भारताला जगात भारी बनवण्यासाठी परकीय चलन साठा इतका महत्त्वाचा का आहे?

१ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलं होतं. कोणत्या क्षेत्राला काय मिळणार, कोणत्या घोषणा होणार याबद्दल तर्कवितर्क केले जात होते, अंदाज बांधले जात होते. आता हे सर्व अर्थ म्हणजेच इकॉनॉमी संदर्भात होतं. बजेटच्या अगदी एकच दिवस अगोदर अजून एक बातमी इकॉनॉमी संदर्भात बातमी आली आहे, ज्याने देशाला फुल्ल फॉर्ममध्ये आणलंय.

सोमवार ३१ जानेवारीला भारताच्या परकीय चालनाबद्दल माहिती उघडकीस आली, ज्यात भारताने प्रगती केल्याचं सांगण्यात आलं. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी सांगितलं की, भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा परकीय चलन साठा आहे. त्यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं की, १९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत भारताचा परकीय चलन साठा ६४०.४ अब्ज डॉलर आहे.

भारत हा चौथ्या क्रमांकावर असून फक्त चीन, जपान आणि स्वीत्झर्लंड भारताच्या पुढे आहेत. आता भारतासाठी किंवा कोणत्याही देशासाठी परकीय चालनसाठा इतका महत्त्वाचा का असतो? हे जाणून घेऊच पण त्याआधी 

हा परकीय चलन साठा असतो काय? हे बघू…

परकीय चलनसाठ्याला ‘Reserve Currency’ असंही म्हणतात. प्रत्येक देशाची सेंट्रल बँक ही रक्कम औपचारिक रित्या साठा म्हणून जमा करत असते. बहुतांश देश आपला साठा खुल्या आणि मोठ्या बाजारात चालणाऱ्या चलनातच ठेवतात, जेणेकरुन ही रक्कम गरज असेल तेव्हा काढून घेता आली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. सर्वाधित परकिय चलनसाठा हा अमेरिकन डॉलरमध्ये ठेवला जातो कारण डॉलर हे जगातील सर्वाधिक व्यवहारात वापरलं जाणारं आणि विश्वासू चलन आहे.

परकीय चलनसाठा का गरजेचा असतो?

रिझव्‍‌र्ह बँकेसाठी परकीय चलनाचा साठा खूप महत्त्वाचा आहे. आरबीआय जेव्हा चलनविषयक धोरण ठरवते तेव्हा तिच्याकडे किती परकीय चलनाचा साठा आहे, हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. RBI च्या तिजोरीत डॉलर भरला की चलन मजबूत होतं. परकिय चलनसाठा एखाद्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्य तपासणीच्या  मीटरसारखा असतो. जर एखाद्या देशाजवळ परकिय चलनसाठा चांगला असेल तर त्या देशाच्या आर्थिक स्थितीला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच उच्च समजलं जातं. 

भारत मोठ्या प्रमाणावर आयात करणारा देश आहे. जेव्हा आपण परदेशी लोकांकडून कोणतीही वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याचे व्यवहार डॉलरमध्ये होतात. अशा परिस्थितीत आयातीला मदत करण्यासाठी परकीय चलनाचा साठा असणं आवश्यक आहे. परदेशातून येणारी गुंतवणूक अचानक कमी झाली, तर त्यावेळी त्याचं महत्त्व आणखी वाढतं.

परकीय चलन साठा केंद्रीय बँकासाठी महसूल मिळविण्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहेत, जे परकीय सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवतात आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि इतर सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक करतात.

जर परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होत असेल तर याचा अर्थ देशात मोठ्या प्रमाणात एफडीआय येत आहे. परकीय गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची आहे. परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारपेठेत पैसा ओतत असतील, तर त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास वाढत असल्याचा संकेत जगाला मिळतो.

परकिय चलनसाठ्यामध्ये परदेशी चलन, गोल्ड रिझर्व्ह, SDR आणि  IMF कोटा डिपॉसिट, ट्रेझरी बिल, बॉन्ड आणि इतर सरकारी सिक्यूरीटीज समाविष्ट असतात. भारतात RBI ही परकीय चलनसाठ्यास जबाबदार आहे.

२०२० च्या शेवटी भारत परकीय चलन साठ्यात पाचव्या क्रमांकावर होता. मात्र २०२२ च्या सुरुवातीलाच भारताने आता चौथा क्रमांक मिळवला आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ४४,८१० अब्ज रुपये पेक्षा पुढे गेला आहे. 

मात्र, आर्थिक सर्वेक्षणात देशावरील एकूण विदेशी कर्जाचाही उल्लेख करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२१ च्या अखेरीस, देशावर एकूण ५९३.१ अब्ज डॉलर (सुमारे ४४,२९५ अब्ज रुपये) परकीय कर्ज होते. जे ३० जून २०२१ च्या तुलनेत ३.९% जास्त आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.