‘वन नेशन, वन युनिफॉर्म’वरुन आठवलं, या २ राज्यांच्या पोलिसांचे युनिफॉर्म वेगळे का असतात…

हरियाणामध्ये सध्या देशातल्या सगळ्या राज्यांच्या गृहमंत्र्यांचं चिंतन शिबीर सुरु आहे, या चिंतन शिबिरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक सल्ला दिला.

तो म्हणजे, ‘सगळ्या राज्यांच्या पोलिसांसाठी आपण वन नेशन, वन युनिफॉर्म आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा. यासाठी ५ किंवा ५० च काय तर शंभर वर्षही लागू शकतात, पण आपण यावर विचार करायला हवा. आपल्याला ही योजना थोपवायची नाहीये, पण यावर विचार नक्कीच करायचा आहे.’

आता विचार केला, तर देशभरातल्या पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये फारसा फरक नाही. रंग खाकीच असतो, फक्त कधी शेड बदलते, तर कधी टोपी… पण तसा रंग सारखाच. पण सगळ्यात मोठा फरक कुठं जाणवतो तर ? कोलकात्यामध्ये.

इथले पोलीस पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म घालतात, तर पॉंडीचेरीमधल्या पोलिसांची टोपीच वेगळी असते.

पण यामागे नेमकी कारणं काय असतात ? हेच जाणून घेऊ. आधी मुद्दा कोलकाता पोलिसांचा… 

पश्चिम बंगालची राजधानी असणाऱ्या कोलकाता शहरासाठी वेगळी पोलीस यंत्रणा आहे. पश्चिम बंगालमधील पोलीस यंत्रणेची विभागणी ‘राज्य पोलीस’ आणि ‘कोलकाता पोलीस’ अशा दोन गटात करण्यात आलेली आहे.

 कोलकाता पोलीस दलाची स्थापना ब्रिटीशकालीन भारतात १८४५ साली करण्यात आली होती, तर बंगाल पोलिसांची स्थापना १८६१ साली करण्यात आली. बंगाल पोलीस हे राज्य शासनाच्या अखत्यारीत काम करतात तर कोलकाता पोलिस स्वायत्त आहेत.

कोलकाता पोलिसांसाठी इतर राज्यांपेक्षा वेगळा असा पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म असण्याचं एक वैज्ञानिक कारण आहे.

कोलकाता हे किनारपट्टीवरील शहर असल्याने कोलकात्यात वर्षभर मोठ्या प्रमाणात उकाडा असतो. उष्ण आणि दमट स्वरूपाचं वातावरण असतं. अशा वातावरणात काम करताना पोलिसांना त्रास होऊ नये म्हणून त्यांचं उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी पोलिसांच्या युनिफॉर्मचा रंग पांढरा ठेवण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला होता.

पांढरा रंग उष्णतारोधक असल्याने या रंगाच्या ड्रेसमुळे पोलिसांचे उकाड्यापासून संरक्षण होते. बंगाल पोलिसांचा युनिफॉर्म मात्र खाकीच आहे.

आता दुसरा मुद्दा म्हणजे, पॉंडिचेरीच्या पोलिसांची लाल टोपी

पोलीस युनिफॉर्मच्या बाबतीत पॉंडिचेरी पोलिसांनीही आपली एक वेगळी ओळख जपलेली आहे. पॉंडिचेरी पोलिसांचा युनिफॉर्म इतर राज्यातील पोलिसांसारखाच आहे, फक्त त्यांच्या डोक्यावरील टोपीचा रंग लाल असतो.

याचं कारण असं की स्वातंत्र्यापूर्वी पॉंडिचेरी ही फ्रेंचांची वसाहत होती. वसाहतींमध्ये असलेल्या फ्रेंच सैन्यासाठी फ्रेंच सरकार लाल ‘केपी’ज (कॅप) वापरत असत. त्यामुळे पॉंडिचेरी या आपल्या वसाहतीतील पोलिसांसाठी देखील ते केपी वापरत असत. तीच परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात देखील चालत गेली जी आजतागायत पूर्ववत चालू आहे.

पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन नेशन वन युनिफॉर्मची घोषणा केली आहे. ज्यामुळं निश्चितच या दोन्ही पोलिस खात्यांचे युनिफॉर्म बदलणार का ? हा प्रश्न उपस्थित होतोय. पण साहजिकच कोलकात्यात युनिफॉर्म वेगळा असण्याचं वैज्ञानिक कारण बघता त्याबाबत काय निर्णय होणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.