पाऊस आल्यावर लाईट का जाते ? MSEB वाले म्हणतात…
भाव अत्तराचे आज, पार कोसळले,
पहिल्या पावसाचे थेंब, जेव्हा मातीवर पडले…
हे आमच्या एका नवीन लग्न झालेल्या मित्राचं पहिल्या पावसानंतरचं स्टेटस होतं. पाऊस आल्यावर रेनकोट विकणाऱ्यांना जेवढा आनंद होत नाही, तेवढा या नवीन लग्न झालेल्या भिडूंना होतो. आता त्याच्यामागच्या कारणांमध्ये नको जायला… पण पाऊस आला की सिंगल लोकांना एक वेगळीच चिंता असती… लाईटची. टपरीवरची लाईट नाय… इलेक्ट्रिसिटी.
पाऊस आलाय म्हणल्यावर फिक्स लाईट जाणार याचं टेन्शन येतं. कारण एकदा लाईट गेली की अभ्यासही गेला आणि इंटरनेट गंडल्यावर मोबाईलही.
बरं हे आत्तापासून होतंय का तर अजिबात नाही. इतिहास लय जुनाय. म्हणजे लहानपणी कसं व्हायचं, पावसाचं चिन्ह दिसायला लागलं की वातावरण एकदम भारी व्हायचं. उन्हाबिनाचं टेन्शन नसायचं, निवांत क्रिकेट नायतर फुटबॉल खेळावं वाटायचं. पण घरचे म्हणायचे आधी अभ्यास करुन घे नंतर लाईट जाईल. सगळं प्लॅनिंग गंडायचं.
आजही जरा कुठं आभाळ भरुन आलं की आपला एक डोळा लाईट आहे का गेलीये यावर असतो. वारं सुटल्यावर तर आपण लाईट जायच्या आधीच मेणबत्ती शोधून ठेवत असतोय. पण कधी विचार केला का? की पाऊस आल्यावर लाईट का जाते..?
आता याचं उत्तर बघण्याआधी एक सामान्य ज्ञान बघू. आपल्या घरात जी वीज येते ती असते, AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट. या प्रकारात विजेचा प्रवाह थांबवता किंवा साठवता येत नाही. त्याचं उत्पादन झाल्यावर तो वाहता ठेवावा लागतो. म्हणूनच कधीकधी लाईट फ्लक्च्युएट होताना दिसते. दुसऱ्या बाजूला बॅटरी, इन्व्हर्टरमधून जी वीज आपण वापरतो, ती म्हणजे DC, डायरेक्ट करंट. इथं वीज साठवली जाते आणि मग गरजेनुसार तिचा वापर होतो.
पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ, की नेमकी पाऊस आल्यावरच लाईट का जाते..?
उगंच इथं तिथं शोधण्यापेक्षा आम्ही म्हणलं थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांनाकडूनच उत्तर घ्यावं. यासाठी ‘बोल भिडूनं’ महावितरणचे अधिकारी निशिकांत राऊत यांच्याशी संपर्क साधला,
ते म्हणाले,
“लाईट जाण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इन्सुलेटर. ज्याला साध्या भाषेत चिमण्या असं म्हणता येईल. खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर आणि डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजेचा प्रवाह डिस्ट्रिब्युटरच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर प्रचंड महत्वाचे असतात.
उन्हाळ्यात चिनीमातीचे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर, त्यावर पावसाचे काही थेंब पडले, की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे धोका निर्माण होतो आणि तो टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा काम सुरु करते आणि त्या वाहिनीमधला वीजेचा प्रवाह खंडित होतो. साहजिकच आपल्याकडे लाईट जाते.”
लाईट जाण्याचं दुसरं कारण सांगताना राऊत म्हणाले,
”बऱ्याचशा विद्युत वाहिन्या या अंडरग्राउंड असतात. त्यांच्या ठिकाणी कुठल्या कारणासाठी खोदकाम झालं की, वाहिन्यांना धोका असतो. उन्हाळ्यात यामुळे फारशा तक्रारी येत नाहीत, मात्र पावसाळ्यात या वाहिन्यांमध्ये पाणी शिरतं आणि बिघाड झाल्याने लाईट जाते.
सतत पाऊस सुरू राहिला की, भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते आणि वाहिन्या खराब होऊन वीजपुरवठा खंडित होतो.”
आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे,
पावसात विद्युत पुरवठा यंत्रणेचं नुकसान होतं. झाडं, मोठ्या फांद्या तुटून यंत्रणेवर किंवा वाहिन्यांवर पडतात, वीज कोसळते, विजेच्या कडकडाटामुळं दाब वाढतो, या कारणांमुळेही वीजपुरवठा खंडित होतो.
पावसाचं पाणी जर फिडर पिलर, रिंगमेन युनिट अशा यंत्रणेत शिरलं तरी लाईट जाऊ शकते. बऱ्याचदा पावसात डीपी म्हणजेच रोहित्र उडण्याची शक्यता असते, तेव्हा पावसाचं पाणी साचल्यावर सुरक्षिततेचा विचार करून डीपीचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो. साहजिकच घरात वीज येत नाही.
आता लाईट जाणार हे माहित असतंय, तर त्यासाठी महावितरण आधीच काय खळबळ का नाही करत?
तर जितकं होईल तितकं काम ते करत असतात. विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या तोडून टाकणं, खराब होतील असे इन्सुलेटर बदलणं, अर्थिंग तपासून बदलणं, तारांचे झोल सोडणं अशी दुरुस्तीची अनेक कामं महावितरण करत असतंय. तरीही जोरात पाऊस आला, की एखादं झाड डीपीवर पडतं आणि आधी डीपी बाद होतो, मग आपल्या घरातली लाईट.
या एवढ्या माहितीच्या जोरावर तुम्हाला समजलं असेल, की उगा आपला भुरभुर पाऊस आला तरी लाईट का जाते? कारण इन्सुलेटर बाद होतात. लय रपारप पाऊस आला की, थेट डीपी किंवा मोठी यंत्रणाच आऊट होत असतेय.
पुढच्या वेळी महावितरणला फोन करुन त्यांच्यावर कावण्यापेक्षा आधी यातलं कुठलं कारण असेल त्याची टोटल मारुन बघा. नाय त्यानं लाईट येणार नाय, पण आपल्याला लय कळतं याचं समाधान तेवढं मिळेल. बाकी अभ्यासू पोरांनी उजेडात अभ्यास उरकून घेत चला आणि नवविवाहितांनी स्टेटसचा रतीब येउद्यात. फक्त एक लक्षात ठेवा, लाईट जितकी गपकन जाते तितकी गपकन येऊही शकते, त्यामुळं जरा जपूनच…
हे ही वाच भिडू:
- पावसाळ्यात गाडीवर झाड पडलं, जमीन पाण्याखाली आली तर नुकसान भरपाई कशी मिळवायची ?
- हे वाचा…अन पुढच्या वेळेला “एलियन्स आले” म्हणून गावभर बोंबलू नका
- मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र : तुमच्या भागात यंदाचा मान्सून असा असेल