म्हणून आपला हवामान विभाग अमेरिका, युरोपप्रमाणं अचूक अंदाज वर्तवू शकत नाही

भारताच्या हवामान विभागा (आयएमडी) बद्दल एक गोष्ट नक्की सांगता येईल, ती म्हणजे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज हा कधीच शंभर टक्के खरा होत नाही. हवामान खातं रेड अलर्ट सांगतं आणि ऊन पडल्याचं आपणच बघतो.

परवाचंच उदाहरण घ्या ना! हवामान विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने पुण्यासह ५ जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता.

यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी पाऊस पडलाच नाही. यानंतर सोशल मीडियावर हवामान विभागावर बरेच जोक करण्यात आले होते. ज्या-ज्या वेळी आयएमडी अंदाज वर्तवते त्याच्या उलटंच घडत असं सुद्धा बोललं गेलं. 

अमेरिका, युरोपसारख्या देशांमधील हवामान विभाग पावसाचा अचूक अंदाज सांगू शकतात तर भारताचा हवामान विभाग का अचूक अंदाज सांगू शकत नाही असा प्रश्न विचारण्यात येत आहे. 

डेटावरून अंदाज लावण्यात अपयशी  

हवामानाचे अंदाज उपकरणांद्वारे एकत्रित केलेल्या डेटावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. यासाठी डॉपलर रडार, सॅटेलाईट, रेडिओ साऊंड, रेडिओ मीटर, बलून,  निरीक्षण केंद्र, नव्याने विकसित झालेले तंत्रज्ञान सारख्या गोष्टी वापरून हवामाना संदर्भातील डेटा जमा केला जातो. 

या डेटाचा अभ्यास करून हवामाना बद्दलची माहिती सांगितली जाते. भारतानं याबाबतीत काही प्रमाणात प्रगती साधली असली, तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका, युरोप सारख्या विकसित देशांच्या आपण बरेच मागे आहोत.

हवामानाच्या अचूक माहितीसाठी डॉपलर रडार महत्वाचे समजले जाते. 

डॉपलर रडार पाऊस, ढगांचा प्रवास, त्यांची गती, वीज पडणार असेल तर त्याबद्दलची माहिती मिळविण्याचे महत्वाचे काम करतो. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फक्त ३४ रडार आहेत. मागच्या ५ वर्षात नवीन ६ ठिकाणी रडार बसविण्यात आले असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

अमेरिकेचा विचार केला तर देशभरात  २०० डॉपलर रडार आहेत. भारताच्या तुलनेत ही रडारची संख्या जास्त आहे. त्यामुळेच अमेरिकेचा हवामान विभाग अचूक अंदाज व्यक्त करतो.

तसेच हवामान तज्ज्ञांच्या मते फक्त हवामाना संदर्भात अचूक माहिती मिळवायची असल्यास डेटा महत्वाचा असतो. फक्त डेटा असून चालत नाही तो योग्य सुद्धा असायला हवा. जर चुकीची माहिती पुरविण्यात आली तर त्यावर काढण्यात येणार अंदाज सुद्धा चुकीचा लागतो. सध्या देशभरात निरीक्षण केंद्र वाढविण्यात येत आहेत. मात्र डेटा मिळविण्यासाठी हे केंद्र पुरेसे नसल्याचे सांगितले जाते. 

तर आयएमडीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाच्या वतीने चक्री वादळाचा अंदाज अचूक वर्तविण्यात येतो. भारताच्या पुढे अमेरिका, जपान, चीन युरोप आहे. त्यामुळे भारत खूप मागे आहे असं आपण म्हणू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

निरीक्षण केंद्र, उपकरणांची अपुरी संख्या

 गेल्या आठवड्यात अमरनाथ येथील  गुहे जवळ ढग फुटले होते. दरवर्षी लाखो भक्त पावसाळ्यात अमरनाथ यात्रे निमित्त येत असतांना हवामाना अंदाज लावण्यासाठी यंत्रणा अथवा रडार नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. 

मुंबई येथे ४ रडार बसविण्यात आले असून त्यापैकी फक्त २ रडारच सुरु आहेत. तर हैद्राराबाद  येथीलही काही रडार बंद आहेत. तर बंगलोर सारख्या मोठ्या शहरात एक सुद्धा रडार नाही. महत्वाचं म्हणजे जिथून चक्रीवादळाला सुरुवात होते अशा अंदमानला सुद्धा डॉपलर रडार नाही.

मागच्या २० वर्षांपासून अंदमान आणि निकोबार या बेटांवर रडार बनविण्यात येईल अशी चर्चा आहे. मात्र अजूनही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

याबाबत आयएमडीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, “२०२५ पर्यंत देशभरात राडारची संख्या ६५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. हिमालयात ४ ठिकाणी, ईशान्य भारतात १० ठिकाणी तर उत्तर भारतात मैदानी प्रदेशात ११ ठिकाणी नवीन रडार बसविण्यात येणार आहे.  इस्रोच्या वतीने भारतीय बनावटीचे डॉपलर रडार तयार करण्यात येत आहे मात्र त्याची संख्या खूप कमी आहे.”   

आयएमडीकडून नागरिकांना अपडेटसाठीची सुविधा नाही 

मागच्या ५ वर्षांचा विचार केला तर आयएमडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या शहरात निरीक्षण केंद्र आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली आहे. या मोठ्या शहारत हवामानाचा अंदाज अचूक यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते.

तर  दुसरीकडे पाहायला गेले तर न्यूयॉर्क, लंडन सारख्या शहरात २४ तास हवामानाची माहिती देणारे चॅनल आहेत. तिथले नागरिक या चॅनेलवरून अपडेट पाहतात. मात्र भारतात दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारची कुठलीही सुविधा नाही.   

उलट आयएमडीचे अधिकारी सांगतात की,  गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या राज्यातील हवामानावर अधिक लक्ष ठेवण्यात येते. कमी आणि रिमझिम पावसाचा अंदाज लावता येत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडतो तिथे आम्ही उपकरणे वापरत नाही.

उष्णकटीबंध हवामानामुळे अंदाज लावणे कठीण जाते 

भारतात किनारपट्टी, मैदानी आणि पर्वतीय प्रदेशांचे मिश्रण आहे. उंच ठिकाणापेक्षा उष्णकटीबंध भागातील हवामानाचा अंदाज व्यक्त करणे अवघड समजले जाते. भारतात जवळपास सात हजार किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. याचा हवामानावर बराच प्रभाव पडतो. मान्सूननंतरच्या परिस्थितीत जमिनीची हवा आणि समुद्राची हवा यासारख्या गोष्टी हवामानात महत्त्वाची भूमिका निभावत असतात. तसेच भारतात ऋतूंचा काळ देखील मोठा असतो. 

मध्यउंचीवर असलेल्या युरोपीय देशांशी त्याची तुलना केली, तर तिथे ऋतुत खूप कमी बदल होतात. या भागात काही ठिकाणी टोकाच्या हवामान बदलांचा सामना करावा लागतो. मात्र, अशी स्थिती जास्त काळ नसते. 

याबाबत आयएमडीचे अधिकारी सांगतात की, “भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो. तसेच हा भाग समुद्र आणि महासागरांनी वेढलेले आहे. यामुळे  हवामान बऱ्यापैकी उबदार असते. जास्त तापमान असल्याने आर्द्रता वाढते. युरोप आणि अमेरिकेसारख्या मध्यम उंचीपेक्षा उष्णकटिबंधीय हवामानाचा अंदाज बांधता येत नाही. भारता बरोबरच बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांमधील हवामानाचा अचूक अंदाज सांगणे कठीण असते.”

अचूक अंदाज वर्तविण्यासाठी भारताला वेगळ्या उपायाची गरज का आहे?

हवामानाचा अंदाज ज्या रडारवर अवलंबून असतो, ती रडार यंत्रणा ‘लाईन ऑफ साईड’ वर  काम करते. महासागरांमधील ‘लाईन ऑफ साईड’ स्पष्ट असते आणि म्हणूनच एकच रडार जवळजवळ ५०० किलोमीटर पर्यंत काम करू शकते.  म्हणूनच, रडार काही महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आल्याने  देशात चक्रीवादळाचा अंदाज हवामान विभाग अचूकपणे वर्तवित आहे. पण अमरनाथसारख्या भागात मोठ्या पर्वतरांगा असल्याने रडारवर मर्यादा येतात. याभागात ५०० किलो मीटरचा अंदाज पाहण्यासाठी २० रडारची गरज लागते.” 

भारतातील हवामानाचा विचार केला तर, बलूनसह रेडिओ साऊंडचा वापर केल्यास वाऱ्याची दिशा, आर्द्रता, तापमान आणि दाब यांची माहिती मिळू शकते. आयएमडीने रेडिओ साऊंडचा खूप कमी वेळा  वापर केला आहे. यामुळेच हवामानाचा अंदाज लावण्यात आयएमडी चुकीचे ठरले आहे. 

आता आयएमडी डेटा बरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचाही वापर केला जात आहे. तसेच आयआयटी, मोठ्या युनिव्हर्सिटीज, गुगल सारख्या कंपन्यांची मदत घेऊन हवामानाचा अंदाज अचूक कसा लावता येईल याबद्दल काम करत आहे. 

मागच्या काही वर्षात सरकाकडून आयएमडीसाठीची आर्थिक तरतूद वाढविण्यात आली   

सरकार या विभागावर करोडो रुपये खर्च करत असतांना हवामान विभाग का अचूक अंदाज का सांगू शकत नाही? अशी टीका नेहमी करण्यात येते. आयएमडी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते. विज्ञान मंत्रालयाने आयएमडीसाठी २०२०-२१ या वर्षात २१७ कोटी ८४ लाखांची तरतूद केली होती. तर २०२१-२२ साठी ३३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर यावर्षी ही रक्कम वाढवून ४६० कोटी करण्यात आली आहे.

त्यामुळं आता आयएमडीकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.