रसवंती गृहांची नावे ‘कानिफनाथ, नवनाथ’ का असतात?

भिडूनो ऊनं काय म्हणतय? आमच्या इथ तर जाळ काढालय. सकाळ बघणा संध्याकाळ बघना नुसतं आग आणि धूर संगटचं काढालंय. टीव्हीवर सुद्धा “आया मौसम ठंडे ठंडे डर्मी कुल का” च्या जाहिराती सुरु झाल्या आहेत. म्हजे खरोखर उन्हाळा आलाच म्हणायचा. पुण्याच्या पोरी घरातसुद्धा स्कार्फ घालून फिरत आहेत असे खात्रीलायक वृत्त हाती आलं आहे.

अमृततुल्यवर होणाऱ्या चाय पे चर्चावाल्या गरम चर्चाचे फड नवनाथ रसवंती गृहावर बसू लागले आहेत. अशाच एका रणरणत्या दुपारी गोड उसाचा रस पीत होतो तेव्हा आमच्या समोर बसणारा भिडू समीर गहन विचारात पडलेला दिसला. आम्ही पण त्याला विचारलं भावा असा का आचारी का बिचारी झालायस? वैनीचा बड्डे जवळ आलाय की काय? तर ते म्हणालं नाही माझ्या डोक्यात एक प्रश्न पडलाय. 

भिडू समीरच्या डोक्यात प्रश्न पडला की आमच्या साठी दिवाळी असते. कारण लेख लिहायला एक भारी विषय मिळतो, भिडू समीरचा प्रश्न होता,

“सगळ्या रसवंतीगृहाची नावं नवनाथ का असत्यात? “

आयला खरच की. ऊसपट्ट्यातल सांगली जयसिंगपूर असो की दुष्काळात रमलेल नांदेड लातूर, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो की आडमार्गावरचं जांभूळगाव. प्रत्येक गावातल्या स्टँडवर आठवडीबाजाराच्या ठिकाणी नवनाथ रसवन्तीगृह असतेच, कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असत. 

स्वच्छ टापटीप हे या रसवंतीगृहाचं वैशिष्ट्य असते. आत मध्ये नवनाथांचे चित्र लावलेले असते. टिपिकल पांढरी टोपी विजारशर्ट घातलेले काका ऊसाचा रस काढत असतात. घुंगराच्या मधुर सुरातल्या छुमछुम अशा लयीत मशीनचा गोल फिरणारा चरखा, त्यातून आतबाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपाड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस. समोर ठळक अक्षरात लिहिलेलं असत,

“देशबंधूनो विचार करा चहा पेक्षा रस बरा”

चांद्या पासून बांद्यापर्यंत कुठेही जा. पूर्ण महाराष्ट्रभर रसवंतीगृहामध्ये हेच चित्र.

बोलत बोलत आम्ही ऑफिसवर परत आलो होतो. सगळ्यांनी यावर महाचर्चा बसवली. वेधशाळेप्रमाणे वेगवेगळे अंदाज बांधण्यात येऊ लागले. एकजण म्हणाला त्याच काय ही सगळी रसवंतीगृह एकाच माणसाच्या मालकीची आहेत. त्यामुळे एकच नाव आहे. कोण म्हटलं की मॅकडोनाल्ड, केफसीचे जसे फ्रँचाइजी देतात तसे नवनाथ रसवंती गृहाची देखील  फ्रँचाइजी असते.

आमच्या शेजारी एक जेरेशास्त्रीबुवा असतात. आमच्या चर्चेचा आवाज वाढला की ते आम्हाला शांत बसवायला येतात आणि स्वतःचं ज्ञान वाटून जातात.तर हे जेरे आजोबा आम्हाला म्हणाले

“ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो आणि कानिफनाथांची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे ! त्यामुळे ही खरे तर लोककथा आहे आणि भाव तिथे देव या न्यायाने कनिफनाथाना ऊस , रस , गूळ आवडतो ! इतका सिंपल अर्थ आहे ! दत्तसंप्रदायाची नाथसंप्रदाय ही शाखा आहे ,त्यामुळे नवनाथ रसवंती , कानिफनाथ रसवंती ही नावे ठेवण्याचा प्रघात पडला असावा ,आणि तो जनमानसात रुळला !”

कन्फ्युजन वाढत चालल होत. खर खोट काहीच कळेना. अखेर आम्हाला आठवल आमच्या कॉलेजमध्ये आमचा एका दोस्त होता नवनाथ जगदाळे. त्याच्या वडीलांचं रसवंतीगृह होत. त्यांच्या दुकानाचं नाव सुद्धा नवनाथ होत. सुरवातीला तर आम्हाला वाटायच आमच्या नवनाथच्या नावावरून त्याच्या बाबांनी रसवंतीच नाव नवनाथ ठेवलय. आता लक्षात आलं तसं काही नाही. आता म्हटल विषयाचा पूर्ण रस काढल्या शिवाय राहायचं नाही.

नवनाथला फोन लावला. नवनाथ इंजिनियरिंगनंतर आता पोलीस डिपार्टमेंट मध्ये आरटीओ ऑफिसर झालाय. किती जरी बिझी असला तरी त्याच्या जिव्हाळ्याचा रसवंतीचा विषय काढल्यावर मात्र भरभरून बोलू लागला.

तर गोष्ट आहे साधारण सत्तर ऐंशी वर्षा पूर्वीची. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका गाव बोपगाव. पश्चिम महाराष्ट्राच्या मानान दुष्काळी पट्टा. पण इथला शेतकरी जिद्दी. जवळ असणाऱ्या थोड्याथोडक्या पाण्यावर शेती जगवत होता. त्याकाळात साखर कारखान्यांच पेव फुटलेलं नव्हत. त्यामुळे शेतात पिकणाऱ्या उसाला हक्काचं मार्केट नव्हत. त्यातून मिळणारा रोजगार नव्हता. 

अशातच गावातला कोणीतरी खटपट्या तरुण रोजगार शोधायला मुंबईला गेला. तिथ गेल्यावर त्याला कळाल की इथ आपल्या  उसाला इथ भरपूर मागणी आहे. त्याकाळात देशी उस असायचे. लहानमुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सोलता येईल असा तो ऊस असायचा. या उसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत घालून ते मुंबईला विकले जाऊ लागले. नंतर कोणाच्यातरी लक्षात आलं असं दारोदारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून तिथ हे रस काढून विकावं.

पुरंदरच्या गोड उसाच्या रसाने मुंबईत जादू केली. हळूहळू बोपगाव, सासवड, चांबळी,  बिव्हरी अशा गावातली बंडी विजार घालणारे शेतकरी रसवंतीच्या बिझनेससाठी पूर्ण राज्यभरात पसरले. जिथ जातील तिथ दुधात साखर विरघळावी तसे तिथल्या माणसांच्यात विरघळून गेले. धंद्यात सचोटी ठेवली. आपल्या रसवंतीला त्यांनी ब्रँड बनवलं.

मग रसवंतीला नवनाथ हेच नाव का दिल गेल?

तर बोपगावजवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपैकी एक कानिफनाथस्वामी येथे तपश्चर्येला बसले होते. आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे. अख्खा पुरंदरतालुका या कानिफनाथांचा भक्त आहे. इथली माणस जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत. त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव श्रद्धेनं नवनाथ नाही तर कानिफनाथ ठेवलं.

kanifgad
कानिफनाथ गड बोपगाव

पूर्वी बैलानी फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढलं जायचं. पुढे लोखंडी मशीन आले. बैल गेले. पण या बैलानी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण या शेतकऱ्याच्या पोरांनी विसरू दिली नाही. त्यामुळेच बैलाच्या गळ्यातल घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीन चरख्यावर छुमछुम आवाज करत आहे.

नवनाथ कानिफनाथ रसवंतीगृहाच यश बघून इतर रसवंतीगृह वाले सुद्धा तेच नाव वापरू लागले. पण पुरंदर तालुक्यातल्या ओरिजिनल नवनाथ रसवंतीगृहाशी स्पर्धा करण्यासाठी त्यांच्या सारखी क्वालिटी देणे सुद्धा बंधनकारक ठरले.

घामाने डबडबलेले थकले भागले कष्टकरी असो वा एसी कारमधून फिरणारे मोठया कंपनीचे सीइओ अशा सगळ्यांची क्षुधाशांती या उसाच्या रसानेच होते.

कोक पेप्सी सारखे कित्येक कोल्ड्रिंक आले तरी उसाचं रसासारख्या पारंपारिक पेयाची लोकप्रियता कमी होत नाही. कावीळ सारख्या रोगावर हमखास गुणकारी कोणत्याही सिझन मध्ये चालणारा आरोग्यदायी उत्साहवर्धक विशेष म्हणजे खिशाला परवडणारा उसाचा रस प्यावाच आणि तो ही नवनाथ रसवंतीगृहाचा हेच गोड सत्य उरते.

हे ही वाचा भिडू.

 

2 Comments
  1. Rajesh phadtare says

    Te raswanti gruh kondiba geuji phadtare yani chalu kele pahilyNdi punyat shaniwar wada yethe

  2. Uday says

    Hooo ya madhe jya tarunacha uallekh kela aahe te Maze aajoba hote tyani 1963 sali malad la pahila dukaan vikat ghetale tyanche nav nana shripati phadatare ase hote qni tya nantar tyani aamachya gavatli tyanchya mitrana dukaan vikat ghyayla madat keli

Leave A Reply

Your email address will not be published.