फटाके पण फोडायचेत आणि पर्यावरणाची पण काळजी वाटते : ऑप्शन आहे ग्रीन फटाक्यांचा

दिवाळी सुरू झाली आहे गेले २ वर्ष कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत नव्हता पण यंदा मात्र सगळीकडे उत्साह दिसून येत आहे. आता दिवाळी म्हटलं की फराळ, रांगोळी, आकाशकंदील, दिवाळी पहाट सारखा सांस्कृतिक कार्यक्रम…नवी खरेदी आलीच आणि दिवाळी म्हणजे अर्थातच फटाके.

खरंच राव फटाक्यांशिवाय दिवाळीची खरी मज्जा नाही असंच अनेकांचं मत असत. वर आकाशात जाऊन शोभेच्या व आकर्षक रोषणाई करणाऱ्या फटाक्यांमुळे दिवाळीची गंमत तर आणखीनच वाढते,

पण दिवाळी आणि फटाक्यांचा संबंध काय? फटाके कधी दिवाळीचा भाग झाले? आणि फटाके कुठून आले?

गेल्या पाच वर्षांपासून पासून दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रीन(हरित)फटाके ही चर्चा देखील सुरू होते तर मग जाणून घेऊ नक्की काय प्रकरण आहे.

दिवाळी हा सण भारतात अनादीकाळापासून साजरा केला जात आहे परंतु पौराणिक ग्रंथ आणि मिथकांचा अभ्यास केला तर असे लक्षात येतं की फटाक्यांचा उगम आपल्या संस्कृतीत झालेलाच नाही.प्राचीन ग्रंथांनुसार दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे.

पण फटाक्यांसारख्या मोठ्या आवाजाच्या कुठल्याही वस्तूचा उल्लेख आढळून येत नाही, कारण मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची परंपरा चीनमध्ये होती. फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे वाईट विचारांना मूठमाती मिळेल आणि समृद्धी नांदू लागेल, अशी चीनी लोकांची श्रद्धा होती आणि तिथूनच ती भारताकडे आली असावी असे अनुमान काढता येईल.

१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या औद्योगिकरणाला चालना मिळाली व इतर देशाच्या बरोबरीचे भारत व चीन व्यापारी संबंध अधिक वाढत गेले त्यामुळेच आजही फटाके बाजारात आपल्याला चायाना फटके तसेच दिवाळीचे कंदील, पणत्या,चायना लायटिंग हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.

फट्याक्यामुळे होणारे हवा आणि ध्वनी प्रदूषण या सगळ्याचा मानवी आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम याचा विचार करता फटाके हे हानिकारक व पर्यावरणाचे संतुलन बिघडवणारे आहेत त्यामुळे साहाजिकच फटाकेमुक्त दिवाळी या पर्यायाचा विचार केला जातो..

पण म्हणतात ना, जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतो म्हणूनच ग्रीन फटाक्यांचा पर्याय समोर आला गेल्या काही वर्षांपासून प्रदूषण मुक्त दिवाळीचा अर्थात इको फ्रेंडली फटक्यांचा आग्रह धरला जात आहे याचे मुख्य कारण म्हणजे फटाक्यांमुळे वाढणारे प्रदूषण होय.

ऑक्टोबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेत Low emission crakers बाबत केंद्र व सर्व राज्य सरकार यांना ठोस पावले उचला अशी सूचना केली होती त्याप्रमाणे दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्य सरकारकडून नियमावली जाहीर केली जाते नुकतीच चंदीगड येथील सरकारने ग्रीन फटाके वापरण्याची परवानगी दिली तसेच पश्चिम बंगाल सरकारने सुद्धा फक्त QR code असलेलेच ग्रीन फटाके आयात व विक्री करण्याचे आव्हान केले आहे गेल्या वर्षी सुद्धा दिल्ली सरकारने ग्रीन फटाके वापरता आणले जावे म्हणून पहिल्यांदाच पूर्णपणे फटाके विक्रीसाठी असून गेल्या वर्षी दिल्ली सरकारने दिल्ली मध्ये व्यवस्था केली होती.

तसेच यावर्षी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांपाठोपाठ आता गोव्यातही हवेचे कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्याचा विचार केला जात आहे. राष्ट्रीय हरित लवादाने(NGT) सुद्धा ज्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता पातळी मध्यम श्रेणीत खराब आहे त्या ठिकाणी कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणाऱ्या ग्रीन फटाक्यांना मंजुरी दिली आहे.

मात्र ग्रीन फटाके म्हणजे नेमक काय हे जास्त कोणाला माहीत नसतं खुद्द फटाके विक्रेत्यांना सुद्धा नेमके कोणते फटाके हरित फटाके आहेत याची कल्पना नाही त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यात काही प्रमाणात संभ्रम निर्माण होतो.

भिडू हे ग्रीन फटाके म्हणजे नेमक काय असत? आणि खरंच ते प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात का?

ग्रीन फटाके म्हणजे काय?

ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होतं, जे फटाके पर्यावरणपूरक आहेत,त्यांना ग्रीन क्रॅकर्स किंवा हरित फटाके असं म्हटलं जातं.हे ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यां प्रमाणेच दिसतात यामध्येही फुलबाजी, फ्लॉवरपॉट, स्काय शॉट असे प्रकार मिळतात.हे फटाकेही काडेपेटीच्या साह्याने उडवले जातात. याशिवाय या ग्रीन फटाक्यांमध्ये सुगंध असणारे फटाकेही असतात आणि वॉटर फटाके असतात.

पण हे फटाके उडवण्याची पद्धत जरा वेगळी असते. सामान्य फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन(हरित)फटाके हे कमी प्रदुषण करणारे आहेत. त्यासाठी वापरलेला कच्चा माल ही कमी प्रदुषण करणार आहे. त्यामुळे यातून वातावरणात बाहेर पडणारे घटक प्रदुषणासाठी कमी कारणीभूत असतात याशिवाय या फटाक्यांचा आवाजही पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत 110-125 डेसिबलपर्यंतच असतो. पारंपरिक फटाक्यांचा आवाज 160 डेसिबलपर्यंत असतो.

ग्रीन फटाके कसे तयार केले जातात नेमके काय मटेरियल वापरले जाते?

ग्रीन फटाके वेगळ्या पद्धतीने तयार केले जातात. या फटाक्यांमुळे प्रदूषण अजिबात होत नाही असं नाही; पण नेहमी फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांपेक्षा सरासरी 30 ते 40 टक्के कमी होऊ शकतं. तसंच ग्रीन फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायनं नसतात. त्यात अॅल्युमिनियम, बेरियम, पोटॅशिअम नायट्रेट, लिथियम आर्सेनिक,लीड तसेच कार्बन हे घटक वापरले जात नाहीत किंवा वापरलेले असले, तरी त्यांचं प्रमाण अत्यल्प असतं.

त्यामुळे वायू प्रदूषण कमी होतं. या फटाक्यांमुळे रोषणाई होते. हे फटाके नेहमीच्या फटाक्यांसारखेच असतात; मात्र ते पर्यावरणपूरक असतात हे महत्वाचं. हे फटाके उडवताना धूर निघतो पण त्याचं प्रमाणही अगदी कमी असतं.त्यामुळे हरित फटाके हे पर्यावरणस्नेही मानली जातात. त्यामधून वातावरणाचे ३० टक्के कमी प्रदूषण होते.

हरित फटाके कोणी तयार केले आहे?

२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाक्यांवर बंदी लागू केल्यावर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देशातील अग्रणी संशोधन संस्था ‘सीएसआयआर’ला हरित फटाक्यांवर संसोधनाची सूचना केली होती.

या फटाक्यांची निर्मिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (CSIR) व त्याअंतर्गत कार्यरत नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था(NEERI)व इतर अनेक संस्था या संशोधन प्रकल्पात सहभागी झाल्या होत्या त्यात नीरीची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली असून नीरीच्या नागपुरातील फॅसिलिटी सेंटरमध्येच हरित फटाक्यांच्या चाचण्या झाल्या.

“फटाक्यांमधील लोकप्रिय सहा प्रकारांवर संशोधन करून नीरीने ते हरित फटाक्यांच्या स्वरूपात विकसित केले. यात सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, अनार(जमीन चक्र),फुलझड्या आणि पेन्सिल अशा आवाज आणि शोभेच्या फटाक्यांचा समावेश आहे नीरीच्या एनव्हायर्नमेंटल मटेरियल डिव्हिजनच्या प्रमुख डॉ. साधना रायलू यांनी सांगितले की,

हरित फटाके विकसित करताना पारंपरिक फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेट रसायनाच्या वापरावर प्रतिबंध आहे.

त्यामुळे बेरियम नायट्रेटविरहित फॉर्म्युला विकसित करण्यावर नीरीने भर दिला. बेरियम नायट्रेटच्या जागी पोटॅशियम नायट्रेटचा वापर करण्यात आला आहे. हरित फटाक्यांची वेगळी ओळख म्हणून फटाक्यांवर वैशिष्ट्यपूर्ण हिरव्या लोगोचा वापर करण्यात आला आहे.यामुळे ग्रीन फटाके ओळखणे ग्राहकांसाठी सहज शक्य आहे सर्वसामान्य फटाक्यांच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के कमी प्रदूषण करणारे हरित फटाके (ग्रीन क्रॅकर्स) विकसित करून ते उत्पादकांच्या मदतीने प्रत्यक्ष बाजारात उपलब्ध करण्यात नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेला यश आले असताना नीरीने आता त्यापुढे जाऊन किमान ५५ टक्के कमी प्रदूषणकारी फटाक्यांच्या निर्मितीच्या दिशेने संशोधन सुरू केले आहे.

यातून हजार कोटींची उलाढाल होत असल्याने भारतीय फटाके उद्योगाची वार्षिक उलाढाल आता ६ हजार कोटींपेक्षा ही जास्त आहे, असे नीरीचे म्हणणे आहे. व दरवर्षी त्यात दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. देशातील पाच लाखापेक्षा ही जास्त लोकांना या उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत असतो. त्यामुळे पारंपरिक फटाक्यांवरील बंदीचा रोजगारावरील गंभीर परिणाम लक्षात घेऊनच या संशोधनाला चालना देण्यात आली आहे.

NEERIच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. साधना रायलू सांगतात,

“इकोफ्रेंडली फटाक्यांपासून कमी प्रमाणात हानिकारक गॅस निर्माण होतो म्हणजे सामान्य फटाक्यांपेक्षा 40 ते 50 टक्के कमी” सामान्य फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फर गॅस तयार होतो. अशा गॅसचं प्रमाण कमी करणं हा या संशोधनाचा उद्देश होता, असं त्या पुढं सांगतात. इको फ्रेंडली फटाक्यातले घटक हे सामान्य फटाक्यांतील घटकांपेक्षा वेगळे असतात. NEERIने त्यांची वेगळी रासायनिक सूत्र बनवली आहेत.

इकोफ्रेंडली फटाक्यांचे 4 प्रकार आहेत

1. पाण्याचे कण तयार कराणारे फटाके : या प्रकारचे फटाके फोडल्यावर त्यातून पाण्याचे कण तयार होतील. त्यामध्ये नायट्रोजन आणि सल्फर गॅस मिसळले जातील.याला Safe Water Releaser असं म्हणतात.प्रदूषण कमी करण्यासाठी हे फटाके अधिक प्रभावी ठरणार आहेत.यामध्ये फटाके फुटल्यावर बाष्परुपात पाणी बाहेर पडते त्यामुळे हवेतील धूलिकणाचे शोषण होते

2. सल्फर आणि नायट्रोजन कमी करणारे फटाके :  या फटाक्यांना STAR फटाके असं असे म्हणतात यामध्ये ऑक्सिडायझिंग उपयोग केला जातो. ते जाळल्यानंतर कमी प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फर तयार होतो.

3. कमी अॅल्युमिनियमचा वापर :  या फटाक्यांमध्ये 50 ते 60 टक्के अॅल्युमिनियम कमी वापरलं जातं. याला Safe Minimal Aluminium म्हणजे SAFAL असं नाव दिलं आहे. यामुळे (PM) पार्टिकल्युर मॅटर या दोन्ही PM 10 व PM 2 मध्ये घट होते

4. सुंगधी फटाके :  या फटाक्यांतून केवळ हानिकारक गॅस कमी होणार नाहीत. हे फटाके फोडल्यानंतर एक सुवासिक सुगंध येईल.

अरोमा फटाके

हे अगदी वेगळ्या प्रकारचे फटाके आहेत. नीरीने उत्पादित केलेले हे फटाके कमी हानिकारक वायू तयार करतात, तसेच ते जाळल्याने एक सुखद सुगंध देखील उत्सर्जित होतो…

कुठे मिळतात ग्रीन फटाके आणि किंमत किती?

गेल्या काही वर्षांपर्यंत काही ठरावीक संस्थाच या पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करत होत्या. आता मात्र मोठ्या प्रमाणावर या फटाक्यांचं उत्पादन होऊ लागलं आहे. त्यामुळे सरकारमान्य नोंदणी असणाऱ्या दुकानांमध्ये हे फटाके मिळू शकतील.हे फटाके सर्वसाधारण फटाक्यांपेक्षा थोडेसे महाग असतात. म्हणजे जे फटाके एरव्ही 200 ते 300 रुपयांना मिळतात, त्याच प्रकारच्या ग्रीन फटाक्यांसाठी सुमारे 400 ते 500 रुपये खर्च करावे लागू शकतात.

आपल्याला दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करायची असेल, तर ग्रीन फटाक्यांचा पर्याय चांगला आहे. वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण न करणारे फटाके आपल्याला आणि मुख्य म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरणाचा समतोल फार बिघडू देणार नाहीत.ग्रीन फटाके उडवून दिवाळीची नेहमीसारखी मज्जा लुटता येऊ शकेल. दिवाळी फटाकेमुक्त करण्यापेक्षा ग्रीन फटाके उडवून नेहमीसारखीच दिवाळी साजरी करणं चांगलं.

बोल भिडूच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

  •  भिडू अरविंद अरुणा रंगनाथ कड 

हे ही वाच भि़डू 

Leave A Reply

Your email address will not be published.