काही देशात ‘लेफ्ट हॅण्ड ड्राईव्ह’ तर काही देशात ‘राईट हॅण्ड ड्राईव्ह’ हे अस का असतय..?
गाड्यांचं खूप क्रेझ आपल्यातील अनेकांना असणारच. तेही अगदी लहानपणापासून. खेळणीतील गाडी-गाडी खेळायला लागलो तेव्हापासून… यात जर कधी उजव्याच्या जागी डाव्या साईडला गाडीचं स्टेअरिंग दिसलं तर ‘हे फॉल्टी पीस आहे’ असं म्हणून अनेकांनी भारीतल्या भारी गाड्या आपल्या पप्पांना परत करायला देखील लावल्या असतील.
मात्र जेव्हा कळायला लागलं तेव्हा समजलं असेल की, बाहेरच्या देशातील खेळणी होती ती, म्हणून स्टेअरिंग डाव्या बाजूला होतं, फॉल्टी नव्हती.
कारण भारतात उजव्या साईडने स्टेअरिंग असतं तर बाहेरच्या देशात डाव्या साईडने. हा नियमच असेल असं म्हणून अनेकांनी कोलून दिलं असेल. पण काहींना प्रश्न पडला असेलच की, असं का? सुरुवात कशी झाली असेल?
त्यांच्याच प्रश्नांचं उत्तर बघूया. या गोष्टीला खूप मोठा इतिहास आहे आणि शास्त्रशुद्ध कारण आहे.
हे डावं-उजवं सगळ्यात पहिले आलं ते लढायांच्या काळात. तलवारीच्या जमान्यात.
जोपर्यंत माणूस भांडत नव्हता, तोपर्यंत सगळं काही बरोबर होतं. पण नंतर लढाया होऊ लागल्या आणि माणसाच्या हातात तलवार आली. यात काय व्हायचं बहुतेक लोक हे उजवे म्हणजे रायटी असायचे. साहजिकच तलवार चालवणं उजव्या हाताने जमायचं. हे लोक जेव्हा घोड्यावरून रस्त्याने जात असल्याचे तेव्हा ते रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचे. जेणेकरून समोरून येणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या उजव्या बाजूने जावं लागेल आणि जर तो शत्रू असला तर त्याच्यावर सहज हल्ला करता यायचा.
अशानेच रस्त्यावरून डाव्या साईडने चालायची पद्धत पडली. ब्रिटन आणि फ्रांसमध्ये बहुदा ही पद्धत होती. तेही राज घराण्यातील लोकांमध्ये कारण त्यांना तेव्हा तलवार घेऊन रस्त्याने चालण्याचा मान होता.
यात ट्विस्ट आला अठराव्या शतकात.
फ्रान्स आणि अमेरिकेत. तेव्हा या देशांमध्ये शेतमाल वाहून नेण्यासाठी मोठमोठ्या बग्ग्या बनवल्या गेल्या. त्यांना घोडे बांधून ओढल्या जाऊ लागलं. पण त्यावर इतका लोड असायचा की बग्गी चालवणाऱ्यालाच बसायला जागा नसायची. अशात त्यांनी एक शक्कल लढवली. एक स्वतंत्र घोड्यांवरून बसून तो व्यक्ती बाकीच्या घोडयांना हाकलायचा.
त्या घोडयांना हाकलताना त्याला चाबूक मारावा लागायचा. चाबूक चालवण्यासाठी उजवा हात राखीव ठेवला जायचा. मग काय व्हायचं, हा व्यक्ती डाव्या बाजूच्या शेवटच्या घोड्यावर बसून उजव्या हाताने इतर घोडयांना रस्ता दाखवायचा.
अशात समोरून येणाऱ्या गाड्या आपण बसलो आहोत त्या साईडनेच गेल्या तर त्याला नीट अंदाज येईल की, गाड्या किती जवळून जात आहे? टक्कर तर होत नाहीये ना? म्हणून तो रस्त्याच्या उजव्या बाजूने बग्गी चालवायचा.
अशी पडली रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याची पद्धत…
बहुदा गरीब लोक जसे की, शेतकरी याचा वापर करायचे.
आता या दोन वेगवेगळ्या पद्धतींचं नियमात रूपांतर कसं झालं हे बघू…
रशियाने १७५२ मध्ये उजव्या साईडने चालण्याचा नियम करण्यात आला.
पण प्रखरतेनं नियमाची निर्मिती आणि अंमलबजावणी फ्रान्समध्ये झाली. फ्रान्सच्या क्रांतीपासून. क्रांतीच्या काळात फ्रान्समध्ये श्रीमंतांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. तेव्हा भीतीपोटी तिथल्या श्रीमंतांनी कुठेही जाण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालणं सुरु केलं. कारण आधी सांगितल्याप्रमाणे उजव्या साईडने जास्तकरून गरीब लोक चालायचे. त्यांना उपेक्षित आणि खालच्या स्तराचे समजून दुर्लक्ष केलं जायचं.
म्हणून जेव्हा श्रीमंत लोक त्यांच्यात मिसळले तेव्हा ते देखील दुर्लक्षित केले जायचे, त्यांचा जीव वाचायचा. यानंतर मग फ्रान्सने रस्त्याच्या उजव्या बाजूनेच चालण्याचा निर्णय घेतला. असा नियम केला १७९४ ला.
फ्रेंच राज्यक्रांतीपासून जे देश दूर राहिले त्यांनी डाव्या बाजूला चालण्याचा नियम केला. जसे की ब्रिटन आणि पोर्तुगाल. युरोपात एक ट्विस्ट आला, ज्याचं नाव होतं नेपोलियन. नेपोलियनने त्याच्या जिंकलेल्या सगळ्या प्रदेशात उजव्या बाजूने चालण्याचा नियम केला. नेपोलियननंतर बऱ्याच काळानंतर आला हिटलर. त्याने मग उर्वरित युरोपातील देशांमध्ये उजवीकडे चालण्याचा नियम केला.
मात्र हे नियम फक्त युरोप पुरते मर्यादित होते.
हे बाकीच्या देशांमध्ये पोहोचलं जेव्हा इंग्रज तिथे पोहोचले.
इंग्रजांची नेहमीची सवयच होती. आपलं राज्य असलेल्या देशात आपलीच चालवायची, आधीच सगळं काढून टाकायच. त्यानुसार जगातील ज्या ज्या देशांना ब्रिटिशांनी गुलाम केलं तिथे डाव्या बाजूने चालण्याचा नियम केला. जसं की, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड. तर जिथे फ्रान्स गेला, तिथे उजवीकडे चालण्याचा नियम होता.
आता यात गणित कसं असतं? बघूया…
डाव्या बाजूला चालणाऱ्या देशांमध्ये गाडीचं स्टेअरिंग उजव्या बाजूला असतं. त्याला राईट हॅन्ड ड्राइव्ह म्हणतात. याने काय होतं जाणून जाणाऱ्या गाडीचा अंदाज येतो. तर उजव्या बाजूने चालणाऱ्या देशांतील मोटारी डाव्या हाताने चालवल्या जातात.
फक्त स्टेअरिंगच नाही तर हेडलाइटमध्येही फरक पडतो. ते सरळ नसतात, थोडे तिरके असतात. डाव्या बाजूला चालणाऱ्या देशांमध्ये गाड्यांचे हेडलाइट डाव्या बाजूला झुकलेले असतात आणि उजव्या बाजूने चालणाऱ्या देशांमध्ये हेडलाइट उजव्या बाजूला झुकलेले असतात. याचं कारण की, समोरून येणाऱ्या ड्रायव्हरच्या डोळ्यांवर अंधारी येऊ नये.
मग देशांनी साईड चेंज का केली?
काही वर्षांनी काय झालं जे देश ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाले त्यांनी त्यांचे सगळे नियम बदलले. त्यात ट्रॅफिकचा देखील नियम बदलला. डाव्या बाजूवरून उजवीकडे शिफ्ट झाले.
त्यात भर पडली अमेरिकेची. अमेरिका ब्रिटनपासून मुक्त झाल्यावर रागाच्या भरात डावीकडून उजवीकडे आला. त्यानंतर त्यांनी स्वस्त कारचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं. उजव्या साईडने चालण्यामुळे या गाड्यांमध्ये स्टेअरिंग डाव्या बाजूला होते. तेव्हा ज्या देशांनी अमेरिकेकडून गाड्या आयात केल्या त्यांनी देखील साहजिकच रस्त्याच्या उजव्या बाजूला चालण्याचे नियम बनवले.
सगळ्यांनी नियम बदलले मात्र भारताने काही बदलले नाही. ‘जो जैसे चल रहा है, वैसे चलने दो’ म्हणत आपण डाव्याच बाजूने राहिलो. शिवाय गाड्याही भारतातच बनवलेल्या वापरू लागलो…
यात एक गमतीदार गोष्ट अशी की…
म्यानमारमधील वाहतूक डावीकडे चालायची पण १९७० साली हुकूमशहा जनरल ‘ने विन’ने वाहतूक डावीकडून उजवीकडे हलवली. आता त्याच्याशी पंगा कोणी घेणार म्हणून तर मग लोक रस्त्याच्या उजव्या बाजूलाच राईट हॅन्ड ड्राइव्ह गाडी चालवू लागले. आजही म्यानमारमध्ये बहुतांशी गाड्या उजव्या हाताने चालवल्या जातात.
तर असा आहे गाड्यांचं स्टेअरिंग डाव्या आणि उजव्या साईडने असण्याचं गणित. तुम्ही जाणून घ्या आणि इतर मित्रांना देखील सांगा…
हे ही वाच भिडू :
- पोलीस स्टेशनात गाड्यांचा ढीग लागलेला असतोय, त्यांचं पुढं काय होतं..?
- एक काळ असाही होता जेव्हा राज्याचा गृहमंत्री स्कूटरवरून सिग्नलला भेटायचा…
- नियम पाळा भिडू लोक, पेट्रोल पाठोपाठ आता ट्रॅफिकचा दंड देखील भडकलाय