हिट ठरलेला कांतारा वादात का अडकलाय ?

वर्ल्डवाईड कलेक्शन २०० कोटींच्या पलीकडे, केजीएफ-२ चं रेकॉर्ड मोडत कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त पाहिला गेलेला पिक्चर, हिंदीतल्या बिग बजेट पिक्चरला मागं टाकत २६ कोटींपेक्षा जास्त बिझनेस आणि रिलीझ होऊन महिना होत आला तरी सुरु असलेलं प्रचंड कौतुक, अर्थात आपण बोलतोय कांताराबद्दल.

नावाप्रमाणंच गूढ असलेलं जंगल, सिक्स पॅक नसूनही रावडी वाटणारा हिरो, खिळवून ठेवणारी खुंखार स्टोरी आणि अंगावर काटा आणणारा, न विसरता येणारा क्लायमॅक्स. कांतारामध्ये कौतुक करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पिक्चर हिट ठरला, चर्चा झाली आणि साहजिकच वादही.

क्रिटिक्सपासून पार रजनीकांतपर्यंत प्रत्येकाला आवडलेला कांतारा वादाच्या भोवऱ्यात का सापडलाय, नेमका मॅटर काय आहे ?

कांताराची स्टोरी जंगलाभोवती फिरते पण ती सुरु होते भूत कोला या नृत्यप्रकारापासून आणि संपतेही याच नृत्यप्रकारावर. पिक्चर बघून थिएटरच्या बाहेर येताना आपल्या लक्षात ज्या गोष्टी राहतात, त्यात भूत कोला टॉपला असतंय.

पण आता भूत कोला ही हिंदू परंपरा आहे की नाही ? यावरुन वादाची ठिणगी उडाली आहे.

हे भूत कोला काय आहे ? तर रंगवलेला चेहरा, त्यावर आभूषणं, डोक्यावर मुकुट, झाडाच्या पानांचा आणि गवताचा वापर करुन बनवलेला पारंपारिक वेष या रूपात नृत्य सादर करत देवाची आराधना केली जाते. आपल्याकडं अंगात वारं येतं त्याच्याशी काहीसं साधर्म्य असणारी ही परंपरा आहे. तुळू भाषेत यातल्या भूत शब्दाचा अर्थ शक्ती असा आहे, तर कोला म्हणजे सादर करणं. 

या भूत कोलामध्ये पंजुर्लीची आराधना केली जाते. पंजुर्ली दैव म्हणजे रानडुक्कर. रानडुक्करांनी शेतीचं नुकसान करु नये आणि जीविताला कोणताही धक्का पोहोचवू नये यासाठी लोक त्यांची पूजा करतात. भूत कोलामध्ये शक्ती आणि पूर्वज यांची आराधना केली जाते. 

भूत कोला करणारी लोकं देवाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देतात अशी श्रद्धाही लोकांमध्ये आहे. कर्नाटकचा किनारी भाग, तुळूनाडू, उडुपी आणि केरळच्या काही भागांमध्ये भूत कोला सादर केलं जातं.

मग यावरुन वाद का होतोय ? 

तर एका मुलाखतीत बोलताना कांताराचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीनं पंजुर्ली ही हिंदू देवता असल्याचं आणि हिंदू धर्माच्या परंपरेचा भाग असल्याचं सांगितलं. सोबतच जेव्हा पिक्चरमध्ये भूत कोला सादर केलं जातं, तेव्हा वराहरुपम हे गाणंही वाजतं. 

हिंदू धर्मात वराहाला विष्णूचा अवतार म्हणून पुजण्यात येतं. यावरुनही अनेकांनी भूत कोला ही हिंदू परंपरा असल्याचं सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आणि यावरुनच वातावरण तापलं.

कन्नड अभिनेता चेतन कुमार अहीमसानं ट्विट करत दावा केला की,

 ‘भूत कोला ही हिंदू परंपरा असल्याचा रिषभ शेट्टीचा दावा चुकीचा आहे. वैदिक-ब्राह्मणी हिंदुत्वाच्या आधीपासूनच या बहुजन परंपरा सुरु आहेत. आमची हीच मागणी आहे की, ऑन स्क्रीन असो किंवा ऑफ स्क्रीन मूलनिवासी लोकांच्या परंपरा पूर्ण सत्यतेनं दाखवण्यात याव्यात.’ 

त्याच्या या ट्विटनंतर मात्र किस्सा झाला. कारण बँगलोर पोलिसांनी द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली चेतन कुमारवर गुन्हा दाखल केला, कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री सी सुनील कुमार यांनी चेतनवर टीका केली. तर हिंदू जनजागृती समिती आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. 

या सगळ्यात काही दलित संघटना आणि म्हैसुरचे माजी महापौर पुरुषोत्तमा यांनी चेतनला पाठिंबा दिला.

काही तुळू अभ्यासकांनी माध्यमांना माहिती देताना, भूत कोला ही हिंदू परंपरा नसून तुळूनाडूमध्ये हिंदू धर्म येण्याआधीपासून ही कला सादर केली जाते असा दावा केला आहे. त्यामुळं हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत. साहजिकच रिषभ शेट्टी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून यावर काय भूमिका घेतो हे महत्त्वाचं ठरेल.

पण कांतारा फक्त या एकाच वादात सापडलंय का ? तर नाही.

सिनेमात वराहरुपम नावाचं एक गाणं आहे. ज्यात संस्कृत शब्द आहेत, पारंपारिक वाद्यांचा नाद आहे आणि अंगावर शहारा आणणारा थरारही. पण या गाण्याची चाल चोरल्याचा दावा थायकुडम ब्रिज या केरळच्या लोकप्रिय म्युझिक बँडनं केला आहे. जेव्हा वराहरुपम हे गाणं आलं तेव्हाच थायकुडमच्या ‘नवरसम’ मधून याची चाल चोरल्याची चर्चा सुरु झाली.

त्यानंतर पिक्चरचा संगीतकार अजनीश लोकनाथ यानं आपण नवरसमपासून इन्स्पायर झाल्याचं सांगितलं आणि क्लासिकल नोट्सचा वापर केल्यानं दोन्हीमध्ये साम्य असल्याचा दावा केला. 

मात्र थायकुडम बँडनं आपल्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट टाकली, ज्यात ते म्हणतात 

‘थायकुडम बँडचा कोणत्याही स्वरूपात कांतारा पिक्चरशी संबंध नाही. नवरसम आणि वराहरूपममधली समानता ही कॉपीराईट कायद्याचं थेट उल्लंघन आहे. आमच्या दृष्टीनं इन्स्पायर होणं आणि कॉपी करणं यात मोठा फरक असतो. 

चाल आणि संगीतावरच्या आमच्या हक्कांची कुठेच दखल घेतलेली नाही आणि हे सगळं स्वतःचं काम असल्याचा प्रचार केला जातोय. त्यामुळं आम्ही यासाठी जबाबदार असणाऱ्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवून कारवाई करणार आहोत.’ 

आता या आरोपांना कांताराची टीम काय उत्तर देणार आणि याचा व्हायरल होत असलेल्या वराहरुपम या गाण्यावर नेमका काय परिणाम होणार हे पाहावं लागेल. 

केजीएफच्या दोन्ही पार्टनंतर कांतारानं कन्नडा सिनेमाला पुन्हा एकदा मार्केट मिळवून दिलं. हिंदीमध्ये रिलीझ होण्याआधीच हा सिनेमा भारतभरात कन्नडामध्ये पाहिला गेला. इतकी प्रचंड क्रेझ आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन होऊनही कांताराबद्दल फक्त वादांमुळे चर्चा होतीये.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.