पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे सुपरॲक्टिव्ह मोडमध्येच का आहेत..?

मी जिथे जिथे जातो तिथे गर्दी होते. पैठणच्या सभेसाठी औरंगाबादच्या  विमानतळावर पोहचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यापासून एकनाथ शिंदे हे सुपरॲक्टिव मोडमध्ये आलेले आहेत.

यापूर्वी कधीही सभा न गाजवणारे एकनाथ शिंदे सभा गाजवू लागलेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा दूसरा औरंगाबाद दौरा आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला भेट देण्याचे सोपस्कार पुर्ण केलेले आहेत. 

अगदी मुख्यमंत्र्यांनीच दिलेल्या माहितीनुसार एकट्या दिड दिवसाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी किमान अडीचशे ठिकाणी भेट दिल्यात. 

पुण्यातल्या दौऱ्यात तर त्यांनी पेठेतले, मानाचे गणपती एका सत्रात पूर्ण केले. दूसरीकडे सभा सुरू आहेत. तिसरीकडे शासकिय पातळीवर लोकप्रिय निर्णयांच्या फैरी झडत आहेत. दहिहंडी गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय असो की ७५ वर्षावरील नागरीकांना एस्टीने मोफत प्रवास असो समाजातला कोणताच घटक दुखावणार नाही याची पुरेपुर काळजी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतली जात आहे..

पण अस का, हा सुपरॲक्टिव मोड का? हा प्रश्न विचारणं साहजिक आहे, कारण महाराष्ट्राला अशा प्रकारे सुपरॲक्टिव्ह मुख्यमंत्र्यांची सवय नाही. असे मुख्यमंत्री असलेच तर ते निवडणूकीच्या चार महिने अगोदर पहायला मिळतात.. 

तर मुख्यमंत्र्यांनी सुपरॲक्टिव्ह राहण्याचे तीन प्रमुख कारण राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येतात. हीच तीन कारण आपण एकेका मुद्द्याने पाहूया.

पहिलं कारण म्हणजे किमान नैतिकता मिळवणं.. 

विरोधकांनी विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके ही टॅगलाईन माध्यमांमधून पोहचवली. कितीही झालं तरी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भाजपने सुरू केलेले चौकशी सत्र आणि पैशांचे व्यवहार हे दोन आरोप लोकांपर्यन्त पोहचवण्यात विरोधक गुंतलेले आहेत.

अशा वेळी पक्षाला विशेषत: एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे किमान नैतिकता प्रस्थापित करणं गरजेचं आहे. अशा वेळी आपल्या भूमिका जास्तीत जास्त लोकांच्यात जावून माडंण्यावर एकनाथ शिंदे भर देत आहेत, सोबतच लोकप्रिय निर्णय घेवून जास्तीत जास्त मास लेव्हलला लोकप्रियता मिळवून घेण्यावर त्यांचा भर राहिलेला दिसून येतोय.

दूसरं कारण म्हणजे स्वत:च्या गटाचं अस्तित्व दाखवण्याचा संघर्ष 

एकनाथ शिंदे फक्त ठाकरे गटासोबत लढत आहेत का? तर याच उत्तर नाही अस मिळतं. ज्या पद्धतीने ठाकरे गटाला विरोध करत उभा राहणं हे दिव्य आहे त्याचप्रमाणे भाजपला समांतर आपलं अस्तित्व दाखवण्याची गरज आहे. त्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंनी आपल्या गटातील व्यक्तींना मंत्रीपद देत असताना स्वत:च्या मत महत्वाचं असल्याचं जाणवून दिलय.

आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 हून अधिक आमदार असले तरी अनेक आमदार हे एकनाथ शिंदे नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ आपली निष्ठा व्यक्त करतात. उदाहरणचं घ्यायचं झालं तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच घेता येईल. तानाजी सावंत हे पहिल्या पासून देवेंद्र फडणवीस गटाचे म्हणूनच ओळखले जातात.

युतीच्या जागावाटपात मतदारसंघ सेनेकडे गेल्याने तानाजी सावंत यांनी सेनाप्रवेश करून तिकीट मिळवलं. त्यामुळे अंतीम निष्ठा देवेंद्र फडणवीसच अस मत शिंदे गटातील अनेक आमदारांच आहे. अशा वेळी एकनाथ शिंदेंना बायपास करून ही निष्ठा व्यक्त केली जाणार नाही याची दक्षता एकनाथ शिंदे घेताना दिसून येतात. यासाठी ठाकरे विरोधाची लाईन मोठ्ठी करत जाणं व ठाकरेंचा मोठ्ठा विरोध आपणाला सातत्याने होत असल्याचं सोबतच्या आमदारांना दाखवून देणं गरजेचं ठरणार आहे.

बंडखोरी केलेले आमदार भाजपसोबत जाताच, एकनाथ शिंदेचं महत्व कमी होईल याची जाणीव खुद्द एकनाथ शिंदे यांनाच आहे. त्यामुळे सातत्याने स्वत:च्या गटाचं अस्तित्व दाखण्यात एकनाथ शिंदे गुंतलेत

तिसरं कारण कधीही निवडणूका होतील, जेव्हा होतील तेव्हा बेरजेचं राजकारण पाहणं

काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत. सोबत महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणूका येवू घातल्या आहेत. या निवडणूकांसोबत सर्वोच्च न्यायालयातील निकालावर शिंदे सरकारचं भविष्य टांगलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर याच निवडणूकांसोबत राज्यातील विधानसभांच्या निवडणूका होतील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

या सर्व घडामोडी पाहता, अचानकपणे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात आला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकांपर्यन्त पोहचण्याचा वेळही नसणार आहे. दूसरीकडे ठाकरे गटाकडून सहानभुतीचं राजकारण करण्याला प्रेफरन्स राहणार आहे. 

अशा वेळी अधिकाधिक बेरीज करणं हेच एकमेव ध्येय आहे. मग राज ठाकरेंची भेट असो की उद्धव ठाकरेंच्या विरोधातील त्यांच्या कुटूंबातील सदस्यांची भेट असो. एकनाथ शिंदे हे आपली बेरीज वाढवण्याकडे व्यक्तीश: लक्ष्य देत आहेत.

याच गोष्टींमुळे एकनाथ शिंदे हे सुपरॲक्टिव मुख्यमंत्री असलेले दिसून येतात. सर्वोच्च न्यायालयाचा अंतीम निकाल आला, तो एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला, दरम्यानच्या काळात मुंबई महानगरपालिकांसह इतर महानगरपालिकांच्या निवडणूका पार पडल्यानंतर मात्र आपला हाच सुपरॲक्टिव्हपणा टिकवून ठेवणं एकनाथ शिंदे यांच्यासमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.