राज, आदित्य ते उद्धव ठाकरे… अयोध्येला जाण्यामागची ही आहेत ४ कारणं…!!!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर त्यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा फिक्स केलाय. ५ जून ही तारीख त्यांनी दौऱ्यासाठी जाहीर केलीये. दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील मेच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौरा जाहीर केलाय. त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊतही जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

म्हणजे महाराष्ट्रात सध्या ‘दौऱ्यांचा’ सीजन सुरु होणार असं दिसतंय आणि त्यात केंद्र ठरलं आहे ते ‘अयोध्या’.

तसं महाराष्ट्रात हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अयोध्या दौरा केल्याचं सगळ्यांनीच बघितलंय. मात्र एक गोष्ट आहे की, या दौऱ्यांना नेहमीच निवडणुकांची पार्श्वभूमी राहिली आहे.

आताही हे दौरे २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मालिका सुरू असताना होतायेत.

मात्र फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांचे दौरे अयोध्येला होतातच. म्हणूनच देशाच्या कुठल्याही भागात निवडणूका आल्या की, दौरा पार भारताच्या वरच्या टोकाला म्हणजेच उत्तरप्रदेशला का होतो? हे समीकरण जाणून घेणं गरजेचं आहे…

हे दौरे होतात उत्तरप्रदेशातील अयोध्येला. अयोध्येनं निवडणुकांमध्ये आपलं स्थान मिळवलं ते ९० च्या दशकात.

१९९० दशकापासूनच ‘राममंदिर निर्माण’ हा मुद्दा घेऊन बीजेपी पार्टी पुढे निघाली. मात्र याची सुरुवात काही बीजेपीने केली नव्हती. खरं तर काँग्रेसने सगळ्यात पहिले अयोध्या आंदोलनाला प्रोत्साहन दिलं होतं. मशिदीच्या आवारात रामाच्या मूर्तीची स्थापना करण्याविषयी डिसेंबर १९४९ मध्ये पहिल्यांदा वाद निर्माण झाला. 

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात राजीव गांधी यांनी अयोध्येतून संसदीय निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली. १९८६ मध्ये राजीव गांधी यांनी त्या साइटचं कुलूप उघडण्याचा निर्णय घेतला पण काँग्रेस पक्षाने उचललेली ही कारवाई तेव्हा मागे पडली होती. 

त्यानंतर १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा, ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडणं, त्यानंतर देशभरात उसळलेल्या दंगली असा प्रवाह बीजेपीकडून सुरु झाला आणि पुढे ‘बनायेंगे मंदिर’ भाजपचं प्रचार गीत झालं.

आता तर प्रत्येक पक्ष अयोध्येचं गीत आपल्या आपल्या पद्धतीने रचतायेत आणि गातायेत. असं का होतंय? हे जाणून घेण्यासाठी आधी बीजेपीचा अयोध्या अध्याय बघावा लागेल….

१९९२ मध्ये राम जन्मभूमी आंदोलन शिगेला पोहोचल्यानंतर भाजपने प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात या मुद्द्याचा समावेश केला.

१९९६ ची लोकसभा निवडणुक ही बाबरी मशीद पाडल्यानंतरची पहिली मोठी निवडणूक होती. त्यावेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अयोध्येतील राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्याची ‘वचनबद्धता’ असल्याचं स्पष्ट केलं. 

परिणामी या निवडणुकीत भाजपने लोकसभेत १६१ जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. हे सरकार शॉर्ट टर्म राहिलं म्हणून परत १९९८ च्या लोकसभा निवडणुका झाल्या. यावेळी सर्व प्रमुख पक्षांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे राम मंदिर-बाबरी मशीदचा उल्लेख केला होता.

मात्र ‘अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वसंमतीनं, कायदेशीर आणि घटनात्मक मार्गांचा शोध घेण्याचं’ आश्वासन भाजपनं प्रथम दिलं. म्हणून यानिवडणुकीतही भाजपने १८२ जागा मिळवून घरचा आहेर दिला. 

आता भारताने नव्या शतकात प्रवेश केला होता. 

२००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका इतर मुद्द्यांवर लढल्या गेल्या. 

२००४ मध्ये ‘इंडिया शायनिंग’ विरुद्ध आम आदमी मोहीम, २००९ मध्ये भारत-अमेरिका अणुकरार, २०१४ मध्ये ‘पॉलिसी पॅरालिसिस’ आणि २०१९ मध्ये ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही मोहीम होती. पण भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा उल्लेख प्रकर्षाने नसला तरी अढळतच राहिला, ज्याचा परिणाम सगळ्याच राजकीय पक्षांनी बघितला. 

याच बीजेपीच्या अयोध्या मुद्याचं महत्त्व इतर पक्षांनी ओळखलं. त्यामुळेच सपा, बसपा, आप, AIMIM, सगळ्याचा मोर्चा अयोध्येकडे वळतोय. ते लोकांना दाखवू इच्छितात की, ते देखील मंदिराच्या बांधकामाचं समर्थन करतात.

मात्र आता राम मंदिराचे रस्ते चार भागांत विभागले गेले आहेत. चार निवडणुकांचे फॅक्टर अयोध्येत सापडतात, ज्यामुळे सगळे पक्ष तिकडे वाळतायेत.

पहिला मुद्दा आहे आस्थेचा.

राम मंदिर आता बनणारच याची पूर्ण गॅरंटी आतापर्यंत सगळ्यांना आलीच आहे. मात्र तरी ज्याप्रकारे मंदिर आंदोलन पेटलं, त्याची प्रदीर्घ केस चालली आणि आता खूप कष्टाने केसमध्ये यश मिळालं आहे, यादरम्यान श्रीराम हे कट्टर आस्थेचा विषय बनले बाहेत. म्हणून हा मुद्दा सोडून चालत नाही हे प्रत्येक पार्टीने ओळखलं आहे.

दुसरा मुद्दा आहे पूर्वांचलचा.

उत्तरप्रदेशच्या पूर्वीकडच्या भागात अयोध्या खूप महत्वाचा आहे. कारण इथल्या जवळपास १५० पेक्षा जास्त सीट्सवर धर्म संप्रदायाची राजनीती चालते. इथली ब्राह्मण मतं खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी यांनी जेव्हा हाच झेंडा पूर्वांचलमध्ये फडकावला होता तेव्हा त्यांना यश आलं होतं. 

१९९३ मध्ये या आघाडीने त्यावेळी राम मंदिराच्या लाटेवर स्वार झालेल्या भाजपला मागे टाकलं होतं. तर बीजेपीने २०१७ मध्ये ११५ सीट जिंकून सरकार बनवलं होतं. आताही ‘ब्राम्हण मतांचा’ अट्टहास या पार्टी करतात.

तिसरा आहे मुस्लिम राजनीतीचा. 

राम मंदिराचा मुद्दा जसा आला तसा बाबरी मस्जिदचा देखील आला. अशावेळी जसा याचा फायदा हिंदू वोर्टर्सला आपल्याकडे आणण्यासाठी इतर पक्षांनी केला, तसाच तो मुस्लिम पक्षाने देखील केला आणि करत आहे.

एमआयएमने देखील या भाजप शासित राज्यात आपलं अस्तित्व तयार करण्यासाठी सध्या प्रयत्न चालू केले आहेत. त्यांनी हॅशटॅग ‘बाबरी जिंदा है’ म्हणत ट्विटरवरून ‘बाबरी मस्जिद थी, है, और रहेगी’ असं देखील म्हटलं होतं. २०१९ मध्ये अयोध्येचा निकाल आल्यानंतर ते म्हणाले होते की, त्यांचा पक्ष मस्जिदला दान मिळण्यासाठी नाही तर कायदेशीर अधिकारांसाठी लढणार आहे. 

अयोध्येच्या आणि सोबतच उत्तरप्रदेशच्या मुस्लिम वोटर्सना आकर्षित करण्याला त्यांनी सुरुवात केलीये.

आता चौथा मुद्दा आहे हिंदुत्व. 

हा मुद्दा बीजेपीचं ब्रम्हास्त्र राहिलं आहे. त्यामुळे हिंदूंनी फक्त भाजपला मतदान करावं असं कोणत्याच पक्षाला वाटत नाही. त्यामुळे ज्या ज्या पक्षांनी आपला मोर्चा हिदुत्वाकडे वळवला आहे त्यांनी अयोध्येला देखील मोर्चात एक स्टेशन ठेवलंच आहे. कारण इथूनच सुरुवात होते हिंदुत्व मुद्याची, हिंदूंच्या आस्थेची आणि हिंदू वोटर्सच्या भावनांची. 

दिल्लीतील आम आदमी पक्षसुद्धा हिंदुत्व या मुद्याला जगण्याचा मार्ग म्हणून सामान्य करायला बघतोय. म्हणून तर त्यांनी देखील गेल्यावर्षी अयोध्या दौरा केला. तर अयोध्येच्या मंदिर निर्माणासाठी जेव्हा महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात सामान्य लोक निधी पाठवतात, त्यातूच या मुद्याचं महाराष्ट्रातील महत्त्व दिसून येतं. 

म्हणून आता महाराष्ट्रातले पक्ष हिदुत्वाचं बोट पकडतायेत तेव्हा त्यांचा अयोध्येचा दौरा ‘साहजिकच’ समजावा लागणार ना! 

राहिला मुद्दा काँग्रेसचा तर काँग्रेसने देखील याचं महत्त्व जाणलं होतं, म्हणून तर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी राम मंदिराच्या जागेभोवती अयोध्येतील मोठा जमीन घोटाळा असल्याचा आरोप करत सविस्तर सादरीकरण केलं होतं. मुद्दा थेट मंदिराशी संबंधित नसला तरी अयोध्येशी होताच. शिवाय सगळे पक्ष जिकडे जातायेत तिकडे जाण्यापासून ‘एक’ पक्ष कसा दूर राहील! 

तर असा आहे अयोध्येचा आणि भारताच्या राजकीय पक्षांचा संबंध. वेगवेगळ्या कारणांनी अयोध्येचे दौरे सगळ्यांचेच वाढले आहेत. 

आता राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील जात आहेत. तेव्हा या दौऱ्यांचा कुणाला, किती फायदा होईल, असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा… 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.