन दशकात याच कुस्ती पंढरीला उतरती कळा लागली. 

अगदी कोल्हापूरची कुस्ती पंढरी ही ओळख संपते की काय ? असा बाका प्रसंग ऊभा राहिला. परिणामी ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा दुष्काळ हटवायला २१ वर्षे लागली. पै.पृथ्वीराज पाटीलच्या रुपाने यंदा तरी हा दुष्काळ मिटला आहे.

पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरी किताबाचा मान मिळवत कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पण नेमक्या २१ वर्षात काय असं घडलं कि कोल्हापूरची कुस्ती मागे पडली ; हे या लेखातून आपण शोधणार आहोत. त्यामुळे भिडूंनो शेवट पर्यत स्टोरी वाचा, विषय आपल्या कुस्तीचा आहे…

थंड हवामान, दुध – लोण्याचा सुकाळ, माणसांच कुस्ती प्रेम अन् शाहू महाराजांचा राजश्र ; असे पैलवानकीला पुरक घटक करवीर नगरीत. याच जोरावर देशभरातील मल्ल कोल्हापुरात येऊन घडले. अगदी जगज्जेता गामा देखील येथील तांबडी माती अंगाला लावली. अनेक महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, ऑलम्पिकवीर येथे तयार झाले. परंतु अलीकडच्या काही वर्षात कोल्हापुरातून मल्ल घडवण्याची प्रक्रियाच स्तब्ध झाली. 

विविध जिल्ह्यातून कुस्तीचा सराव करण्यासाठी कोल्हापूर हे ठिकाण निवडणारे मल्ल पुण्याला पसंती द्यायला लागले. अगदी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मल्ल आपल्या मातृभूमी पासून दुर जात पुण्यात सराव करत पैलवानकीतल्या भविष्याचा वेध घेवू लागले. 

ही प्रक्रीया अचानक न होता गेल्या दहा, पंधरा वर्षापासुन कोल्हापुरच्या कुस्तीचे केंद्र पुण्याकडे सरकताना दिसत आहे. परंतु याकडे मात्र कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रातील मंडळी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत गेलं.परिणामी कोल्हापुरच्या मल्लांचा देशात असणारा दबदबा कमी झाला आहे. ‘महाराष्ट्र केसरी’ चा मान मिळवण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून कोल्हापूरच्या मल्लांना यश मिळत नव्हतं. 

तसेच राज्य अजिक्यपद स्पर्धा, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्पर्धेत पुणे, सोलापुरचे मल्ल बाजी मारताना दिसायला लागले. 

जिल्ह्यातील आघाडीच्या मल्लांनी मात्र सरावासाठी पुण्याची निवड करत कोल्हापुरला अनेक दिवसांपासून राम राम ठोकला आहे. तसेच सोलापूर, लातूर, अहमदनगर, सातारा तसेच कानाकोपऱ्यातून कुस्तीच्या सरावासाठी येणाऱ्या मल्लांनी कोल्हापुरकडे पाठ फिरवली. 

ही कुस्ती पंढरीसाठी चिंतेचा विषय ठरली. शाहू महाराजांनी कुस्ती सारख्या रांगड्या खेळावर पुत्रवत प्रेम केले. करवीर संस्थानात अनेक तालमी उभारून देशभरातील मल्लांना आश्रय दिला अन् कुस्ती जगवली. परंतु कुस्ती अडचणीत सापडली.

कोल्हापूर जिल्हातील कुस्ती परंपरेला खो…

राजकीय उदासीनता, कुस्तीच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची कमतरता तसेच निवासी तालमींच्या झालेल्या दुरवस्था मुळे कोल्हापुरच्या कुस्ती परंपरेला खो बसला. जिल्ह्यात घरटी एक तरी पैलवान तालमी पाठवण्याची परंपरा होती. थेट पाकिस्तानातून सरावासाठी कोल्हापुरात मुक्काम ठोकत सादिक पंजाबी सारखा मल्ल येथे घडला. परंतु सध्याचे कुस्ती संघटनांमधील राजकारण, मल्लांमधील हेवेदावे, तालमी मंडळांचे वाद विवाद, इर्षा हे घटक कोल्हापुरच्या कुस्तीला मारक ठरले. 

कोल्हापुरचा सहकार देवू शकतो कुस्तीला उभारी…

कोल्हापूर जिल्हा हा प्रमुख ऊस आणि दुध उत्पादक जिल्हा म्हणुन ओळखला जाते. ऊस शेती तसेच दुधाचा जोड धंदा करणाऱ्या शेतकरी कुटुंबातच पैलवान पोरं वाढत असतात. कुस्तीला चालना मिळावी म्हणुन जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मानधनधारक स्पर्धा भरवल्या.

यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरात पोरं पैलवानकी करु लागली. कारखान्यावरील स्पर्धेत नंबर मारण्याची जणू स्पर्धाच लागली अन् यातून कुस्ती वाढली. अलीकडे या स्पर्धा बंद पडल्या. गोकुळ केसरी, महापौर केसरी, दसरा केसरी, करवीर केसरी यांसारख्या कुस्ती स्पर्धा बंद झाल्याने कोल्हापुरच्या कुस्तीवर परिणाम झाला. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने तसेच दुध संघांनी मल्लांना बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोल्हापुरातल्या तालमी अद्यावत केल्या तसेच चांगले प्रशिक्षक उपलब्ध करुन दिले तर असंख्य महाराष्ट्र केसरी या मातीत तयार होवू शकतात. मल्लांना आर्थिक बळ देण्याची जबाबदारी जिल्ह्यातील राजकीय मंडळींनी, उद्योजकांनी उचलायला हवी. शेवटी कुस्ती ही कोल्हापुरची अन् महाराष्ट्राची शान आहे. कोल्हापुरची कुस्ती टिकली तर महाराष्ट्राची कुस्ती टिकेल हा बोध घेण्याची गरज आहे.

( लेखक मतीन शेख हे पत्रकार व पैलवान आहेत. संपर्क : 9730121246 )

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.