बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण आलं की समजायचं तुम्ही मुंबईत नाव कमावलं..

मुंबईमध्ये दरवर्षी एक हायप्रोफाईल इफ्तार पार्टी आयोजित केली जाते. आता काही पार्टीमध्ये मुख्य आकर्षण म्हणून फार तर फार १-२ बॉलिवूडचे सेलेब्रिटी बोलावले जातात.

पण ही इफ्तार पार्टी इतकी हायप्रोफाईल आहे कि त्या पार्टीत तुम्हाला १-२ सेलिब्रेटी नाही तर बॉलिवूड स्टार्स आणि राजकीय नेत्यांशिवाय इतर कुणीच दिसणार नाही.  या इफ्तार पार्टीचं निमंत्रण आलं कि समजायचं तुम्ही मुंबईच्या दुनियेत मोठं नाव कमावलं मग ती दुनिया बॉलिवूडची असो वा राजकारणाची.

याचं निमंत्रण मिळालं कि कुणी ‘नाही’ म्हणू’च’ शकत नाही.

या पार्टीत सगळ्या बॉलिवूड स्टार्समध्ये एक चेहरा मात्र उठून दिसतो. ज्यांच्यासोबत प्रत्येक जण आदराने वागतांना दिसतात. पार्टीला आलेला प्रत्येक बॉलिवूड स्टार बाबा सिद्दीकी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक असतो मग तो शाहरुख खान असो सलमान किंव्हा संजय दत्त. 

त्या चेहऱ्याचं नाव आहे बाबा सिद्दीकी.

मुंबईमधील एक पॉवरफुल नाव. मुंबईतील जवळजवळ प्रत्येक हायप्रोफाइल व्यक्तीचा बाबा सिद्दीकींसोबत कॉन्टॅक्ट असतो. काही जण त्यांना गॉडफादर देखील मानतात.   

बाबा सिद्दीकी यांनी नुकताच कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, ते अजित पवार गटात जाणार आहेत.

बाबा सिद्दीकी यांचा बॉलिवूड मध्ये मोठा दबदबा असल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्या इफ्तार पार्टीत अनेक वर्षांचे वैर संपते. कारण कित्येक वर्षांपासून जानी दुश्मन असलेले शाहरुख खान आणि सलमानमध्ये या बाबा सिद्दीकी यांनीच समेट घडवून आणलं होतं असं म्हणलं जातं. 

पण हे बाबा सिद्दीकी कोण आहेत ? आणि त्यांची इफ्तार पार्टी एवढी फेमस का असते ? 

त्यांचं पूर्ण नाव बाबा जियाउद्दीन सिद्दीकी आहे. त्यांचे वडील वांद्रे येथे घड्याळ बनवण्याचे काम करायचे. याच कामात सिद्दीकी देखील मदत करायचे. त्यांनी मुंबईच्या एमएमके कॉलेज मध्ये शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणादरम्यान त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली. 

१९७७ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाची विध्यार्थी संघटना म्हणजेच NSUI मध्ये प्रवेश केला. १९८० मध्ये ते मध्ये वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनले. तर १९८२ मध्ये NSUI अध्यक्ष बनले. 

मग ते सक्रिय राजकारणात उतरले. त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूका लढवल्या. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. २००४ ते २००८ या काळात ते अन्न आणि नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री देखील बनले होते. मुंबईत असणारा त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांच्या पुढाकाराने स्थानिकांची कामं पार पडतात आणि म्हणूनच त्यांना मुंबईतला मास लीडर म्हणून ओळखलं जातं.

आज याच वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी हे आमदार आहेत.

आता प्रश्न पडतो ते म्हणजे बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूडचं कनेक्शन कसं काय?

बाबा सिद्दीकी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही वांद्रे इथून झाली. जन्मभूमी आणि कर्मभूमी वांद्रे असल्याकारणाने बाबा सिद्दीकी यांचा जनसंपर्क वाढतच चालला होता. नेमकं वांद्रेतच बॉलिवूडमधले बरेच अभिनेते-अभिनेत्री राहतात. त्यांचे सुरुवातीपासूनच सुनील दत्त यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले. त्यामुळे सिद्दीकी आणि संजय यांच्यात मैत्री झाली. संजय दत्तच्या माध्यमातून त्यांची सलमान खानसोबतही मैत्री झाली.

दर वर्षी ताजमध्ये आयोजित केली जाणारी त्यांची इफ्तार पार्टी अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. आधी फक्त राजकीय नेतेच त्यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावत असत, पण हळूहळू त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींनाही आमंत्रित करायला सुरुवात केली आणि त्यांच्या इफ्तार पार्टीला ग्लॅमर मिळालं. 

आता तर या पार्टीला आमंत्रण मिळणं म्हणजे बॉलिवूड कलाकारांसाठी मोठा सन्मान समजला जातो.

इफ्तार पार्टी आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीशिवाय त्यांचं नाव दाऊदसोबत जोडलं जातं.

याची लिंक अशी लावली जाते की, संजय दत्तचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याने संजय दत्तचे मित्र म्हणून सिद्दीकी हे देखील अंडरवर्ल्डसोबत असल्याच्या दंतकथा सांगितल्या जातात.

पण असं सांगितलं जातं कि सिद्दीकी यांचे दाऊद सोबत वाद होते. सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, दाऊदचा जवळचा अहमद लंगडा याचा अन सिद्दीकी यांच्यात मुंबईतील जमिनीच्या तुकड्यावरून वाद झालेला. असंही म्हणलं जातं की, 

छोटा शकीलने बाबा सिद्दीकी यांना धमकी दिली होती. तसेच दाऊदने २०१३ मध्ये सिद्दीकी यांना फोनवरून धमकी दिली होती की, 

राम गोपाल वर्मा यांना सांगून ‘एक था आमदार’ असा पिक्चर काढायला सांगेन. 

तेव्हा सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी अहमद लंगडाला अटक करून मोक्का लावला होता. हे प्रकरण मुंबईत बरंच गाजलं होतं.

याशिवाय सिद्दीकी पुन्हा एकदा २०१७ मध्ये चर्चेत आलेले. जेंव्हा त्यांच्यावर ईडीने छापा टाकला होता. मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्यात सिद्दीकी यांचं नाव आलेलं. पण पुढे त्यांच्यावर काहीच कारवाई मात्र झाली नाही.

 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.