गोव्यात ममता दीदींनी जे करुन दाखवलं ते एवढ्या वर्षात राष्ट्रवादी आणि सेनेला का जमलं नाही ?

गोवा आणि पश्चिम बंगाल यांच्यामध्ये साधर्म्य ते काय ?

समुद्र किनारा एक या टोकाला त्व दुसरा त्या टोकाला. त्यात आणि पश्चिम बंगाल प्रसिद्ध कशासाठी तर वाघांसाठी. याच राज्याची एक वाघीण गोवेकारांच्या शिकारीवर आली. बघता बघता तिने हाताचा प्रभाव असलेली माणसं आपल्या तृणमूल मध्ये पळवली. आणि मग चर्चा सुरु झाली…

आमचा महाराष्ट्रातला वाघ कुठाय ?

जर विषय अजूनही समजला नसेल तर पश्चिम बंगाल मधून येऊन ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या राजकारणात आपला पंजा मारतो पण गोव्यापासून हाकेच्या अंतरावरील महाराष्ट्रातल्या शिवसेना, राष्ट्रवादी यांसारख्या प्रादेशिक पक्षांची डाळ गोव्याच्या राजकारणात शिजत नाही. कारण काय ? याला गोव्याच्या पाण्याचा गुण म्हणायच का प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा ?

तर या घटनाक्रमाला सुरुवात होते दीदी खेला होबे या वाक्याने.

भाजपने सुरुवातीच्या टप्प्यात तृणमूल फोडायला सुरुवात केली. ममता दिदींच्या पक्षातला एकेएक मासा आपल्या गाळाला लावायला भाजपने सुरुवात केली. पण ममता बॅनर्जी यांनी जिद्द बाळगून पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव केला. दिदींनी आत्ताच करिष्मा केला असं नाही तर त्यांनी या आधीही पश्चिम बंगलमधली डाव्या पक्षांची राजवट संपवली.

भाजपला नेस्तनाबूत केल्यावर ममता दीदींनी मोर्चा वळवला तो अन्य राज्यांकडे. यात गोवा ही एक राज्य होत.

ममता बॅनर्जी यांनी गोव्यात तीन वेळेला दौरे केले. प्रत्येक वेळच्या दौऱ्यात त्यांनी भाजपवर तोंडी तोफा डागल्या, काँग्रेस फोडली. राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. आणि आपल्या तृणमूल काँग्रेस पक्षाची तळापासून बांधणी सुरू केली.

आता यात त्यांना यश किती येईल? एकाच निवडणुकीत पक्ष किती मोठा होईल? हा भाग लांब राहिला तर ममता बॅनर्जी या राजकीय लक्ष्य केंद्रित करून काम करतात आणि ते देखील आपल्या पश्चिम बंगाल या राज्याची मर्यादा ओलांडून काम करतात हे यावेळी सिद्ध झालं.

पण तशी जिद्द महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वांना का दाखवता आली नाही ?

बघायला गेलं तर प्रादेशिक पक्षाच्या पुढं जाऊन इतर राज्यांमध्ये आपली जादू दाखवायला शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक संधी होती. त्यांच्याकडे बाकीच्या राज्यांमधले अनेक तडफदार नेते होते. पी. ए. संगमा, तारिक अन्वर, गुजरात मधले छबिलदास मेहता, डी. पी. त्रिपाठी ही नावे लहानसान नावं नव्हती. या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पुरेसे पाठबळ दिले असतं तर पुर्वोत्तर राज्ये, बिहार, गुजरात हिंदी पट्ट्यातील राज्य यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आपला पायरोवा करता येणे, संघटन उभे करणे शक्य होते.

आत्ताच बघाल तर ममता बॅनर्जी यांनी ज्या तडफेने बाकीच्या राज्यांचा दौरा केला, त्या तडफेने राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाच्या नेतृत्वांनी असे राज्यांचे दौरे केलेले दिसले नाहीत.

सध्या गोव्यात काय चित्र आहे ?

गोव्यातील सत्ता कायम राखण्याचे सध्या भाजपापुढे आव्हान आहे. कारण यंदाची लढत ही बहुरंगी होत आहेत. भाजप, काँग्रेस या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांबरोबरच आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस ताकदीने रिंगणात उतरले आहेत. याशिवाय महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड हे छोटे पक्ष आहेतच.

पश्चिम बंगालच्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने गोव्यावर सारं लक्ष केंद्रित केलयं. बहुरंगी लढतीमुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तृणमुलने हवा तयार केली असली, तरी बंगालच्या पक्षाला गोवेकर साथ देतात का, हे सुद्धा महत्त्वाचे असेल. कारण गेल्या निवडणुकीत आपने अशीच हवा तयार केली होती, पण आम आदमी पार्टीला तेव्हा भोपळाही फोडता आला नव्हता.

माजी मुख्यमंत्री एदुआरो फलोरे यांच्यासह काही काँग्रेसच्या आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलला यशाची अपेक्षा आहे. किमान काँग्रेसला मागे टाकून पुढे जावे हे पक्षाचे ध्येय आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कारभाराबद्दल टीकाच जास्त झाली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत कारभार हाताळण्यावरून मुख्यमंत्री सावंत यांच्या मर्यादा दिसून आल्या. अगदी काँग्रेसमधून भाजपावासी झालेले आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली. मुख्यमंत्री सावंत यांच्या कार्यक्षमतेबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही जाहीरपणे प्रतिकूल मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर मलिक यांची गोव्यातून उचलबांगडी करण्यात आली होती.

गोव्यातील ख्रिश्चन मतदारांची मते मिळावीत या दृष्टीने भाजपाचे प्रयत्न आहेत. मध्यंतरी इटली दौऱ्याच्या वेळी मोदी यांनी व्हॅटकिनमध्ये जाऊन पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली तेव्हा गोव्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच ही भेट घेतल्याचा आरोपही झाला होता.

आता येऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे.

तर सांगायच तात्पर्य कोणतही नेतृत्व एक दोन निवडणुकांमध्ये उभं राहत नाही. संघटन उभे करण्यासाठी भरपूर खपावे लागतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व संघटन उभे करण्यासाठी महाराष्ट्रात जरूर खपतात. पण बाहेरच्या राज्यांमध्ये तसं होताना दिसत नाही. अगदी गोव्यासारख्या बाजूच्याच राज्यात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कित्येक वर्षात गेले नसतील तर मग अवघडाय!

Leave A Reply

Your email address will not be published.