साधी FIR दाखल नसतांना किरीट सोमय्या यांचे पुत्र जामिनासाठी कोर्टात का गेले ?

भाऊ राज्यात काय सुरु असं जर तुम्ही शेजाऱ्याला जरी विचारलं तर नक्कीच एक उत्तर देईल ‘ईडी’च्या कारवाया. नगरसेवकांपासून ते बड्या बड्या नेत्यांना या ईडीच्या कारवाईला सामोरं जावे लागत आहे. भाजप नेते तर भविष्यवाणी प्रमाणे कोणाकोणावर कारवाई होणार याची यादीच माध्यमांना देत आहे.

यात पहिला क्रमांक लागतो तो भाजप नेते किरीट सोमय्या यांचा. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते केंद्र सरकारवर आरोप करत आहेत की, भाजप नेते किरीट सोमय्या ईडीचे एजन्ट असल्याचा आरोप करत आहेत. त्यांच्याकडे अगोदरच कशी माहिती येते ? त्याच्या इशाऱ्यावर ईडी चालत असल्याचा आरोप करत आहेत. त्यानंतर आता सोमय्या महाविकास आघाडीच्या रडारावर असल्याचे बोलले जात आहे. आता महाविकास आघाडीकडून किरीट सोमय्या यांना लक्ष करण्यात येईल  असही सांगण्यात येतंय.   

महाविकास आघाडी सोमय्या विरोधात फास आवळणार? 

महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांना, नेत्यांना घाम फोडणाऱ्या किरीट सोमय्या विरोधात राज्य सरकार फास आवळण्याच्या तयारीत आहे. त्याचे सूतोवाच यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला जेलमध्ये पाठवणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांचे थेट नाव घेतले होते.

आता त्यांच्या विरोधात थेट कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. 

सोमय्या पिता-पुत्रावर कुठले आरोप आहेत  

 सोमय्या बाप-बेटे १०० टक्के जेलमध्ये जात आहेत. दुसऱ्याला जेलमध्ये घालवायचे धमक्या देतात, आता तुम्ही जा, असे थेट आव्हान राऊत यांनी होते. सोमय्या यांचे पुत्र नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. या प्रकल्पासाठी सोमय्यांनी ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा असल्याचा आरोप राऊत यांनी केला  होता.

त्यावर उत्तरं देतांना किरीट सोमय्या म्हणाले होते

संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तरं देतांना किरीट सोमय्या म्हणाले की, नील वा माझा वाधवानशी संबंध नाही, पीएमसी बँकेशीही संबंध नाही. वास्तविक, पीएमसी बँकेतील घोटाळा मीच उघड केला होता. आम्हाला तुरुंगात टाकायचे तर खुशाल टाका.

आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, आम्ही घाबरत नाही असेही ते म्हणाले होते.

या सर्व प्रकारानंतर आता किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांनी कोर्टात धाव घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

याबाबात बोल भिडूशी बोलतांना ज्येष्ठ वकील बाळासाहेब खोपडे म्हणाले की, 

एफआयआर (FIR) दाखल होण्यापूर्वी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात जाता येत. न्यायालयाला लक्षात आणून द्यावे लागते की,  विनाकारण अटक होण्याची शक्यता आहे. तसेच एफआयआर दाखल करण्यापूर्वी  ७८ तास आगोदर सूचना देण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते.  कायद्यात अशा प्रकारची तरदूत असल्याचे खोपडे यांनी सांगितले.  

आता किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या हे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात गेले आहेत. मात्र शुक्रवारी न्यायाधीश उपलब्ध नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  

 तर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी म्हणजेच निल सोमय्या हे न्यालयालात गेले त्याच दिवशी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी  दिल्ली येथे विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले होते. 

तर इकडे महाविकास आघाडीचे सरकार सोमय्या विरोधात मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.   

 हे हि वाच भिडू 

 

 

   

 

Leave A Reply

Your email address will not be published.