जय शहांनी तिरंगा हातात घेतला नाही, पाकिस्तानी आर्मी चीफच्या पोराच्या शेजारी बसले, कारण….

हार्दिक पंड्यानं जबरदस्त छकडा मारला आणि भारतानं यंदाच्या आशिया कपमध्ये पाकिस्तानवर ५ विकेट्सनं मात केली. आधी भारत पाकिस्तान मॅच म्हणलं की मैदानात किंवा मैदानाबाहेर फिक्स राडे व्हायचे. आता मात्र चित्र बदललंय. मैदानातलं वातावरण अगदी खेळकर असतं, प्लेअर्स एकमेकांच्या गळ्यात हात टाकून निवांत असतात. खरंतर याआधी सुद्धा दोन्ही देशातल्या खेळाडूंमध्ये असंच वातावरण असायचं, पण मैदानाबाहेर.

म्हणून तर गावसकरनं इंझमाम उल हकला बॅटिंगबद्दल एक सल्ला दिला होता आणि माकडउड्या मारणाऱ्या जावेद मियांदादनं किरण मोरेला घरीही जेवायला बोलावलं होतं.

२०२१ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दुबईच्या याच मैदानावर भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यावेळी भारतानं व्याजासकट परतफेड केली. देशात सगळीकडे कल्ला सुरू झाला, दिवाळी लय लांब असली तरी फटाके फुटले, गणपती काही दिवसावर आला असला, तरी मिरवणुका निघाल्या. लय दिवसांनी भारतीयांनी क्रिकेटमधला विजय साजरा केला.

मॅच झाल्यावर मात्र एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलं.

मॅच बघायला अनेक सेलिब्रेटी आले होते. रिषभ पंतसोबत इंस्टाग्रामवर झालेल्या राड्यामुळं चर्चेत आलेली उर्वशी रौतेला होती, लायगर पिक्चरचा हिरो विजय देवराकोंडा होता, भारतीय आणि पाकिस्तानी चाहते होते आणि एशियन क्रिकेट कौन्सिल आणि बीसीसीआयचे पदाधिकारीही.

रविवारच्या मॅचनंतर जितकी चर्चा हार्दिक पंड्याच्या खेळाची झाली, तितकीच बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांच्या एका व्हिडिओचीही.

मॅच संपल्यानंतर सगळं स्टेडियम जल्लोष करत होतं आणि तेवढ्यात कॅमेरा गेला जय शहा यांच्याकडे. त्यांना कुणीतरी तिरंगा देत होतं मात्र त्यांनी तिरंगा हातात घ्यायला नकार दिला, हे टीव्हीवर दिसलं आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करत शहा यांच्यावर टीका केली.

सोबतच जय शहा आणि पाकिस्तानच्या आर्मी चीफचा मुलगा एकत्र बसले आहेत असा फोटोही व्हायरल झाला. या दोन्ही गोष्टींमुळं जय शहा सोशल मीडियावर टीकेचे धनी ठरले.

मात्र त्यांच्या बाजूनं बोलणाऱ्या लोकांनी मात्र, जय शहा हे एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष असल्यानं प्रोटोकॉल फॉलो करत होते आणि त्यामुळं त्यांनी भारताला जाहीरपणे पाठिंबा दिला नाही.

त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे ते पाहुयात…

जय शहा हे २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सेकेटरी झाले. सोबतच २०२१ मध्ये ते एशियन क्रिकेट कौन्सिलचेही अध्यक्ष झाले. आता जसं बीसीसीआय भारतातल्या क्रिकेटचा कारभार बघतं, अगदी त्याचप्रमाणे एशियन क्रिकेट कौन्सिल आशियातल्या क्रिकेटसाठी जबाबदार असतं. पण त्यांचं मुख्य काम हे आशिया कपचं आयोजन करणं, क्रिकेटच्या माध्यमातून देशांमधले संबंध दृढ करणं आणि आशियामध्ये क्रिकेटचा प्रसार करणं हे आहे.

२०२१ मध्ये जय शहा एसीसीचे अध्यक्ष झाले, त्यानंतर मार्च २०२२ मध्ये झालेल्या एसीसीच्या बैठकीत २०२४ पर्यंत जय शहाच अध्यक्ष असतील असा निर्णय घेण्यात आला. 

आता आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे जय शहा हे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजेच आयसीसीच्याही बॉडीवर आहेत. आयसीसी म्हणजे एकदम मोठा विषय, त्यामुळं तिथले नियम पाळणं कुणासाठीही गरजेचंच असतं, मग ते खेळाडू असो, एखादा देश असो किंवा पदाधिकारी.

कुणी कसं वागायचं, कुठल्या नियमांचं पालन करायचं याचेही नियम बनवलेले असतात.

आयसीसीनं २०१० मध्ये ‘आयसीसी कोड ऑफ एथिक्स’ची नियमावली बनवली होती, ज्याच्यात २०१७ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. त्यातला दुसरा नियम आहे कॉन्फ्लिट ऑफ इंटरेस्टवर. त्यानुसार आयसीसीमध्ये पद भूषवत असताना क्रिकेटवर परिणाम करु शकेल अशा कुठल्या खाजगी संस्थेच्या पदावर राहता येत नाही.

याच नियमावलीतला पॉईंट 2.2.2.2 असं सांगतो की,

संचालक, समिती सदस्य किंवा कर्मचाऱ्यानं कोणत्याही एका स्टेकहोल्डरचा प्रसार करु नये. यात खेळावर थेट परिणाम होतील असे नॅशनल क्रिकेट फेडरेशन, क्रिकेट फेडरेशन्सचा गट, सरकारी किंवा राजकीय संस्था यांचा समावेश होतो. सदस्यानं आयसीसीच्या हितासाठी काम केलं पाहिजे.

याच नियमाचा आधार घेऊन जय शहा यांचा बचाव केला जातोय. आयसीसीच्या नियमांनुसार जय शहा हे आयसीसीसोबतच बीसीसीआय आणि एसीसीच्या पदांवर राहू शकतात, मात्र क्रिकेटच्या प्रसारासाठी. ते यातून या संस्थांचा प्रसार करु शकत नाहीत. त्यामुळेच जय शहा यांनी आयसीसी सदस्य आणि एसीसीचे अध्यक्ष या नात्यानं भारताचा तिरंगा हातात घेण्यास नकार दिल्याचं बोललं जातंय, मात्र यावर त्यांच्याकडून स्पष्टीकरण आलेलं नाही.

जाता जाता विषय साद बाजवा, या पाकिस्तानच्या आर्मी जनरल चीफच्या मुलासोबत जय शहा बसले याचा. 

तर यामागचं कारण होतं, की जय शहा हे आयसीसी सदस्य असल्यानं व्हीआयपी बॉक्समध्ये बसलेले आणि त्यावेळी तिथं बाजवा आल्यानं ते एकमेकांजवळ बसले. मात्र बाजवा पाकिस्तानी क्रिकेट बोर्डात किंवा एसीसीमध्ये कुठल्या पदावर नसल्यानं वेगळ्या वादालाही तोंड फुटू शकतं.

त्यामुळं नेमकं कारण काय हे जय शहा यांचं स्पष्टीकरण आल्यानंतरच कळेल हे मात्र नक्की. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.