अहिंसेचा पुरस्कार करणारा, शांतताप्रिय जैन समाज देशभर आंदोलन का करतोय ?
दिल्लीचं इंडिया गेट, भारताची ओळख असणारं ठिकाण. तिथनं साधारण ३ किलोमीटरवर असलेल्या प्रगती मैदानावर मोठ्या प्रमाणात जैन बांधव एकत्र जमले आणि त्यांनी थेट इंडिया गेटवरच मोर्चा काढला. या मोर्चात सामील झालेल्यांच्या हातात पोस्टर, झेंडे होते. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढत आंदोलकांनी आपला जोर कायम ठेवला होता. हे झालं देशाची राजधानी दिल्लीचं, पण मुंबईतही चित्र वेगळं नव्हतं. व्हीपी रोड ते ऑगस्ट क्रांती मैदान या मार्गावर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ५० हजारपेक्षा जास्त जैन बांधवांनी मोर्चा काढला.
पण हे मोर्चे आणि आंदोलनं फक्त दिल्ली आणि मुंबईमध्येच नाही, तर झारखंड, सुरत, मध्यप्रदेश, अहमदाबादपासून अगदी कोल्हापुरातही होत आहेत.
शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणारा जैन समाज देशभर आंदोलन करण्याइतका आक्रमक का झालाय ? झारखंड आणि गुजरातमध्ये नेमकं घडलंय तरी काय ?
आंदोलनाची पहिली ठिणगी पडली ती झारखंड सरकारच्या निर्णयामुळं. झारखंडमध्ये १२ हजार ५०० एकरांवर पसरलेले पारसनाथ पर्वत आहेत आणि त्यामध्येच वसलंय जैन समाजाचं पवित्र तीर्थस्थळ ‘श्री सम्मेद शिखरजी.’
झारखंड सरकारनं २०२२ मध्ये राज्याचं पर्यटन धोरण जाहीर केलं, त्यानुसार पारसनाथ पर्वतांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच निर्णयाच्या विरोधात जैन बांधव आक्रमक झाले. पण हा निर्णय काही आत्ताच जाहीर झालेला नाही.
आधी या निर्णयाची टाईमलाईन बघुयात…
फेब्रुवारी २०१९ मध्ये भाजपच्या नेतृत्वातल्या झारखंड राज्य सरकारनं पारसनाथ पर्वतानांच आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनवण्याची योजना आखली, त्याचवर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारकडंही परवानगी मागण्यात आली. डिसेंबर २०१९ मध्ये झारखंडमध्ये सरकार बदललं. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं लॉकडाऊनच्या काळात झालेलं पर्यटन क्षेत्राचं नुकसान भरुन काढण्यासाठी जुलै २०२२ मध्ये नवं पर्यटन धोरण आखलं.
यात सम्मेद शिखर, मधुबन आणि इटखोरी इथं धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर डिसेंबरमध्ये केंद्र सरकारनं पारसनाथ पर्वतांना इको सेन्सेटिव्ह झोन घोषित करत इको-टुरिझमचीही परवानगी दिली. त्यानंतर फक्त झारखंडमध्येच नाही तर सगळ्या देशभरात जैन बांधव आक्रमक झाले.
शांतता आणि अहिंसेचा पुरस्कार करणारा जैन समाज आक्रमक होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे श्री सम्मेद शिखरजीचं धार्मिक महत्त्व. असं सांगतात की, जैन वाङमयानुसार जगाच्या निर्मितीनंतर सगळ्यात आधी दोन ठिकाणं अस्तित्वात आली पहिलं श्री सम्मेद शिखरजी आणि दुसरी अयोध्या.
इतकंच नाही, तर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर रिषभदेव यांच्यानंतर दुसरे तीर्थंकर अजितनाथजी यांनी श्री सम्मेद शिखरजी इथंच दिव्य ज्ञान प्राप्तीसाठी तपस्या केली आणि याच सम्मेद शिखरजीवर त्यांना मोक्ष प्राप्ती झाली.
जैन धर्मात एकूण २४ तीर्थंकर आहेत, त्यातल्या पहिले तीर्थंकर ऋषभदेव, १२ वे तीर्थंकर वासुपूज्य जी, २२ वे तीर्थंकर अरिष्ठनेमीजी आणि २४ वे तीर्थंकर वर्धमान महावीर या चार तीर्थंकरांचा अपवाद वगळला तर २० तीर्थंकरांना सम्मेद शिखरजीवरच मोक्ष मिळाला, असं सांगण्यात येतं.
पारसनाथ पर्वतांमध्ये डझनभरापेक्षा जास्त जैन मंदिरं आहेत, ज्यातली काही मंदिरं २ हजार वर्षांपेक्षा जुनी असल्याचंही सांगण्यात येतं. या मंदिरांचं, तीर्थंकरांमुळं पवित्र झालेल्या शिखराचं दर्शन घ्यायला लाखो भाविक श्री सम्मेद शिखरजीला भेट देतात आणि २७ किलोमीटर लांब प्रदक्षिणाही घालतात.
श्री सम्मेद शिखरजीची यात्रा केल्यामुळं पुढचे ४९ जन्म माणूस सांसारिक कर्मबंधनाच्या फेऱ्यातून मुक्त राहतो अशीही मान्यता आहे.
या सगळ्यामुळेच जैन समाजाचा श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटन स्थळ घोषित करण्याला विरोध आहे. त्यांची अशी मागणी आहे की, इतर धार्मिक स्थळांप्रमाणं श्री सम्मेद शिखरजी हे सुद्धा तीर्थस्थळ म्हणून घोषित करण्यात यावं. कारण पर्यटन स्थळ घोषित झाल्यामुळं इथं लॉज, तारांकित हॉटेल्स उभी राहतील आणि साहजिकच मद्यपान, मांसाहार व्यभिचार यांसारख्या गोष्टी व्हायला सुरुवात होईल आणि या सगळ्यामुळं या तीर्थस्थानाचं पावित्र्य भंग होईल, असा जैन समाजाचा दावा आहे.
त्यामुळं धार्मिक पर्यटनस्थळाऐवजी श्री सम्मेद शिखरजी आणि पारसनाथ पर्वतांना तीर्थस्थळ म्हणूनच घोषित करण्यात यावं अशी जैन समाजाची मागणी आहे आणि याच मागणीला घेऊन जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतलीये.
पण वाद फक्त श्री सम्मेद शिखराचाच नाहीये, तर गुजरातमधल्या पालिताना मंदिराचाही आहे. इथल्या शत्रुंजय टेकडीवर हिंदू आणि जैन समाजाची मंदिरं आहेत, मात्र इथल्या जैन मंदिराची तोडफोड झाल्याचा, या टेकडीवर अवैध उत्खनन सुरु असल्याचा आणि गुजरातमध्ये दारुबंदी असतानाही इथं दारु विकली जात असल्याचा आरोपही जैन समाजाकडून करण्यात येतोय.
म्हणूनच श्री सम्मेद शिखरजी आणि पालिताना इथल्या तीर्थक्षेत्रांचं संरक्षण करण्यात यावं अशी मागणी देशभर आंदोलन करणारा जैन समाज करतोय.
हे आंदोलन नेमकं कुठं कुठं सुरु आहे ?
तर मुंबई आणि दिल्लीत जैन बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत मोर्चे काढले. कोल्हापूरमध्ये ३ जानेवारीला मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. तर मध्यप्रदेशमध्ये ३० पेक्षा जास्त लोकांनी मुंडनही केलं. त्यातच झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात २५ डिसेंबरपासून जयपूरमध्ये आमरण उपोषण करणारे जैनमुनी सुज्ञेयसागरजी महाराज यांचं ३ जानेवारीला निधन झालं. श्री सम्मेद शिखरजी वाचवण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, या भावनेतून त्यांच्यावर जयपूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले.
पण एवढा विरोध होत असताना, झारखंड सरकारनं काय भूमिका घेतलीये ?
तर माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. राज्य सरकार आणि जैन समाजच्या प्रतिनिधींमध्ये या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चाही होत आहेत. तर जैन समाजाच्या प्रतिनिधींनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही निवेदन दिलंय.
या सगळ्या प्रकरणांमध्ये दिगंबर जैन आणि श्वेतांबर जैन हे जैन धर्माचे दोन्ही संप्रदाय एकत्र आलेत, जैन धर्मियांच्या विविध संघटनांसोबतच विश्व हिंदू परिषदेसारखी संघटना आणि एमआयएम या राजकीय पक्षानंही जैन बांधवांना पाठिंबा जाहीर केला आहे.
थोडक्यात आपल्या दोन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या रक्षणासाठी शांतताप्रिय आणि अहिंसक असणारा जैन समाज आक्रमक झालाय.
या सगळ्या आंदोलनांबद्दल प्रतिक्रिया देताना जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘माझ्या घराची तोडफोड केली, घरात चोर शिरले आणि बहीण-मुलींच्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न झाला तरी शांत राहायचं का? कुणी माझ्या घरात घुसलं आणि समजवून सांगितल्यानंतरही तो जात नसेल तर हाती दंडुका घ्यावा लागतो. आक्रमण झाल्यावर प्रतिकार करावा लागतो. याला गुन्हा म्हणता येत नाही.’
त्यामुळं जैन समाजाचं हे आंदोलन नेमकं कुठल्या मार्गावर जाणार ? यावर तोडगा निघणार का ? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असेल.
हे ही वाच भिडू:
- जसं हिंदूंसाठी काशीचं महत्व तसंच जैन धर्मीयांसाठी श्री सम्मेद शिखरजी महत्वाचं आहे
- जाणून घ्या जैनांचं “मिच्छामी दुक्कडं” म्हणजे काय ?
- ९ टनाची पार्श्वनाथाची मूर्ती अधांतरी तरंगण्यामागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही.