या कारणांमुळे प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटिश राजघराण्यातून बाहेर पडले होते…

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय आणि राजेशाही थाटात १९ सप्टेंबरला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राणीच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मात्र या सगळ्या कार्यक्रमादरम्यान जास्त चर्चा झाली ती फक्त प्रिन्स हॅरी आणि प्रिन्सेस मेगन मार्केल यांची.

कारण राजघराण्यातून बाहेर पडलेल्या हॅरी आणि मेगनला अंत्यसंस्कारासाठी बोलावलं जाईल की नाही यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र सर्व चर्चांना फुल स्टॉप देऊन त्या दोघांनाही अंत्यसंस्काराला बोलावण्यात आलं. पण आता सुद्धा सोशल मीडियावर या दोघांचीच चर्चा चाललीय.  काही म्हणतात की, प्रिन्स हॅरीने अंत्यसंस्काराच्या वेळेस राणीचा सन्मान केला नाही, तर काही जण म्हणतात की दोघांनाही राजघराण्याने योग्य वागणूक न देता सावत्र वागणूक दिलीय. 

आता लोकांचं बोलणं कोणत्याही बाजूनं असलं तरी या घटनाक्रमाची सुरुवात हॅरी आणि मेगन यांनी राजघराणं सोडलं तेव्हापासून झालीय.

८ जानेवारी २०२० ला ब्रिटनमधील सगळ्या पेपर्सच्या पहिल्या पानावर फक्त आणि फक्त एकच बातमी छापण्यात आली होती. ती म्हणजे महाराणी एलिझाबेथ यांचा नातू प्रिन्स हॅरी आणि त्याची बायको मेगन या दोघांनीही राजघराणं सोडलंय, यामुळे राजघराणं तुटलंय. या बातमीमुळे ब्रिटनमध्ये चांगलीच खळबळ उडली होती. 

हॅरी आणि मेगन यांनी ब्रिटिश राजघराणं सोडून कॅनडामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दोघांनी म्हटलं होतं की, 

“राजघराण्यातील जेष्ठ लोकांपेक्षा वेगळ्या मार्गावर जाऊन आम्ही फक्त सगळे दायित्व आणि आर्थिक अधिकार सोडत आहोत. परंतु राजघराणं आणि महाराणीप्रती आमची निष्ठा कायम असेल. आम्ही नेहमी परिवाराशी जुळलेलेच राहणार आहोत.”

असं बोलून ते दोघेही कॅनडाला गेले पण जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ज्यात त्यांनी राजघराण्यावर अनेक आरोप केले होते. त्यांनी अनेक गौप्यस्फोट सुद्धा केले  होते. त्यातून दोघांच्या राजघराणं सोडण्यामागे असलेल्या कारणांची माहिती दिली होती. 

१. ब्रिटिश मीडिया अगदी छोट्या छोट्या गोष्टी प्रसिद्ध करत होती.

ब्रिटिश राजघराण्यात काहीही झालं तरी तिथल्या लोकांना ते वाचायला आवडतं. अगदी राजघराण कोणत्या इव्हेंटला गेलं असेल किंवा सुट्टीसाठी बाहेर ठिकाणी गेलं असेल तरी सुद्धा त्या बातम्या मोठ्या हेडलाईनमध्ये छापल्या जातात.

त्यातच भर म्हणजे मेगन या राजघराण्यातल्या पहिल्या मिश्र वंशीय व्यक्ती होत्या आणि हॉलीवूडच्या अभिनेत्री होत्या त्यामुळे मीडियात त्यांच्या अगदी बारीक गोष्टी सुद्धा छापल्या जात होत्या. मेगन गर्भवती असताना, त्यांच्या अगदी खाजगी आयुष्यातल्या घटना सुद्धा मीडियाने प्रसिद्ध केल्या होत्या त्यामुळे दोघेही या त्रासाला कंटाळले होते. 

२. रॉयल ड्युटीचा प्रोटोकॉल

ब्रिटन आणि संपूर्ण कॉमनवेल्थ देशांचं प्रमुखपद महाराणीकडे आहे. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना महाराणी एलिझाबेथ यांनी उपस्थित राहणं हा प्रोटोकॉल असतो. पण महाराणीचं वय झाल्यामुळे प्रमुख कार्यक्रम सोडून बाकी कार्यक्रमात त्या मुलगा प्रिन्स चार्ल्स तसेच नातू विल्यम आणि हॅरी या दोघांनाही पाठवत होत्या.

जगभरातील एकूण ३ हजार संस्थांचं अध्यक्षपद राजघराण्याकडे आहे. त्यातील २०० संस्थांचे अध्यक्षपद प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे आहे. २०१९ या वर्षात तब्बल २,२०० कार्यक्रमात राजघराण्यातील लोकं सहभागी झाली होती. या कार्यक्रमात सहभागी होणं आणि त्यात अगदी राजेशाहीपद्धतीने काटेकोरपणे राहणं  हे अवघड काम होतं. याचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा प्रिन्स हॅरीनं हा निर्णय घेतला होता. 

३. मेगन मार्केल यांच्यासोबत आफ्रिकन वंशावरून भेदभाव व्हायचा.

मेगन यांची आई ही आफ्रिकन वंशाची अमेरीकन नागरिक आहे तर वडील युरोपियन वंशाचे आहेत. आई आफ्रिकन असल्यामुळे मेगन मिश्र वंशीय आहेत. याच गोष्टीवरून त्यांच्यासोबत कायम परिवारात भेदभाव केला जायचा, असे आरोप मेगन यांनी केले होते.

मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, “आर्चीच्या जन्माआधी कुटुंबातील सदस्यांची प्रिन्स हॅरीसोबत चर्चा झाली होती, की त्यांना बाळाचा रंग काय असेल याची चिंता सतावत होती. बाळ जन्माला येईल तेव्हा रंग गोरा नसेल याची चिंता असल्याने राजघराणं त्याला प्रिन्स करण्यासाठी तसंच कोणतीही सुरक्षा पुरवण्यास इच्छुक नव्हतं.” 

मेगनच्या या आरोपामुळे अनेकांनी ब्रिटिश राजघराण्यावर टीका केली होती. अनेकांनी त्यांना उपरे म्हणून हिणवायला सुरुवात केली. राणीच्या पुतळ्याखाली पॅरासाईट म्हणजेच उपरे असं लिहिण्यात आलं. 

४. प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी या दोघांमध्ये सुद्धा मतभेद वाढले होते.

विल्यम आणि हॅरी या दोन्ही भावांमध्ये अतिशय जवळचे संबंध होते. दोघेही एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे. मात्र हॅरी आणि मेगनच्या विवाहानंतर दोघांमध्ये ती जुनी जवळीकता राहिली नाही. दोघांचं बोलणं बंद झालं होतं तसेच काही मुद्यांवरून वाद सुद्धा व्हायचे त्यामुळे हॅरीने या सगळ्यातून  निर्णय घेतला.

या कारणांसोबतच मेगनला नसलेला राजकीय वारसा, मेगनचं हॉलिवूड अभिनेत्री असणे, तिची राजघराण्याच्या प्रोटोकॉलच्या पलीकडे जाऊन मुक्तपणे जगण्याची पद्धत. या सगळ्यांवरून सुद्धा तिला परिवारात डावललं जात होतं असेही आरोप दोघांनी लावले होते.

पण ब्रिटिश राजपरिवार सोडणारे हॅरी आणि मेगन हे एकमेव नाहीत. त्यांच्याआधी १९३६ मध्ये किंग एडवर्ड यांनी सुद्धा आपलं राजपद सोडलं होतं. 

एडवर्ड यांना एका अमेरिकी महिलेबरोबर लग्न करायचं होतं. त्या महिलेचा आधीच दोनवेळा घटस्फोट झालेला होता. पण ही गोष्ट इंग्लंडच्या चर्चच्या नियमांच्या विरोधात होती. त्यामुळे प्रेमासाठी त्यांनी आपलं राजपद सोडून दिलं होतं.

त्यानंतर १९९६ मध्ये प्रिन्सेस डायना यांनी प्रिन्स चार्ल्स यांच्यापासून घटस्फोट घेतला. तेव्हा त्यांनी त्यांची हर हायनेस ही पदवी सोडली होती. तसेच राजपरिवाराच्या संपूर्ण ९२ जबाबदाऱ्या सुद्धा सोडून दिल्या होत्या. तर २०१७ मध्ये महाराणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांनी वय वाढल्यामुळे ९६ व्या वर्षी रॉयल जीवनातून रिटायरमेंट घेतली होती. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.