वैद्यकीय साधनांवरचा कमी केलेला GST फायद्याचं कलम होणार नसल्याचं का म्हंटलं जातं आहे?

कोरोना रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर एका बाजूला तब्येतीची काळजी तर असतेच पण दुसऱ्या बाजूला खर्चाचा मीटर देखील सुरु होतो. पेशंटच्या जीवापेक्षा पैसा महत्वाचा नाही असं आपण किती जरी म्हणालो तरी पैशांच टेन्शन येतचं हे वास्तव आहे.

हाच खर्च कमी करण्यासाठी मागच्या बऱ्याच दिवसांपासून कोरोना उपचारासाठी लागणारी साधन, औषध यावरील जीएसटी रद्द किंवा कमीत कमी त्यात घट करण्याची मागणी केली जात होती. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील ट्विट करून GST कमी करण्यावर भाष्य केलं होतं. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन देखील जीएसटीमधून सूट द्यावी अशी मागणी केली होती.

अखेरीस आज याबाबत सरकारकडून या मागणीचा विचार करुन त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आज जीएसटी कौन्सिलची ४४ वी बैठक पार पडली. त्यात सरकारकडून वैद्यकीय उपकरणं आणि कोरोनाशी संबंधित औषधं यांच्यावरील जीएसटी दरात कपात करण्याचा किंवा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,

या कर कपातीचा जनतेला जास्त आणि थेट फायदा मिळण्याची अपेक्षा नाही. त्यासाठी त्यांनी काही कारण देखील सांगितली आहेत. सोबतचं मध्यंतरी खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील सांगितलं होतं कि, कोरोनावरील औषधं आणि उपकारांवरचा जीएसटी हटवणं शक्य नाही, असे केल्यास ही जीवनरक्षक औषधे आणि वस्तू सर्वसामान्यांसाठी महाग होतील.

नेमकं असं का होईल?

असं का होईल हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला जुने दर आणि नवीन दर किती आहेत ते बघायला हवं.

ऑक्सिजन – 

जुने दर – १२ टक्के

नवीन दर –  नवीन दरानुसार ऑक्सिजन, ऑक्सिजननिर्मिती आणि संबंधित साधनांवर आता ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.

व्हेंटीलेटर्स – 

जुने दर – १२ टक्के

नवीन दर – नवीन दरानुसार व्हेंटीलेटर्स, व्हेंटीलेटर मास्क, कॅन्युला, हेल्मेट, बायपॅप मशिन, हाय फ्लो नॅसल कॅन्युला या सगळ्यांवर ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.

औषध : 

कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडीसीव्हीर, टोसीलिज़ुमाब, फेविपिरविर अशा औषध आणि इंजेक्शनांवर ५ आणि १२ टक्के जीएसटी आकाराला जात होता.

आता नवीन दरानुसार, रेमिडिसिव्हिर- ५ टक्के, टोसिलीझुमॅब- ० टक्के, अॅम्फोटेरिसिन बी- ५ टक्के, अॅन्टी-कोअॅग्युलन्ट – ५ टक्के, एमओएचएफडब्ल्यु आणि औषधविभागानं शिफारस केलेली अन्य औषधं – ५ टक्के.

इतर साधनांवरील जीएसटी :

साधन – जुने दर – नवीन दर 

मास्क – ५ टक्के – ५ टक्के

टेस्ट किट – १२ टक्के – ५ टक्के

सॅनिटायझर – १८ टक्के – ५ टक्के

पीपीई किट – ५ टक्के – ५ टक्के

पल्स ऑक्सिमिटर- १२ टक्के – ५ टक्के

आता मूळ प्रश्न म्हणजे याचा फायदा का होणार नाही? 

तर देशांतर्गत मेडिकल डिवाइस इंडस्ट्रीजची संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ मेडिकल डिव्हायसेस इंडस्ट्रीज’च्या म्हणण्यानुसार, 

उत्पादक आपल्या कच्च्या मालावर भरलेल्या इनपुटवर जीएसटी क्रेडिटचा लाभ घेऊ शकणातर नाहीत. यामुळे त्यांच्या भांडवलाचे बऱ्यापैकी नुकसान होईल आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी ते पूर्ण खर्च ग्राहकांकडून म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल करतील.

अशा परिस्थितीमध्ये जीएसटी कमी केल्यामुळे ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स अशा वस्तूंवर अत्यंत नगण्य अशा प्रकारचा फरक पडेल. उलट सरकारचा हा निर्णय म्हणजे आयातीला चालना देऊन देशांतर्गत व्यापाऱ्याला खीळ देण्यासारखा आहे.

७ टक्के आयात स्वस्त होईल. 

याच संघटनेचे कोर्डिनेटर राजीव नाथ यांच्या म्हणण्यानुसार,

कोरोनाशी संबंधित वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यामुळे याचा मुख्य फायदा हा आयात दारांना होणार आहे. कारण यामुळे आयात करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलात ७ टक्क्यांपर्यंत कमी येईल. पण याचा थेट फायदा किमतीवर दिसून येईल कि या बद्दल आताच सांगता येणार नाही.

अशा परिस्थितीमध्ये आता जर आयात स्वस्त झाली तर देशांतर्गत उत्पादकांना प्रतिस्पर्धीचं तयार होणार नाहीत. आणि या वस्तूकडे देखील कोणी वळणार नाही. कारण आयात केलेल्या वस्तू स्वस्त असतील.

पण सॅनिटायझर आणि थर्मामीटर अशा वस्तूंवरील जीएसटी कपातीचा फायदा मिळेल.

नाथ यांच्या म्हणण्यानुसार हॅन्ड सॅनिटायझर आणि थर्मामीटर अशा वस्तूंवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के केल्यामुळे ग्राहकांना सरळ फायदा होईल. त्यांच्या खिशाला जास्त भार येणार नाही.

सोबतच त्यांच्या म्हणण्यानुसार लॅब इंस्ट्रूमेंट, एक्स-रे मशीन यासारख्या आणखी ४० मेडिकल डिव्हायसेस वरील जीएसटी दर १८ टक्के आहे, याला कमी करून १२ टक्क्यांपर्यंत आणलं गेलं पाहिजे. या वस्तू कोणत्याही चैनीसाठी बनवलेल्या नसून आरोग्यसेवेसाठी महत्वाच्या आहेत.

याच गोष्टीमुळे सांगितलं जातं आहे की, वैद्यकीय साधनांवरचा कमी केलेला GST फायद्याचं कलम होणार नाही. आता उद्या याबाबत प्रत्यक्ष जीआर काढल्यानंतर बाजारात कसा परिणाम होईल हे बघता येऊ शकेल.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.