कॉंग्रेस गवताला “कॉंग्रेस गवत” का म्हणतात..? 

एकवेळ शेतकऱ्यांच्या पोरांनी ऊस बघितला नसेल, कापूस बघितला नसेल, तूर, मूग, उडिद, गहू, कांदा कायच्या काय बघितलं नसेल पण शेतात पाय ठेवणाऱ्या प्रत्येकाने कॉंग्रेस गवत बघितलं असणाराय. कॉंग्रेस गवत माहित नसणारा माणूस सहसा सापडणार नाही. प्रत्येक बारक्या पोराला शेतातलं पहिलं काम लागायचं ते म्हणजे शेतातलं कॉंग्रेस उपटायचं.

अनावश्यक येणारं आणि येड्यागत वाढणारं गवत म्हणजे कॉंग्रेस गवत.

याच गवताला गाजर गवत म्हणून देखील ओळखलं जातं. काहीजण कॉंग्रेस म्हणतात तर काहीजण गाजर. विशेष म्हणजे या दोन्ही संदर्भातून आपल्याकडे राजकीय पक्ष आहेत. थेट नावाशी साधर्म्य असणारी कॉंग्रेस पार्टी आणि दूसरीकडे गाजरावरून टिकेची धनी झालेली भाजप. 

पण इतके वर्ष कॉंग्रेस गवत उपटून उपटून देखील ते नष्ट होवू शकलं नाही. त्याचा त्रास असतो. धड हे गवत जनावरं पण खात नाहीत. पाणी असो वा नसो. एकवेळ बाभळ येणार नाही पण कॉंग्रेस गवत कुठनं तरी डोकं काढणारचं. 

असो तर आपला विषय आहे कॉंग्रेस गवताला कॉंग्रेस गवत अस का नाव पडलं, आणि यात कधीकाळी सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेसचा काही संबंध आहे का. 

कॉंग्रेस गवत भारतात ज्या पद्धतीने आलं त्या पद्धतीमुळे या गवताला कॉंग्रेस गवत अस म्हणत असल्याचं सांगण्यात येत. ही थेअरी अशी आहे की, 

१९५० च्या दशकात भारतात दुष्काळ पडला होता. भारत तेव्हा अन्नधान्यात स्वयंपुर्ण नव्हता. मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आयात करावे लागत असे. तेव्हाच्या तत्कालीन कॉंग्रेस सरकारने यावर एक योजन आखली. या योजनेप्रमाणे अमेरिकेतून PL480 अंतर्गत मोठ्या प्रमाणात गहू आयात करण्यात आला.

या गव्हामधूनच कॉंग्रेस गवताच बी भारतात आलं. शासकिय योजनेतून गव्हाची आयात करण्यात आली होती. संपुर्ण भारतभर हा गहू वाटण्यात आला. या गव्हातूनच हे बी शेतात आलं आणि पसरलं. अस सांगण्यात येतं. 

तरिही काही प्रश्न अन्नुतरीत राहतात. ते म्हणजे हा गहू प्रामुख्याने खाण्यासाठी वापरला जात होता. आत्ता तो गहू हलक्या प्रतीचा असल्याने अनेक ठिकाणी या गव्हाची नासाडी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच हे बी सर्वदूर पोहचलं. एकदा एक कॉंग्रेसच झाडं उगवलं तर राजकिय पक्षाप्रमाणेच त्याने हातपाय पसरण्यास सुरवात केली आणि पाहता पाहता हे गवत आसेतू हिमाचल पसरलं. आत्ता या नवीन गवताला कॉंग्रेस गवत नाव कसं मिळालं तर साहजिक आहे, कॉंग्रेसमुळं आलं म्हणून कॉंग्रेस गवत अशी थेअरी लावली जाते. 

आत्ता याला थेट पूरावा काही आहे का तर नाय, नो, नेव्हर… 

पण विचार करा एखाद्या गवताला नाव देण्याची स्वतंत्र भारतातली ही पहिलीच घटना होती. म्हणजे कसं तर लाखों वर्षाच्या इतिहासात मानवाने खूप वनस्पती, झाडे, गवत पाहून झालेलं. आपआपल्या पद्धतीने त्याला नावे देखील दिलेली आहे. ही नावे बऱ्याचदा वेगवेगळी असतात. म्हणजे पावट्या कोणी पोपटी म्हणतं तर कोण वाल म्हणतं. गवारीला कोणी बावची म्हणतं. पण हा प्रकार कॉंग्रेस गवताच्या बाबतीत नाही.

संपुर्ण भारतात कॉंग्रेसला गवताला कॉंग्रेस गवतच म्हणलं जातं. काही ठिकाणी गाजर गवत म्हणतात. पण ते फक्त इकडचं. 

आत्ता इतकं लिहलय तर गवताचा इतिहास पण बोनसमध्ये पहायला हवा. म्हणजे कसं कॉंग्रेस गवताबद्दल टोटल अभ्यास पुर्ण होईल. 

या गवताच शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टेरोफोरस. म्हणजे हे या गवताच ओरिजनल नाव. मेक्सिको, उत्तर अमेरिका, वेस्ट इंडिज या हे या गवताच मुळ. पण साम्राज्यवादाला सुरवात झाली आणि हे गवत ब्रिटीशांप्रमाणे संपुर्ण जगभर गेलं. बरं ते तिथं रुजलं हे विशेष. कॉंग्रेस गवत नष्ट करण्याचे विशेष उपाय नव्हते, तसेच एका गवतातून हजारोंच्या संख्येने बिया बाहेर पडत असल्याने ते थांबवणं कोणाच्याही हातातली गोष्ट नव्हती. सो संपुर्ण भारतात कॉंग्रेस गवत रुजलं वाढलं.

आत्ता लोकांच्या हातात काय आहे तर सकाळ संध्याकाळ कॉंग्रेस उपटत बसणं. कितीही उपटलं तरी कॉंग्रेस मात्र येतच राहतं. आत्ता म्हणू नका ६० वर्षात काय केलं !!! 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.