पहिल्या पावसात मातीचा जो सुगंध येतो, त्यामागे एक बॅक्टेरिया असतो..
परवा पुण्यात पहिला पाऊस आला तसं आमचं ऑफिस फूल चहा, भजी आणि शायरी मूडमध्ये गेलं. सगळ्या भिडूंचे कावलेले मूड लागलीच बदलले. कोणी पावसाला मिस केलं होतं तर कोणी पाऊस पडल्या पडल्या येणाऱ्या मातीच्या सूवासाला…
मग बाकीच्यांचे खायचे प्यायचे आणि फिरायचे प्लॅन्स व्हायला लागले पण मला प्रश्न पडलेला की हा मातीचा सुवास खरच मातीचाच असतो की अजून कसला? आता गावाकडे मातीचा सुगंध आला असं म्हणलं तर ठिके पण सीमेंट आणि कोंकरिटच्या शहरात सुद्धा सेम वास कसा काय येतो असा प्रश्न मला सतावत होता.
म्हंणलं उत्तर शोधायला पाहिजे, आणि उत्तर शोधून लागलीच तुम्हाला येऊन सांगायला पण पाहिजे.
आता सुरवातीलाच तुम्हाला एक धक्का देते.. आपण वर्षानु वर्ष ज्या मातीच्या वासाला ‘सुवास आणि सुगंध म्हणत आलोय किंवा ज्या सुवासाशी संबंधित, अनेक कवि लोकांनी आपल्या काव्य रचना रचल्यायत तो खरा असतोय बॅक्टीरियाचा वास..
हो बॅक्टीरियाचा!
या बॅक्टीरियाचं नाव आहे, ॲक्टीनोमायसीटीज. जेव्हा माती ओलसर असते त्यावेळी हा बॅक्टीरिया मातीत वाढतो. आणि माती ज्यावेळी सुकलेली असते त्यावेळी हा ॲक्टीनोमायसीटीज बॅक्टीरिया मातीचे स्पोअर्स म्हणजेच बिजुकं तयार करतो.
जेव्हा मग पावसाचं पाणी जमिनीवर पडतं तेव्हा हेच स्पोअर्स पावसाच्या पाण्यामुळे हवेत पसरतात आणि आपल्या नाकात शिरतात. आणि म्हणून पाऊस पडला की आपल्याला एका विशिष्ठ पद्धतीचा वास यायला सुरवात होते.
हे स्पोअर्स खूप कठीण असतात. खूप तापमान, थंडी, वारा, दुष्काळ सगळं काही पचवायची त्यांच्यात क्षमता असते.
पाऊस पडल्यानंतर येणाऱ्या या विशिष्ठ वासाला नाव सुद्धा आहे. या वासाला ‘पेट्रीकॉर’ असं म्हणतात. ‘पेट्रीकॉर’ हा शब्द मुळात ग्रीक शब्द आहे. शब्दाची फोड करायची झाली तर पेट्रा म्हणजे दगड आणि इकॉर म्हणजे द्रव्य, अशी या शब्दाची फोड होते.
येणाऱ्या या विशिष्ठ वासाला काही लिमिटेशन्स सुद्धा नाहीयेत. फक्त जमीन ओली व्हायचा अवकाश.. हा वास आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही पाऊस पडला की अनुभवता येतो.
आता हे स्पोअर्स सर्वत्र पसरण्याचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे आपल्याप्रमाणेच हा सुगंध इतर किडे आणि कीटकांना सुद्धा आकर्षित करून घेतो, मग हे स्पोअर्स किडे आणि किटकांना सुद्धा जाऊन चिकटतात आणि किड्यांवाटे आणखीनच पसरतात.
शिवाय पडणाऱ्या पावसामुळे त्यांना पाणी आणि ऊबही मिळते त्यामुळे ते वाढतात, वाढत जातात आणि आपल्याला मातीचा सुगंध आणखीन आणखीन एंजॉय करू देतात.
अजून एक सुवास जो आपल्याला पाऊस पडायला सुरवात होण्याआधीच येतो. तो का येतो, त्यालाही एक कारण आहे.
जेव्हा पाऊस सुरू होण्याआधी आकाशात ढग गडगडायला लागतात, विजा चमकायला लागतात, सोसाट्याचा वारा वाहायला लागतो, तेव्हा हवेतले ऑक्सिजन वायूचे अणू विभागायला सुरवात होते. आणि त्यातलेच काही पार्टिकल्स पुन्हा ओझोन वायुत रूपांतरित होतात.
आता ‘ओझोन’ हे सायंटिफिक नाव जरी असलं तरी हा सुद्धा एक ग्रीक शब्दच आहे, आणि ओझोन या शब्दाचा ग्रीक अर्थ म्हणजे वास, स्मेल.
हाच ओझोन वायु वाहणाऱ्या वाऱ्यासोबत सगळीकडे पसरत जातो आणि तोच आपल्या नाकातही शिरतो. आणि म्हणून पाऊस सुरू होण्याआधीही एक विशिष्ठ प्रकारचा वास आपल्याला येत असतो.
थोडक्यात म्हणजे पाऊस पडल्यावर येणाऱ्या मातीच्या सुगंधामागे कितीही सायन्स आणि लॉजिक असलं तरी आपण त्याला मातीचाच सूगंध म्हणायला काही हरकत नाही. पावसाचं तर कौतुक आहेच पण या सुगंधासाठी सुद्धा आपण वर्षभर तरसतच असतो की..
हे ही वाच भिडू:
- पाऊस आल्यावर लाईट का जाते ? MSEB वाले म्हणतात…
- मृग नक्षत्र आणि मृग किडा म्हणजे बळीराजाला पेरणी करण्याचे संकेत देणारं समीकरण !