त्यादिवशी जॅकी श्रॉफला पहिल्यांदा वाटलं “भिडू अपुन भी स्टार बन गया…”

कलावंतांच्या आयुष्यात घडलेल्या सुखद घटना आयुष्यभर आनंदाची कारंजी फुलवत असतात. अभिनेता जॅकी श्रॉफ याला देखील एक घटना कायम सुखावत असते. हा किस्सा १९८४ सालचा आहे. त्यावेळी जॅकी श्रॉफ एका चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी चेन्नईला गेला.

जॅकी श्रॉफचा पहिला सुपरहिट सिनेमा ‘हिरो’ प्रदर्शित होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला होता. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटाने इतिहास घडवला होता. पहिल्याच चेंडूवर षटकार मारावा आणि शतक ठोकून सामना जिंकून द्यावा असा काहीसा प्रकार जॅकी श्रॉफ बाबत झाला होता.

‘हिरो’ या चित्रपटाने देशभर सुवर्ण महोत्सवी यश मिळवले होते. 

एका रात्रीत तो तरुणाईचा लाडका नायक बनला होता. या नंतर त्याला चित्रपटाच्या भराभर ऑफर येऊ लागल्या. यातच साईन केलेल्या एका चित्रपटाची चित्रीकरण चेन्नई ला होणार होते. चित्रपट होता ‘मेरा जवाब’ दिग्दर्शक होते एस भारत राज. या चित्रपटाची चित्रीकरण चेन्नईच्या परिसरात होत असल्यामुळे जॅकी श्रॉफ चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये उतरला होता. 

योगायोगाने सुपरस्टार अमिताभ बच्चन देखील याच हॉटेलमध्ये उतरले होते. टी रामाराव दिग्दर्शित ‘इन्कलाब’ या चित्रपटाचे चित्रीकरण त्यावेळी चालू होते आणि यासाठी अमिताभ बच्चन चेन्नईला आले होते.

याच काळातील हा किस्सा आहे. शूटिंग हून आल्यानंतर जॅकी श्रॉफ संध्याकाळी आपल्या रूममध्ये आराम करत असताना,अचानक त्याच्या दरवाज्याच्या कुणीतरी ‘टकटक’ केले. जॅकी ने उठून दार उघडले तर तो आश्चर्यचकित झाला. कारण दारात दोन छोटी मुले होती.

मुलगी दहा वर्षाची आणि मुलगा आठ वर्षाचा. दोघांचे हातामध्ये ऑटोग्राफ बुक आणि पेन होतं. या दोन मुलांना पाहून जॅकी श्रॉफ हक्का बक्का झाला. कारण या दोन मुलांची छायाचित्रे त्याने अनेक मासिकांमधून वर्तमानपत्रातून पाहिली होती. 

या दोन लहानग्यांना पाहून दंग झालेला जॅकी श्रॉफ विचारात असतानाच मुलीने लाडिक आवाजात जॅकी ला विनंती केली ,”अंकल ऑटोग्राफ प्लीज!” जॅकी भानावर आला आणि त्या लगेच दोन्ही मुलांना ऑटोग्राफ दिला आणि चॉकलेटस दिली. दोन्ही मुले “थँक्यू अंकल!” म्हणून क्षणार्धात निघून गेली. 

त्या दोन लहानग्यांना जितका आनंद झाला होता त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद जॅकी श्रॉफला झाला होता. आणि मनोमन तो म्हणू लागला “भिडू आपुन भी स्टार बन गया यार ….” कारण ती दोन छोटी मुले होती अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लहानगी मुले श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन!

हि आठवण २०१६ साली हाउस फुल -३ या सिनेमाच्या प्रमोशन च्या वेळी जॅकी श्रॉफ ने सांगितली. ‘

हि सुखद घटना माझ्या आयुष्यात मी जपून ठेवली आहे. खरं तर मला बच्चन साहेबांचा ऑटोग्राफ हवा होता आणि त्यांचीच मुले बेबी श्वेता आणि छोटू अभिषेक माझा ऑटोग्राफ घ्यायला आले ! I felt like a star ’ याच हाउस फुल -३ चित्रपटात अभिषेक बच्चन यांची देखील भूमिका आहे.

याच प्रेस मध्ये अभिषेक याने सांगितले ,” जॅकी श्रॉफ यांचा मी लहानपणा पासून चाहता होतो. ‘हिरो’ पाहिल्यानंतर मी देखील डोक्याला जॅकी दादा सारखी पट्टी बांधत होतो आणि शेवग्याची शेंग बासरी म्हणून वाजवत होतो. मी आयुष्यात पहिला ऑटोग्राफ जॅकी दादाचा घेतला याचा मला आजही खूप आनंद होतो!” पुढे बऱ्याच वर्षांनी अमिताभ बच्चन यांनी आपला ब्लॉग मध्ये याचा उल्लेख केला होता.त्यात आपली दोन्ही मुले ‘हिरो’ सिनेमा पाहिल्यानंतर जॅकी श्रॉफ चे कसे चाहते झाले होते याचा उल्लेख केला होता.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.