शपथविधी का थटलाय… तर पर्याय फक्त दोनच आहेत आणि ते पण अवघड..

एकनाथ शिंदेंच्या बंडाचा हेतू आता स्पष्ट होऊ लागला आहे. सुरवातीला काँग्रेस राष्ट्रवादीशी युती नको, हिंदुत्वाच्या मुद्याला जागा अशी सुरवात झाली. मग आता फायनली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिल्याचं समोर येत आहे.

४०-४५ आमदार घेऊन गुवाहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी थेट आता शिवसेनेवर दावा सांगितला आहे.

एवढंच नाही तर आधी बाळासाहेबांच्या विचार हाच आमचे आहे म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांनी थेट आता बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा पक्षच आमचा असल्याचं म्हटलं आहे. तसं तर जेवढ्या आमदारांचं संख्याबळ आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर पक्षांतर बंदी अंतर्गत कारवाई करण्यात येणं तसं अवघड आहे. त्यामुळे ते सरळ शिवसेनेतून बाहेर पडू शकतात आणि भाजपबरोबर बहुमताचं आरामात सरकार स्थापन करू शकतात.

मात्र तरीही आमदार झाडी काय? डोंगर काय? हाटेल काय? सगळं ओके म्हणत आमदार अजून गुवाहाटीमध्येच आहेत.

तर मुद्दा असा आहे की पक्षांतर बंदी अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी जी मॅजिक फिगर लागते ती शिंदे गटाकडे आहे. पक्षांतर्गत बंदी टाळण्यासाठी पक्षाच्या सभागृहातील एकूण संख्येच्या २/३ सदस्य पक्ष सोडणाऱ्या किंवा वेगळी भूमिका असणाऱ्या आमदारांकडे असावे लागतात. शिवसेनेच्या बाबतीत तो आकडा ३७ असावा लागतो आणि शिंदे गटाकडे यापेक्षा जास्त आमदार आहेत. 

मात्र प्रश्न आहे इथून पुढं काय?

नुसती पक्षांतराबंदीची मॅजिक फिगर गाठून आमदारांना त्यांच्यावरील कारवाई टाळता येणार नाहीये. त्यानंतर ते कोणत्या पक्षात त्यांचा गट सामील करत आहे हे ही त्यांना पाहावं लागेल. 

द स्क्रोल वेबसाइटला पीडीटी आचार्य जे लोकसभेचे माजी महासचिव आहेत त्यांनी सांगितलेला एक पॉईंट इथं लक्षात घेणार आहे. त्यांच्यानुसार बंडखोर सेना आमदारांना आता भाजपबरोबर सरकार स्थापन करायचं असेल तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेलच.

याला या बंडखोरांनी त्यांचा मूळ पक्ष शिवसेना भाजपमध्ये विलीन केला असं मानलं जाईल. दोन तृतीयांश आमदार विलीनीकरणास सहमत आहेत. यामुळं हे विलानीकरण मान्य करावं लागेल.

हे 37 पेक्षा जास्त सदस्य असूनही आपला वेगळा गट म्हणून काम करू शकत नाहीत. त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल. 

म्हणजे भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात कोणत्यातरी पक्षात बंडखोर आमदारांना प्रवेश करावाच लागेल. त्यामुळं मग दुसरा ऑप्शन आहे बंडखोर आमदारांबरोबरच असलेल्या बच्चू कडू यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा. 

म्हणूच मग शिवसेनकडूनही या आमदारांना बंडात सामील असलेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत सामील होण्याचा सल्ला दिला जातो आहे. 

असंही बच्चू कडू मुख्यमंत्री आमचाच होईल असं म्हणाले आहेत. आणि असं काही झालंच तर जवळपास ५० आमदारांसकट बच्चू कडूंचा पक्ष महाराष्ट्रतला तिसरा मोठा पक्ष ठरू शकतोय. 

त्यामुळं मग भाजपात जायचं नसेल आणि बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालत आहोत हे जर प्रुव्ह करायचं असेल तर गुवाहाटीत असणाऱ्या आमदारांना त्यांच्यावरील बंडखोर हा शिक्का पुसावा लागेल. म्हणजे आम्हीच पक्षाचे अधिकृत सदस्य आहोत हे त्यांना दाखवून द्यावा लागेल.

नुसतं आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत असं म्हणून चालणार नाही. म्हणून गटनेता ते प्रतोद देउन एकनाथ शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा करणं चालू आहे.

तर मग शिवसेना आमदार सरळ भाजपात प्रवेश करून प्रश्न का मिटवत नाहीत.

असंही महासत्ता आणि नॅशनल पक्ष आमच्यासोबत असल्याचा दावा करून एकनाथ शिंदे यांनी आम्हाला भाजपचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

पहिला तर एकनाथ शिंदेंना यांना शिवसेनेच्या नेतृत्वाशी देखील पंगा घेतलेला आहे. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारून ५० आमदार त्यांच्या मागे आले आहेत. या जोरावर आतापर्यंत धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे  यांचा वारसा सांगून शिवसेना काबीज करण्याची  संधी चालून आली आहे. त्यामुळं ते पक्षाच्या दावा चालूच ठेवत आहेत.

दुसरं म्हणजे जर शिवसेना पक्षावरचा त्यांचा दावा सिद्ध झाला तर भाजपशी युती करताना ते इक्वल पार्टनर म्हणून युती करू शकतील.त्यांच्यावर बंडखोर हा शिक्का देखील राहणार नाही. त्यामुळं एवढं होऊनही जनमत त्यांच्या विरोधात जाणार नाही.  

महत्वाचं म्हणजे आमदारांना भाजपात घेऊन जाऊन सत्तेत बसणं तितकंसं सोपं नाही.

 एकदा का भाजपचं सदस्य झालं तर त्यांना भाजपचं नेतृत्व मान्य करावं लागेल. शिंदे गटाने एकदा का भाजपात प्रवेश केला तर त्यांची बारगीनिंग पॉवर देखील उरणार नाही. 

भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षात प्रवेश करणाऱ्या आमदारांचा पुनर्वसन कसं करणार हा देखील प्रश्न आहे? पुढच्या निवडणुकीत या सर्व आमदारांना भाजप पुढच्या निवडणुकीत तिकीट देईलच असं नाही. 

मात्र जर शिवसेना पक्ष म्हणून हा गट भाजपबरोबर गेले तर आपली युती आहे या न्यायाने ते भाजपाला आमदारांसाठी जागा सोडणं भाग पाडू शकतात. त्यामुळं सध्यातरी आपण आपल्या ताकदीच्या जीवावर शिवसेना नेतृत्वाला भाजपशी युती करायला लावू किंवा पक्षाचं हायजॅक करू या दोनच उद्दिष्टांसाठी शिंदे गट प्रयत्न करत असताना दिसत आहे.

मात्र यात जर त्यांना यश आलं नाही तर भाजपात किंवा प्रहारमध्ये प्रवेश करणं किंवा मातोश्रीची माफी मागून शिवसेनेत परतणं हेच ऑप्शन आमदारांकडे आहेत. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.