G-20 समीटसाठी रस्ते, भिंतींपासनं सगळं चकाचक करायचं चाललंय कारण…

जी- २० परिषदेचं अध्यक्षपद हे यंदा भारताकडे आहे. त्यामुळं, जी- २० च्या संबंधित ज्या बैठका होतायत त्या ज्या कोणत्या शहरात होतायत त्या शहरांमध्ये रस्ते सफाई, रस्त्यांचं बांधकाम, रंगरंगोटी इथपासनं ते शहरातल्या मुख्य भागांमध्ये सजावटीचं काम केलं जातंय. आता २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी जी- २० च्या २५० परदेशी महिला या छत्रपती संभाजीनगर इथे येणार आहेत. त्यामुळे, इथे जोरदार तयारी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.

मागच्या महिन्यात अशीच तयारी आपल्याया पुण्यातही पाहायला मिळाली होती. पण ही इतकी तयारी केली जातेय ती जी- २० परिषद इतकी महत्वाची का आहे?

मुळात तर, जी- २० हे नक्की काय आहे? तर, १९९८ मध्ये सुरू झालेलं जी- २० म्हणजे ग्रूप ऑफ ट्वेंटी असा त्याचा फूल फॉर्म आहे. या जी-२० मध्ये जगभरातले २० देश आहेत. या २० देशांमध्ये परस्पर सहकार्यातून आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी ही जी- २० परिषद दर वर्षी आयोजित केली जाते.

या परिषदेचं अध्यक्षपद हे दरवर्षी बदलत असतं आणि ते रोटेटिंग पद्धतीनं दिलं जातं. यंदाच्या वर्षी हे अध्यक्ष पद आपल्या भारत देशाकडे आहे.

त्यामुळं आता भारत जर इतक्या महत्त्वाच्या परिषदेचं अध्यक्ष पद भुषवतोय तर, त्यासाठीची तयारीही उत्तमच असली पाहिजे. या जी २० चं महत्त्व सांगायचं झालं तर, लक्षात घेण्यासारखा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे, जगातल्या एकूण लोकसंख्येपैकी ६०% लोकसंख्या ही याच देशांमध्ये आहे, ७५ टक्के व्यापार याच देशांमधून होतो तर, जगाच्या जीडीपीपैकी जवळपास ८५% जीडीपीही याच देशांमधून आहे.

आता हे जी-२० कशाप्रकारे काम करतं ते बघुया.

दोन वेगवेगळ्या ट्रॅकमध्ये जी- २० चं काम चालतं. फायनॅनशियल ट्रॅक आणि शेरपा असे हे दोन ट्रॅक आहेत. यातल्या फायनॅनशियल ट्रॅकमध्ये काय असतं तर, या २० देशांमधल्या फायनांस रीलेटोड व्यक्ती म्हणजे, त्या त्या देशांचे अर्थमंत्री देशांच्या सेंट्रल बँकांचे अधिकारी अशी मंडळी एकत्र येतात आणि आर्थिक विषयांवर चर्चा करतात. या चर्चांमधून या २० देशांची आर्थिक वाटचाल ठरत असते.

तर, दुसरा ट्रॅक म्हणजे शेरपा ट्रॅक.

आता शेरपा हा शब्द आणखी एका ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. पहाडांमध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये फिरायला गेल्यावर तिथं जे गाईड्स असतात त्यांना शेरपा असं म्हणतात.

अगदी तसंच, या जी- २० परिषदेतही या २० देशांमधले मुत्सद्दी लोक एकत्र येतात आणि चर्चा करतात. आता या चर्चा कोणत्या मुद्द्यांवर असतात ? तर  रोजगार, आतंकवादावर नियंत्रण कशाप्रकारे आणता येईल, हवामानातल्या होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे उपाय अशा विविध समस्यांवर मार्ग कशाप्रकारे काढता येईल या विषयांवर शेरपा ट्रॅकमध्ये चर्चा होत असते.

हे झाले जी- २० चे दोन्ही ट्रॅक. पण या सगळ्यात प्रश्न असा पडतो की, या जी- २० मुळे गुंतवणूक वगैरे येते का?

त्याचं उत्तर नाही असं आहे. जी- २० मधून गुंतवणूक येते असा मुद्दा नाहीये. मात्र, असं असलं तरी जी – २० महत्त्वाचं आहे कारण या परिषदेतल्या चर्चेतून भविष्यातल्या आर्थिक समस्यांचं निवारण करता येतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक जोखीम कमी करणाऱ्या नियमांबाबत चर्चा होत असते. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पॉलिसीज बद्दल चर्चा केली जाते.

जगातल्या आर्थिक दृष्ट्या सर्वात प्रबळ अश्या २० देशांतल्या मंडळींसोबत होणाऱ्या या परिषदेचं अध्यक्ष पद हे भारताकडे आहे आणि या परिषदेसंदर्भातल्या वर्षभर सुरू राहणार असलेल्या या बैठका देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत. त्यामुळे, या २० प्रबळ देशांमधली मोठी मंडळी भारतात बैठकांसाठी येतायत.

ज्या ज्या शहरात या बैठका असतात त्या त्या शहरात या मंडळींचं स्वागत करण्यासाठी ही सगळी जय्यत तयारी ज्या त्या शहरात पाहायला मिळतेय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.