द्रविडनं सचिनसोबत केलं तेच आज उस्मान ख्वाजा सोबत झालं…

सध्या ऑस्ट्रेलियात साऊथ आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच सुरु आहे. आता ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच म्हणलं की काही तरी खळबळ फिक्स होणार आणि तिसऱ्या टेस्टमध्ये झालंही तसंच. ऑस्ट्रेलियन बॅटिंग घरच्या पिचवर नेहमीप्रमाणं खुलून खेळत होती. त्यांचा ओपनर उस्मान ख्वाजानं खणखणीत सेंच्युरीही लावली, बरं गडी एवढ्यावर थांबला नाही, तर १५०, १७५ हे टप्पे पार करुन १९५ वर पोहोचला. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर झालेला ४७५ रन्स, अजून दीड दिवसाचा खेळ बाकी होता म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या हातात पूर्ण संधी होती.

पण आपल्या पहिल्याच टेस्ट डबल हंड्रेडपासून उस्मान ख्वाजा फक्त ५ रन्सनं मागे असताना, ऑस्ट्रेलियन कॅप्टननं इनिंग्स डिक्लेअर केली. टप्प्यात आलेली सेंच्युरी थोडक्यात हुकली, यावरुन पॅट कमिन्सवर टीका झाली तर कुणी त्याच्या बोल्ड डिसिजनचं कौतुक केलं.

पण हताशपणे ड्रेसिंग रुमकडे जाणारा उस्मान ख्वाजा बघून भारतीय चाहत्यांना एकच प्लेअर आठवला तो इनिंग्स डिक्लेअर झाल्यामुळं डबल सेंच्युरी हुकलेला सचिन तेंडुलकर.

तर भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. टेस्ट सिरीजला सुरुवात झाली होती. भारताला अजूनही पाकिस्तानच्या भूमीवर टेस्ट मॅच जिंकण्याची प्रतीक्षा होती. ती संधी चालून आली मुलतानमध्ये.

मुलतानची ही टेस्ट खऱ्या अर्थानं ऐतिहासिक होती, याचं कारण होतं वीरेंद्र सेहवाग. पाकिस्तानची हवा आपल्यापेक्षा जास्त दमट, पिच असं की बॉल कधी उसळेल आणि कधी खाली राहील याचा अंदाज लावता येणार नाही. पण सेहवाग भाऊ त्यादिवशी वाघ बनून पाकिस्तानवर तुटून पडले.

आकाश चोप्रा आणि सेहवाग बॅटिंगला उतरले बॉल अगदी मस्त बॅटवर येत होता, कारण आकाश चोप्रानंही ४२ रन्स मारुन घेतले. गांगुली पाठीच्या दुखापतीमुळं बाहेर होता, कॅप्टन असणाऱ्या द्रविडच्या बॅटमधून फक्त ६ रन्स आले. मग मैदानावर एक बाप जोडी जमली. सेहवाग आणि सचिन.

सेहवागनं पाकिस्तानी बॉलर्सचा पार किस पाडत, रन्सचा पाऊस पाडला. भावानं भारताकडून पहिला त्रिशतकवीर होण्याचा मान मिळवला. भारतात दिवाळी साजरी झाली, पण एकाच दिवशी दोन दिवाळ्या साजऱ्या करायला कुणाला नाही आवडणार? भारतीय चाहत्यांना ती संधी मिळाली सचिन तेंडुलकरमुळं. सचिन पण थाटात खेळत होता, त्यानं खणखणीत बॅटिंग करत १९० ची मॅजिक फिगर ओलांडली.

मॅच टीव्हीवर बघणाऱ्यांना एक गोष्ट लक्षात येत होती, की बारावा खेळाडू असलेला रमेश पोवार सारखीच मैदानावर धावपळ करतोय.

दिवसातल्या शेवटच्या काही ओव्हर्स बाकी होत्या. टीम मिटिंगमध्ये एक गोष्ट ठरलेली की, पाकिस्तानला शेवटच्या १५ ओव्हर्स खेळू द्यायच्या, तोवर सचिनचे दोनशे पूर्ण होतील. रमेश पोवार सचिनला येऊन मेसेज देत होता, ‘पाजी थोडा स्पीड वाढवा.’ सतरा ओव्हर्स बाकी होत्या, युवराज स्ट्राईकला होता. पहिले चार बॉल युवीनं खेळून काढले आणि पाचव्या बॉलवर तो आऊट झाला, सचिनच्या डोक्यात होतं की आपल्यासाठी अजून एक ओव्हर आहे आणि सहा बॉल्समध्ये सहा रन्स तर आपण करुच शकू.

पण तसं झालं नाही, पार्थिव पटेल बॅटिंगला येण्याआधीच द्रविडनं डाव घोषित केला. सचिन १९४ वर नॉटआऊट राहिला… द्विशतकाचा गोल्डन चान्स असताना…

एवढा भारी चान्स हुकला म्हणून सचिन लय डेंजर चिडला. भाऊ ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर हेडफोन घालून शांत बसला. कोच जॉन राईट त्याच्याकडे आला, म्हणला ‘सॉरी मित्रा पण तो माझा कॉल नव्हता.’ गांगुली आणि टीम मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनीही सेम गोष्ट सांगितली, ‘सॉरी मित्रा पण तो माझा कॉल नव्हता.’

इकडं भारतात मात्र राडा सुरू झाला, लोकं शांत, संयमी राहुल द्रविडला शिव्या घालू लागले. त्याच्यात आणि सचिनमध्ये वाद आहेत, तो सचिनवर जळतो, त्यानं मुद्दाम शाळा केली असं सर्रास बोललं जाऊ लागलं.

तिकडं मैदानात द्रविड सचिनला भेटला, तेव्हा सचिननं सांगितलं की, ‘मला राग तर प्रचंड आलाय. कारण आता डबल सेंच्युरी करायला मला पुन्हा शुन्यापासून सुरुवात करावी लागेल.एक ओव्हर बाकी असतानाही तू असा कॉल का घेतलास?’

द्रविडनं तेव्हा त्याला कारण सांगितलं,

‘आपण पाकिस्तानला थोडा वेळ खेळायला उतरवलं, मला आशा होती की आपल्याला झटपट विकेट्स मिळतील. मला पाकिस्तानला हे दाखवून द्यायचं होतं, की आम्ही इथं जिंकायला आलोय.आमच्यासाठी फक्त जिंकणं मॅटर करतं, वैयक्तिक रेकॉर्ड्स नाही.’

सचिनचा राग काय शांत झाला नाही, पण त्यानं थोडा वेळ मागितला.

भारतानं ती मॅच जिंकली, मीडियामध्ये लोकांमध्ये चर्चांची गुऱ्हाळं तेव्हाही रंगली आणि आत्ताही रंगतायत… पण सचिन आणि द्रविडची दोस्ती त्या सहा रनांमुळं हुकलेल्या डबल सेंच्युरीमुळं तुटली नाही ही लय भारी गोष्ट आहे, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.