कोलकाता पोलिसांचा ड्रेस पांढरा, तर पुदुच्चेरी पोलिसांची टोपी लाल. विविधतेचं ऐतिहासिक कारण काय ?

भारतातील बहुतेक राज्यातील पोलिसांचा ड्रेस खाकी रंगाचा आहे. खाकी रंगाचा ड्रेस हीच गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय पोलिसांची ओळख राहिलेली आहे. असं असलं तरी कोलकाता पोलीस मात्र याला अपवाद आहेत. कोलकाता पोलीसांचा ड्रेस जर कधी तुमच्या बघण्यात आला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तो पांढऱ्या रंगाचा आहे. नेमकी हीच गोष्ट पुदुच्चेरी पोलिसांच्या टोपीची देखील. पॉडिचेरी पोलिसांची टोपी देखील लाल रंगाची आहे. देशातील इतर राज्यांमध्ये खाकी या एकाच रंगाचा वापर पोलिसांच्या ड्रेससाठी करण्यात आला असताना या दोन ठिकाणच्या पोलिसांचा युनिफॉर्म वेगळा का, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. आम्ही घेऊन आलोय तुमच्या डोक्यातल्या याच प्रश्नाचं उत्तर.

का वापरतात कोलकाता पोलीस पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म…?

पश्चिम बंगालची राजधानी असणाऱ्या कोलकाता शहरासाठी वेगळी पोलीस यंत्रणा आहे. पश्चिम बंगालमधील पोलीस यंत्रणेची विभागणी ‘राज्य पोलीस’ आणि ‘कोलकाता पोलीस’ अशा दोन गटात करण्यात आलेली आहे.  कोलकाता पोलीस दलाची स्थापना ब्रिटीशकालीन भारतात १८४५ साली करण्यात आली होती, तर बंगाल पोलिसांची स्थापना १८६१ साली करण्यात आली. बंगाल पोलीस हे राज्य शासनाच्या अखत्यारीत काम करतात तर कोलकाता पोलिस स्वायत्त आहेत.

कोलकाता पोलीस आणि बंगाल पोलीस

कोलकाता पोलिसांसाठी इतर राज्यांपेक्षा वेगळा असा पांढऱ्या रंगाचा युनिफॉर्म असण्याचं एक वैज्ञानिक कारण आहे. कोलकाता हे किनारपट्टीवरील शहर असल्याने कोलकात्यात वर्षभर मोठ्या प्रमाणात गर्मी असते. उष्ण आणि दमट स्वरूपाचं वातावरण असतं. अशा वातावरणात काम करताना पोलिसांना त्रास होऊ नये म्हणून त्याचं गर्मीपासून संरक्षण करण्यासाठी पोलिसांच्या युनिफॉर्मचा रंग पांढरा ठेवण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला होता. पांढरा रंग उष्णतारोधक असल्याने या रंगाच्या ड्रेसमुळे पोलिसांचे गर्मीपासून संरक्षण होते. बंगाल पोलिसांचा युनिफॉर्म मात्र खाकीच आहे.

पुदुच्चेरी पोलिसांची लाल टोपी

पुदुच्चेरी पोलीस

पोलीस युनिफॉर्मच्या बाबतीत पुदुच्चेरी पोलिसांनी देखील आपली एक वेगळी ओळख जपलेली आहे. पुदुच्चेरी पोलिसांचा युनिफॉर्म इतर राज्यातील पोलिसांसारखाच आहे, फक्त त्यांच्या डोक्यावरील टोपीचा रंग लाल असतो. याचं कारण असं की स्वातंत्र्यापूर्वी पुदुच्चेरी ही फ्रेंचांची वसाहत होती. वसाहतींमध्ये असलेल्या फ्रेंच सैन्यासाठी फ्रेंच सरकारने लाल ‘केपी’ज (कॅप) वापरत असत. त्यामुळे पुद्दुच्चेरी या आपल्या वसाहतीतील पोलिसांसाठी देखील ते केपी वापरत असत. तीच परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात देखील चालत गेली जी आजतागायत पूर्ववत चालू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.