पवारांनी इथे दगड उभा केला तरी तो निवडून येतो असा इतिहास असणाऱ्या जिल्ह्यात पिछेहाट का झाली?

सोलापूर जिल्हा हा तसा सहकाराची मोठी पंढरी असलेला जिल्हा आहे. त्यामुळे इथे पार्ट टाईम शेती आणि फूलटाईम राजकीय गप्पा रंगलेल्या पाहायला मिळतात. अर्थात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला हा जिल्हा असल्याने इथले संपूर्ण राजकारण हे साखर कारखानदारीशी निगडीत आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यातील या जिल्ह्यात सहकारासोबतच राजकारणाचाही मोठा फड पाहायला मिळतो.

मात्र सोलापूर जिल्ह्यातील राजकारणही सुरवातीपासूनच पुरोगामी विचारांना पुरक असेच राहिले आहे. या जिल्ह्यावर संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील भाई राऊळांपासून ते यशवंतराव चव्हाणांसारख्या कॉंग्रेसी विचारधारेच्या नेत्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे शंकरराव मोहिते पाटील, औदुंबर आण्णा पाटील, गणपतराव देशमुख, भाई एस. एम. पाटील ते अगदी अलिकडचे विजयसिंह मोहिते-पाटील या नेत्यांचा मोठा प्रभाव सोलापूर जिल्ह्यातील मतदारांवर आहे.

त्यात ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही सोलापूर जिल्ह्यावर मोठा प्रभाव निर्माण केला आहे. जेव्हा जेव्हा शरद पवारांना संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी सोलापूर जिल्ह्याला झुकतं माप दिल्याचं पहायला मिळते. अगदी सोलापूरचे पालकमंत्रीपदही शरद पवारांनी भूषविले आहे. अर्थात त्यामागे यशवंतराव चव्हाणांचा प्रभाव होता हे वेगळे सांगायला नको.

शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत हे एव्हाना सिद्धच झाले आहे. त्यामुळे शरद पवार हे सुरवातीपासूनच सोलापूर जिल्ह्यावर आपले वर्चस्व राखून आहेत. त्यामुळेच शरद पवारांनी नेहमी सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही फळीतील नेत्यांवर आपला प्रभाव टिकवून ठेवला आहे. सुरवातीला कॉंग्रेस मधून बाहेर पडल्यावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील तत्कालीन नेत्यांना आपल्या मुठीत ठेवले होते. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील वगळता बाकीच्या नेत्यांनी शरद पवारांचे नेतृत्त्व स्विकारले होते.

मात्र नंतरच्या काळात शरद पवार पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी पुन्हा राज्यावर आपल्या नेतृत्वाची पकड मजबूत केली. दरम्यान शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यावरही आपले लक्ष केंद्रीत केले. सुरवातीला शहरी तोंडवळा असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर जिल्ह्याचे सत्ताकेंद्र असलेल्या करमाळ्यातून तत्कालीन प्रमुख नेतृत्व असलेल्या नामदेवराव जगताप यांच्या मर्जीविरोधात जाऊन रातोरात तिकीट मिळवून देत विधानसभेत निवडून आणले ते शरद पवारांनी. त्यामुळे शरद पवार काय करू शकतात हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याने पाहिले. कारण त्यावेळी नामदेवराव जगताप म्हणजे सोलापूर कॉंग्रेसचे प्रमुख सत्ता केंद्र होते. त्यांच्याशिवाय कॉंग्रेसमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पान हालत नव्हते.

मात्र शरद पवारांनी सोलापूरकरांना पहिला धक्का दिला तो करमाळ्यातून.

त्यानंतर मात्र शरद पवरांनी कॉंग्रेस सोडून आपला सवतासुभा मांडत इसवी सन 1999 साली आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी मात्र त्यांनी सोलापूर जिल्ह्यावर आपली पकड मजबूत केली. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठी राजकीय रसद मिळाली ती सोलापूर जिल्ह्यातून. पश्चिम महाराष्ट्रात आपले वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला गरज होती ती सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्याची.

त्यामध्ये आघाडीवर होते ते विजयसिंह मोहिते-पाटील. शरद पवारांनी राज्यातील कॉंग्रेस फोडत राष्ट्रवादीची ताकद वाढविण्याचे ठरवले होते. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते असलेले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या गटाची जबाबदारी होती ती म्हणजे अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठिशी किमान पंचवीस ते तीस आमदार होते. त्यामुळे शरद पवारांनी आपले शिष्य असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना कॉंग्रेसमध्येच ठेवत विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठी मोठी गळ घातली. डावपेच आखले आणि अखेर शरद पवारांच्या मोठ्या आश्वासनानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

असे बोलले जाते की जर विजयसिंह मोहिते पाटील कॉंग्रेसमध्येच राहिले असते तर विलासराव देशमुख यांच्या जागी विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते.

मात्र शरद पवारांनी आपला डाव साधत विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रीय केले आणि पक्षातील नंबर एकचे नेते म्हणून प्रस्थापित केले. तिथून पुढे मात्र सोलापूर जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे बदलले.

कधीकाळी कॉंग्रेसचा गड असणारा सोलापूर जिल्हा शरद पवारांच्या कव्हेत गेला आणि येथील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलली. शरद पवारांनी मोहिते पाटलांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठा झंझावात निर्माण केला.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस एवढी मजबूत झाली की, राष्ट्रवादीने एखादा दगड जरी निवडणुकीत उभा केला तर तो निवडून येत असे. अशी ताकद राष्ट्रवादीची तयार झाली होती. साधारणपणे 2000 सालापासून सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीमय झाला. यामध्ये प्रत्येक तालुक्याची ओळख ही त्या त्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याच्या नावाने ओळखला जाऊ लागला.

उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, बार्शी म्हंटलं की, दिलीप सोपल, मोहोळ म्हंटले की, राजन पाटील, पंढरपूर म्हंटले की सुधाकरपंत परिचारक, माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्याचा विचार आला की विजयसिंह मोहिते पाटील, सांगोल्यात शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि राजकारणातले भीष्माचार्य असलेले गणपतराव पाटील हे शरद पवारांच्या शब्दापुढे कधी जात नव्हते. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तसेच उत्तर सोलापूर तालुक्यात शरद पवारांनी सुरवातीपासूनच लक्ष घातले नाही. कारण तो भाग सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. कारण बेरजेचे राजकारण आणि शह काटशह करण्यासाठी कॉंग्रेसचा उपयोग शरद पवारांनी खुबीने केला होता.

विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यातील वितुष्ठ आजतायागायत गेले नाही. सुरूवातीपासूनच मोहिते पाटील यांच्याकडे सोलापूर ग्रामीणचा कारभार होता. तर शहरात मात्र सुशीलकुमार शिंदे हेच प्रमुख नेते होते. असे बोलले जाते की, शरद पवारांनी या दोन्ही नेत्यांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला नाही. कारण सोलापूर जिल्ह्यावर आपले वर्चस्व राखण्यासाठी पवारांनी दोघांचाही खुबीने वापर केला. त्यामुळे हो दोन नेते एकमेकाविरोधात कायम शह काटशह करीत राहिले आणि त्याचा फायदा शरद पवारांना असा झाला की, दोघातील वाद मिटवण्यासाठी शरद पवारांशिवाय तिसरा नेता राहिला नाही. त्यामुळे आपोआप दोघांनीही शरद पवारांचे नेतृत्व कायम स्विकारले.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकत किती होती. ?

सोलापूर जिल्हा हा सहकाराची पंढरी असल्याने इथले राजकारण कायमच साखर कारखानदारीभोवती फिरत राहिले. पर्यायाने सहकाराशिवाय सोलापूर जिल्ह्याचे राजकारण आजही होताना दिसत नाही. सोलापूर जिल्हा हा दुष्काळ प्रवण जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी वास्तव तसे नाही. जिह्यातील बोटावर मोजण्याइतके तालुके हे दुष्काळप्रवण क्षेत्रात येतात. त्यामुळे उर्वरीत भागात मात्र हरितक्रांती असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची सहकारातील सर्व सुत्रे आपोआपच राष्ट्रवादीकडे गेली. कारण ज्या तालुक्यात हरितक्रांती झाली त्या सर्व तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते सत्तेत होते. माळशिरस, पंढरपूर, माढा, मोहोळ, बार्शी या तालुक्यात कायम सहकाराची सुत्रे फिरत राहिली.

जिल्हा परिषद, जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सर्व राजकारण हे राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिले. साखर कारखानदारीही याच पट्ट्यात सर्वाधिक वाढली. यात राष्ट्रवादीचे नेतेच आधाडीवर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीचा झेंडा कायम सोलापूर जिल्ह्यात फडकत राहिला. सहकारातूनच शरद पवारांना सोलापूर जिल्ह्याची नस सापडली आणि त्यांचा यशस्वी किंवा बेरजेच्या राजकारणाचा एक मोठा आलेख सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून तयार झाला. त्याबळावरच शरद पवारांनी कॉंग्रेसला कायम वेठीस धरून ठेवले हे वेगळे सांगायला नको.

कधीकाळी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार असत. त्याशिवाय इतर पक्षीय आमदारही पवारांवरच अवलंबून असत.

राष्ट्रवादीची पिछेहाट कशी आणि कोणामुळे सुरू झाली?      

सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा तालुके आहेत. त्यातील अकरा आमदार तसेच दोन विधान परिषद असे मिळून तेरा आमदार सोलापूर जिल्ह्यात आहेत. 2003-04 सालापार्यंत सोलापूर जिल्ह्यातील राजकीय महत्वाकांक्षा ठिकठाक होत्या. मात्र त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय गणितं वेगाणं बदलली गेली. कारण 2003 साली राज्याचे मुख्यमंत्रीपद सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलायला सुरूवात झाली. कारण सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री करून कॉंग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकत वाढविण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सतर्क होत शिंदेंना काटशह देण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्रीपद दिले. अर्थात राजकीय अपरिहार्यतेतून ते द्यावे लागले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सोलापूर जिल्ह्याचे महत्व अधिक वेगाने वाढले.

तिकडे राष्ट्रवादीतीलच तत्कालीन युवराज मानले जाणाऱ्या अजित पवारांना मात्र ही गोष्ट फारशी रूचली नाही. उपमुख्यमंत्रीपदाचे आपण दावेदार असताना विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याची सल अजित पवारांच्या मनात कायम सलत राहिल्याचे बोलले जाते. तिथूनच खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादीला घरघर लागायला सुरूवात झाली.

त्यातच विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्रीपद देणे हे शरद पवारांनाही रुचलेले नव्हते. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीत सर्वात शेवटचा प्रवेश झाला तो विजयसिंह मोहिते पाटलांचा.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील गटाचे प्रमुख असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांना अनेक दिवस टांगणीला ठेवले होते. मोठ्या मिनतवाऱ्या केल्यानंतर  मोहिते पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले होते. त्यामुळे मोहिते पाटलांचे राजकीय वजन कमी करण्याची योजन शरद पवारांनी तेव्हाच आखली होती असे बोलले जाते. त्यानंतर पुढे 2003 साली विजयसिंह मोहिते पाटलांना द्यावे लागलेले उपमुख्यमंत्रीपद हे पवारांचे राजकीय दुखणे बनल्याचे बोलले जाते.

त्यांनतर मात्र शरद पवार असतील किंवा अजित पवार यांनी मोहिते पाटलांचे खच्चीकरण करण्यास सुरूवात केली.

अजित पवारांनी टप्प्याटप्याने सोलापूर जिल्ह्यात लक्ष घालायला सुरूवात केली. तर पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या सोलापूर जिल्ह्यातील हस्तेक्षेपाला मूकसहमती दिली. याचाच परिपाक म्हणजे, 2009 साली विजयसिहं मोहिते पाटलांचा मतदारसंघ असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाला किंबहुना तो करण्यात आला.

यामध्ये असे सांगितले जाते की, माढा आणि पंढरपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश करून माळशिरस मतदारसंघ राखीव केला गेल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांना हक्काचा मतदारसंघ सोडून सुधाकरपंतांच्या पंढरपूर मतदारसंघात जावे लागले.  2003 ते 2009 या कालावधीत मोहिते पाटील कुटुंबातही कुरभूरी वाढल्या आणि विजयसिंहांचे छोटे बंधू असलेले प्रतापसिंह मोहिते पाटील हे देखील दुरावले गेले.

त्यामुळे जिल्ह्याचे नेते असलेले मोहिते पाटील यांना 2009 साली पक्षातूनच दगाफटका झाला आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटलांना पराभव स्वीकारावा लागला. दिवंगत आमदार भारत भालके यांनीच त्यांचा पराभव केला होता. तेथून मात्र सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पिछेहाट सुरू झाली. कारण विजयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणातून आपले लक्ष काढून घेतले.

असे बोलले जाते की, शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटीलांचे वर्चस्व संपुष्ठात आणण्यासाठीच ही खेळी केली होती. त्यानंतर मात्र मोहिते पाटील हे केवळ दात काढलेले सिंह राहिले. कारण एकेकाळी उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्याला स्वतचा मतदारसंघही न राहणे ही काही योगायोगाने घडलेली गोष्ट नव्हती तर ती जाणीवपूर्वक समजून उमजून केलेली खेळी होती. याला शरद पवारांची मूकसहमती होती असे बोलले जाते.

कारण मोहिते पाटलांनी पक्षप्रवेसाठी शरद पवारांना बऱ्याच मिनतवाऱ्या करायला लावल्या होत्या. त्याचा राग पवारांच्या मनात असणे स्वाभाविक होते.

दरम्यान मोहिते पाटलांच्या वर्चस्ववादाला कंटाळलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मोट बांधण्यात अजित पवार यशस्वी झाले होते. कारण जोवर मोहिते पाटलांचे राजकीय वर्चस्व आहे तोवर अजित पवारांना मंत्रीमंडळात मोठे स्थान मिळणे कठीण होते. त्यामुळे अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील संजय मामा शिंदे, दीपक आबा साळुंखे, प्रशांत परिचारक आदी नेत्यांना बळ दिले. त्यांच्या माध्यमातून मोहिते पाटील कुटुंबाला मोठा काटशह देण्यात अजित पवार यशस्वी झाले.

मात्र हे करत असताना पवार कुटुंबाच्या हे लक्षात आले नाही की, मोहिते पाटलांची पाटीलकी मोडीत काढताना सोलापूर जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात येत आहे. एक एक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ हातातून निसटत चालला आहे. अनेक नेते ज्यांना मोहिते पाटलांच्या पर्यायी उभे केले ते देखील पक्षापासून फारकत घेत होते.

याचा परिणाम असा झाला की, वर्षानुवर्ष ताब्यात असलेली सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर दूध संघ, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राष्ट्रवादीच्या हातून निसटत गेल्या.

त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाला राजकारणातून हद्दपार करण्याच्या नादात पवारांनी आपला पक्षच पणाला लावला. त्याचीच परिणती म्हणजे अजित पवारांना पंढरपूर पोटनिवडणुकीत गल्लोगल्ली भटकण्याची वेळ आली आणि परिणामी पंढरपूर पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

पंढरपूर, माळशिरस या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपने विजय संपादन केला आहे. कारण या दोन्ही मतदारसंघात मोहिते पाटलांचे वर्चस्व अद्यापही अबाधित आहे. त्यामुळे पवारांनी एखादा दगड जरी सोलापूर ग्रामीण मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरवला तर तो निवडून येत होता आज मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. या परिस्थितीला केवळ आणि केवळ पवार कुटुंबच जबाबदार असल्याचे पाहायला मिळते.

–  सागर सुरवसे ( मुक्त पत्रकार, सोलापूर)

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.