पावसाचा जोर कमी झाला खरं कोल्हापूरचा पूर ओसरायला वेळ का लागतोय ?

कोल्हापूरच्या पावसाचा जोर कालपासून ओसरला आहे. त्यामुळं सहाजिकच कोल्हापूर बाहेर राहणाऱ्या किंबहुना कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांच्या मते पुराचं पाणी ओसरायला पाहिजे. म्हणजे बघा ना, अलमट्टी धरणावर फुगवटा नाही, राजापूर बंधाऱ्याची  स्थिती धोकादायक नाही तरी देखील कोल्हापूरची ही पुर परिस्थिती जैसे थे आहे.

कशामुळं?

खरं तर पुराचं पाणी न ओसरण्यामागं बरीच कारणं आहेत.

याची सुरुवात झाली ती…२२ जुलैला, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात ढगफुटीसदृश पाऊस झाला. एका दिवसातल्या पावसाचा जोर इतका होता की सर्व नद्यांना महापूर येणार हे जवळजवळ निश्चितच झालं होत.

पुढं कोल्हापुरात महापूर आलाच. शहरातले सर्व अंतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग आणि जनजीवन सर्वच ठप्प झालं. आता लोकांना वाटायला लागलं की, अलमट्टी धरणात पाणी साठवलं जात त्याच्याच फुगवट्यामुळं पंचगंगा, कृष्णा, वारणासह सर्व नद्यांना महापूर आलाय.

म्हणजे जबाबदारी अलमट्टी धरणाच्या साठ्यावर टाकून सर्वजण रिकामे. पण खरं कारण वेगळंच आहे.  

१. पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा नदी महत्त्वाची आहे. या नदीला कोयना, वारणा, पंचगंगा या मोठ्या नद्या येऊन मिळतात. सर्वांत आधी कऱ्हाड येथे कोयना नदी कृष्णेला मिळते. पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम होण्याआधी सांगलीमध्ये हरिपूर येथे वारणा नदी कृष्णेत सामावते त्यानंतर पंचगंगेचं पाणी नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे कृष्णेत जातं.

२. कोयनेचं आणि कृष्णेचं पाणी पंचगंगेच्या तुलनेत जास्त असतं. त्याचप्रमाणे पश्चिम घाटात पाऊस वाढल्यावर कोयनेतूनही पाणी सोडलं जातं. कृष्णेच्या पाण्याचा जोर देखील मोठा असतो. अशा स्थितीत नृसिंह वाडी येथील संगमात पंचगंगेचं पाणी सामावून घेणं कृष्णेला अशक्य होतं. त्यामुळे हे पंचगंगेचे पाणी परत फिरते आणि कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये पसरते. एकाबाजूने कृष्णेचं पाणी आणि दुसरीकडे पंचगंगेतून आलेलं पाणी अशी कोंडी या परिसराची होते.

आणि मग कोल्हापूरला येणाऱ्या पुरासाठी कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाकडेही बोट दाखवले जातं.

पण मग, अलमट्टी धरणात २३ तारखेला ७४ टीएमसी पाणीसाठा होता. धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी ४९ टीएमसीची अजून गरज होती. दरम्यान, आपले जलसंपदा मंत्री मागणी करीत होते की, दोन लाख क्युसेक पाणी सोडावं. पण कर्नाटक सरकारने अलमट्टीतून तीन लाख क्युसेक पाणी सोडलं.

आता धरणातून कमी पाणी सोडले तरीही हा महापूर कोठून आला.

म्हणजे इथं अलमट्टीचा प्रश्नच निकालात निघाला होता. त्याचा फुगवटा महाराष्ट्रात आलाच नव्हता. कोल्हापुरात त्या सायंकाळी इशारा पातळीवरील ३९ फुटांवरील पाणी रात्री बारा वाजेपर्यंत ४३ फुटांवर म्हणजेच धोकादायक पातळीवर जाऊन दाणादाण उडाली. शुक्रवारी सायंकाळी ते पंचावन फुटांवर गेले.

अलमट्टी धरण या जागेपासून १९५  ते २०० किमी दूर असून दोन्ही प्रदेशांच्या उंचीमध्येही फरक आहे.  अलमट्टी धरणापेक्षा कृष्णेत पंचगंगेचं पाणी सामावून घेण्यावर असलेली मर्यादा पुरासाठी जास्त कारणीभूत वाटते.

म्हणजे नदीची पाणी धारण करण्याची क्षमता कमी झाली आहे का ? नदीपात्रात गाळ का साचतो, तिची लांबी रुंदी आणि खोली बदलली आहे का? 

३. पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये झालेली मोठी वृक्षतोड, शेतजमिन तयार करण्यासाठी झालेली तोड, कोल्हापूरच्या पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये होणाऱ्या बॉक्साइटच्या खाणकामाचा मातीचा थर यामुळे मोठ्या प्रमाणात धूप होते. पावसाच्या पाण्यामुळे वाहून आलेला गाळ साचल्यामुळेही नद्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जेव्हा मुसळधार आणि सतत पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी कमी वेळात पात्राबाहेर पडतं.

त्याचप्रमाणं

४. सर्वप्रथम कोल्हापूर शहराची हद्दवाढ गरजेचे आहे. गेली पन्नास वर्ष कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. बांधकाम व्यवसायिकांनी नदी पात्रात, नदीच्या दिशेनेच बांधकामे केली, कारण तोच भाग हद्दीत येतो. कोल्हापूर शहराची लोकसंख्या आणि शहराचा विस्तार वेगाने वाढत गेला आहे. या कालावधीत नदीपात्राच्या जवळपास होणाऱ्या बांधकामाला रोखण्याची गरज शहरातले नागरिक बोलून दाखवतात. पाणी येणाऱ्या परिसरात आता बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

उपाय म्हणून

१. महाबळेश्वरचे पाणी सांगलीला आणि नृसिंहवाडी किंबहुना शिरोळ तालुक्याला धक्का देणार असेल तर हा सर्व परिसर समजून घेऊन नियोजन करायला हवे आहे.

२. महापुराने पाण्याखाली जाणाऱ्या क्षेत्रात बांधकामे होऊ न देणे आदी करणे आवश्यक आहे.
कागल ते सातारा हा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

३. पंचगंगा नदी कोल्हापूरच्या वेशीवर (तावडे हॉटेल स्टाॅप) महामार्ग ओलांडते तेथून शिरोलीच्या सांगली फाट्यापर्यंतचा उंच केलेला रस्ता प्रथम काढून टाकला पाहिजे. या रस्त्याने पाणी अडविले जाते. पाणी पुढे सरकत नाही आणि ते कोल्हापूर शहरात शिरते आहे.

४. या रस्त्यावर मोरी ठेवावी तसे नदीचे पात्र ठेवले आहे. सुमारे एक लाख क्युसेक पाणी त्या पात्रातून कसे जाणार ? त्याच्या फुगवट्याने शिरोलीची शेती पाण्याखाली जाते. महामार्गावर पाणी येऊन रस्ता बंद पडतो. सांगली फाट्यापासून उंच फ्लायओव्हर बांधून बेळगावकडे जाणारी वाहतूक रिकामी केली पाहिजे. त्याखालून पाणी खेळते राहिले पाहिजे, अन्यथा कोल्हापूर शहराचा धोका कमी होणार नाही.

त्यामुळं अलमट्टीचा विषय आता संपला आहे. आपल्याला आपल्या बुडाखालचा अंधार शोधून काढला पाहिजे. 

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.