राजस्थानमध्ये चर्चा सुरु आहे की प्लेग पासून कोरोना पर्यंतचे आजार जैनांनी आणलेत

मागच्या २ ते ३ दिवसांपासून ट्विटरवर काही ट्रेंड सातत्यानं चर्चेत येत आहेत, आणि परत शांत होतं आहेत. यात बघायचं झाल्यास #ArrestMuknaram #BanAnoopMandal हे दोन ट्रेंड वारंवार दिसून येतात. महाराष्ट्रासह देशभरातील जैन आणि व्यापारी समाजाने या हॅशटॅगमधून अनुप मंडळावर बंदी घालण्याची मागणी करत, सध्या हे ट्रेंड चर्चेत आणले आहेत.

पण हे नेमकं का? यामागची कारण काय आहेत? हे अनुप मंडळ आहे तरी काय? ती कोणती व्यक्ती आहे कि एखादी संघटना? आणि असली तरी असं नेमकं त्यांनी काय केलं आहे ज्यामुळे बंदी घालण्याच्या मागणीने जोर धरला आहे? यात अगदी पंतप्रधानांना पत्र पाठवली जात आहेत.

ट्विटरवर नेमका वाद काय सुरु आहे?

साधारण १९०९ च्या आसपास अनुपदास या नावाच्या एका साधूंनी एक पुस्तक लिहिलं. नाव होतं “जगतहितकारिणी”. या पुस्तकात अशा अनेक गोष्टी लिहिल्या होत्या ज्या कि, जैन आणि वैश्य समाजच्या विरोधात आहेत.

याच पुस्तकाला मानणाऱ्या लोकांनी आता अनुप मंडळ नावानं एक संघटना सुरु केली आहे, आणि आश्रम देखील सुरु केला आहे. या सोबतच राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जैन आणि इतर व्यापार करणाऱ्या समाजाच्या विरोधात प्रचार सुरु केला आहे.

याच पुस्तकाच्या आणि या मंडळाच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार जगात जे काही चुकीचं सुरु आहे, त्या सगळ्या घडामोडींच्या मागे जैन आणि इतर व्यापार करणारा समाज कारणीभूत आहे. यात अगदी भूकंपापासून ते वादळापर्यंत आणि प्लेग पासून ते कोरोना पर्यंत, सगळ्या गोष्टींसाठी जैन साधूचं कारणीभूत आहेत.

जगाच्या एका कोणत्या तरी कोपऱ्यात जैन लोकांची एक राक्षसी दुनिया अस्तित्वात आहे, आणि तिथून ते महामारी जगाला देत असतात. इतकंच नाही तर समुद्राचे पाणी देखील त्यांच्यामुळेच खारट आहे असं देखील मंडळातील लोक म्हणतात.

अनुप मंडळाच जास्त अस्तित्व कुठे आहे?

माध्यमांतील काही बातम्यांनुसार,

राजस्थानमध्ये मारवाड नावाचा एक भाग आहे. याच मारवाड भागातील सिरोही, सुमेरपुर, तख्तगड आणि गोडवाड या भागांमध्ये अनुप मंडळ आणि त्यांचे सदस्य मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. मात्र त्यांची नेमकी संख्या किती आहे या बद्दल मात्र नेमकी माहिती उपलब्ध नाही. जास्तीत जास्त सदस्य आपली ओळख लपवूनच राहत असतात.

सोबतच हा आदिवासी भाग असल्यामुळे इथं अनुप मंडळाच्या सदस्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तवली जाते.

इथंच जैन समाजाची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे.

याच भागातील जैन समाजाचे काही लोक आरोप लावतात कि, अनुप मंडळाचे सदस्य कायमच जैन संत आणि समाजातील लोकांना टार्गेट करतात. इतकंच नाही तर जैन समाजातील काही संतांच्या हत्या केल्या असल्याचे आरोप देखील अनुप मंडळावर लावले जातात.

या सगळ्यावर वादावर अनुप मंडलचं म्हणणं काय आहे?

अनुप मंडळातील सदस्य माध्यमांशी बोलताना केवळ एकचं गोष्ट सातत्यानं सांगतात ते म्हणजे “प्रत्येकानं ‘जगतहितकारिणी’ पुस्तक वाचावं, त्याच आकलन करावं, त्यातील पुरावे बघावे आणि मगचं आमच्याशी चर्चा करण्यासाठी यावं. तो पर्यंत आम्ही कोणत्याही माध्यमांसमोर कसलीही बाजू मांडणार नाही.

ते सांगतात,

आम्ही कोणत्याही आधाराशिवाय कोणत्या समाजाला नावं का ठेवू? प्रत्येक सत्य गोष्ट पुस्तकात लिहिली आहे. आमच्या वेबसाईटवर हे पुस्तक फ्री मध्ये उपलब्ध आहे.

जैन धर्माचं म्हणणं काय?

या संपूर्ण प्रकारणानंतर जैन समाज मात्र चांगलाच दुखावला गेला आहे. त्यांनी या समाजविघातक आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेवर बंदी घालावी आणि कारवाई यासाठी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून गृहमंत्री अमित शहा, ते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या पर्यंत सगळ्यांना पत्र लिहिली आहेत.

राजस्थानमधील बाडमेरचे काँग्रेस आमदार मेवाराम जैन यांनी देखील राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून अनुप मंडळावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, अनुप मंडळ नावाचे संघटन जैन समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहचवत आहे. 

mevaram jain 010621 124252

या सगळ्या वादावर प्रशासनाचं म्हणणं काय?

या सगळ्या मुद्द्यांवरून राजस्थान प्रशासनानं देखील माध्यमांमध्ये आपली बाजू मांडली आहे. सिरोही जिल्हयाच्या शिवगंजचे प्रांताधिकारी भागीरथ राम म्हणतात, 

मी इथं मागच्या जवळपास सव्वा दोन वर्षांपासून कार्यरत आहे. पण या काळात केवळ एकचं वेळा अनुप मंडळाचे सदस्य मला भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे ते किंवा हि संघटना मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे असं म्हणता येणार नाही. मात्र तेव्हा देखील आम्ही या लोकांना बसवून घेत समजावून सांगितलं होतं. त्यांचं कौन्सलिंग केलं होतं.

आता मागच्या दिड वर्षांपासून भारतात कोरोना सुरु आहे, पण अद्याप पर्यंत आम्ही या लोकांचं किंवा त्यांच्या संघटनेचं ‘एक ही आंदोलन किंवा त्यांचं धरना’ वगैरे अशा गोष्टी बघितलेल्या नाहीत. फक्त काही दिवसांपासून या लोकांची सोशल मीडियावर सक्रियता वाढली आहे.

मात्र आज काही जैन समाजातील लोक मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्रक घेऊन आले होते, ज्यात त्यांनी या मंडळावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हे पत्रक सध्या आम्ही पुढे पाठवलं आहे. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, ती म्हणजे जर कोणताही समाज भारतीय समाजात द्वेष किंवा टेढ निर्माण करत असेल तर प्रशासन त्यावर नक्कीच कारवाई करेल.

आणखी एक गोष्ट देखील ते सांगतात, ती जास्त महत्वाची आणि या प्रकरणावर पडदा टाकणारी आहे. ते म्हणतात लोक आता स्वतः समजूतदार झाले आहेत. त्यांना कळत कि अनेक गोष्टी या विश्वास ठेवण्याच्या किंवा विचार करण्याच्या देखील पात्रतेमध्ये येत नाहीत. शिकली-सवरलेली जनता अशा कोणत्याही गोष्टी मानत नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.