2014 पासूनचे हे 16 वे राष्ट्रप्रमुख आहेत जे गुजरातला गेलेत : प्रत्येकजण गुजरातला जातोच
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ हे गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. तसे ते आले आहेत भारतात पण नेहमीप्रमाणे सुरवात झाली आहे ती गुजरातमधून.
बरं हा परदेशी पाहुण्यांच्या कार्यक्रम केवळ अहमदाबाद आणि गांधीनगर पुरताच मर्यादित नसतो तर हलोल, राजकोट आणि जामनगर यांसारख्या सारख्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या ठिकाणांचाही या दौऱ्यांमध्ये समावेश असतो.
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक देखील सध्या गुजरातला भेट देत आहेत.
थोडक्यात काय तर गुजरातमध्ये सध्यातरी दौऱ्यावरून धामधुम सुरूय. पण हि काही पहिली वेळ नाही. २०१४ पासून तर गुजरातच्या प्रशासनाला याची सवयच झालेय कारण कोणताही महत्वाचा परदेशी नेता भारताच्या दौऱ्यावर आला तर तो गुजरातला भेट देतोच..
आत्ता तुम्ही म्हणाल, नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी भेट देणाऱ्या नेत्याला आपल्या राज्यात नेलं तर काय चुक. भिडूंनो चुक बरोबर आम्ही काढतच नाही. आम्ही सांगतोय ते डेट्याबद्दल २०१४ पासून किती परराष्ट्रीय नेते भारतात आले आणि गुजरातला गेले त्याची ही यादी. ती पाहून घ्या आणि चुक बरोबर तुमचं तुम्ही ठरवा…!!!
तर याची सुरवात झाली होती २०१४ च्या शी झिनपिंग यांच्या भेटीपासून.
नोव्हेंबर २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत भेटीवर होते. मोदींचा तेव्हा वाढदिवस होता.
या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने गांधी आश्रम आणि साबरमती रिव्हरफ्रंट येथे जिनपिंग यांचा पाहुणचार केला. या दौऱ्यात मोदींनी वैयक्तिकरित्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली होती.
त्यानंतर,
- २०१५ मध्ये डोनाल्ड रवींद्रनाथ रामोतर या गयानाच्या राष्ट्राध्यक्षांनी गुजरातला भेट दिली होती.
- २०१५ मध्येच भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पण भारत दौऱ्यावर असताना गुजरातला गेले होते.
- २०१५ साली फिलिप जॅसिंटो न्युसी या मोझांबिक आफ्रिकन देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी गुजरातला भेट दिली होती.
- २०१६ साली नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे भारतात आल्यावर गुजरातला गेले होते
- २०१७ मध्ये अँटोनियो कोस्टा या पोर्तुगालच्या पंतप्रधानांना देखील मोदींनी गुजरातला नेलं होतं. त्यावेळी अँटोनियो कोस्टा व्हायब्रन्ट गुजरात समिटचे प्रमुख पाहुणे देखील होते.
- २०१७ सालात सर्बियाचे राष्ट्राअध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांचं देखील गुजरातमध्ये आदरातीर्थ करण्यात आलं होतं.
- २०१७ मध्ये विद्यादेवी भंडारी या नेपाळच्या महिला राष्ट्रपतींनी देखील गुजरात दर्शन केलं होतं. भंडारी यांनी तीर्थक्षेत्र द्वारका या धार्मिक भेटीसाठी गुजरातला भेट दिली.
२०१७ सालात अजून एक हाय प्रोफाइल नेत्याने गुजरातला व्हिझिट केलं होतं ते म्हणजे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे. शिंजो आबे यांनीही गुजरातमधूनच भारत दौऱ्याला सुरुवात केली. त्यांचा गुजरात दौरा महत्वपूर्ण यासाठीही होता कारण त्यावेळी ५० जपानी कंपन्या गुजरातमध्ये त्यांचा व्यवसाय करत होत्या
फेब्रुवारी २०१७ मध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी गुजरातला भेट दिली. त्यांनी IIM अहमदाबाद आणि अक्षरधामला भेट दिली आणि दोन्ही ठिकाणी बराच वेळ घालवला.
मार्च २०१७ युगांडाच्या पी रुहाकाना रुगुडा यांची गुजरात भेट झाली.
त्यांनी बनास डेअरीला भेट दिली कारण पंतप्रधान मोदींनी त्यांना अशी भेट देऊन डेअरी क्षेत्राशी निगडीत घडामोडी स्वतः पाहण्याचे आमंत्रण दिले होते. रुगुडा यांच्यासोबत युगांडामध्ये स्थायिक झालेले आघाडीचे गुजराती व्यापारीही होते.
जून २०१८ मध्ये सेशेल्सचे अध्यक्ष डॅनी फौर यांनी गुजरातमधील IIM अहमदाबाद , साबरमती आश्रम आणि फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीला भेट दिली, त्यानंतर जुलै २०१८ मध्ये उपाध्यक्ष व्हिन्सेंट मेरियन यांनी गुजरातमधील कच्छला भेट दिली होती.
२०१८ मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या गुजरात भेटीची देखील जोरदार चर्चा झाली होती. या दौऱ्यात दोन्ही पंतप्रधानांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला होता. पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना खारं पाणी गोड करणारी एका जीप भेट दिली होती.
२०१९ मध्येच शवकत मिर्झीयोयेव या उझबेकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांनी गुजरातला भेट दिली होती.
गुजरात हे फार्मास्युटिकल्सचे केंद्र असल्याने येथे प्रमुख कंपन्या स्थित आहेत, आम्ही उझबेकिस्तान आणि आफ्रिकन देशांसारख्या देशांना आमंत्रित केले आहे जेथे आमच्या कंपन्या त्यांचा व्यापार आणि व्यवसाय वाढवण्यासाठी संधी शोधू शकतात असं त्यावेळी गुजरातचे मुख्य सचिव डॉ. जे.एन. सिंग म्हणाले होते.
२०२० ची अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गुजरात भेट देखील जोरदार गाजली होती.
नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाद्वारे ट्रम्प यांचे भारतात भव्य स्वागत झालं होतं. याच इव्हेंटच्या थीममधून गुजरातचं वैभव, यश, आणि अभिमान दाखवण्यात आला होता. ६४ एकरावर पसरलेल्या मोटेरा स्टेडियमवर लाखभर लोकांच्या उपस्तिथीत हा कार्यक्रम झाला होता. ट्रम्पच्या ३ तासांच्या दौऱ्यासाठी ८० करोड रुपये खर्च करण्यात आले होते.
आता मॉरिशसच्या जगूनाथ आणि इंग्लंडच्या बोरिस जॉन्सन हे गुजरातला भेट देणारे अनुक्रमे १५वे आणि १६ वे राष्ट्रप्रमुख असणार आहे. त्यामुळे आता बाहेरचा राष्ट्रप्रमुख भारतात येणार आणि तो गुजरातला भेट देणार ही प्रथाच बनली आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही.
हे हि वाच भिडू :
- गुजराती व्यापारी नेहरूंना भेटल्यानेच टनाने ऊस ओढणारा हिंदूस्थानचा ट्रॅक्टर तयार होवू शकला
- भाजपचं माहीत नाय, पण मोदीजींसारख्या दिसणाऱ्या मूर्तीला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे
- फक्त मोदीच नाही, तर गुजरातची ही डेअरी सुद्धा वाराणसीमध्ये पाय रोवतेय
- गुजरातच्या राजधानीचं डिजाईन सुद्धा एका मराठी भिडूच्या सुपीक डोक्यातून आलंय