आपला विकेंड भारी करण्यासाठी अनुप जलोटा ऐकणं मस्ट ए भिडू…

अनुप जलोटा म्हणजे तीन-चार लाईनीत काळजात घुसणारा माणूस. हनी सिंग आला आणि गेला, ढिंचॅक पूजाही अध्येमध्ये येते आणि कानांचा बाजार उठवून जाते, अल्ताफ राजाही आता वडाप किंवा बुर्जी-पावच्या गाडीवरच ऐकू येतो, शास्त्रीय संगीत ऐकणारं मंडळ वेगळं आणि इंग्लिश गाण्यांचा क्लब वेगळा.. पण गेली कित्येक वर्ष मंदीरापासून बारपर्यंत ऐकू येणारा आवाज एकाचाच… अनुप जलोटाचा.

नास्तिक पोरगं आणि आस्तिक बाप (किंवा व्हाईस वर्सा) या दोघांचा आवडता कॉमन सिंगर अनुप जलोटा असू शकतोय म्हणजे विचार करा माणूस किती नाद असेल.

नाय, नाय आज अनुपचा वाढदिवस नाय. आम्हाला त्याची आठवण आली, याचं कारण म्हणजे विकेंड. कसंय थंडीचे दिवस आहेत. आठवडाभर काम करुन शरीर आणि हृदय दोन्ही थकलेलं असणार. त्यामुळं कित्येकांची पावलं वळणार रिचार्ज स्टोअरकडं. मोबाईलवालं रिचार्ज नाही शेठ… एनर्जी ड्रिंक वालं. यांची नावं प्यासा, कवी, गारवा असली असतात. इथं ३०, ६०, ९० च्या छोट्या टॉपअप पासून १८०, ७५० आणि आज तुझा भाऊ बिल भरणारे… असले स्पेशल पॅकही मिळतात. आता अंदाज आला असेल, तर एकतर गालात हसा पण नाकं मुरडू नका. कारण विषय लय डीप आहे.

तर हा, आपण होतो अनुप जलोटावर. घरात स्पीकर आले आणि त्यावर देवाचं असतंय, म्हणून भजन लावण्यात आलं. तेव्हा पहिल्यांदा अनुप जलोटाचा आवाज ऐकला. आहा, काय ताकद, काय भावना… घरबसल्या मंदिरात नेऊन बसवणारा माणूस. आमचे आजोबा तर त्याच्या भजनांचे इतके फॅन होते की कधीकधी वाटायचं एखादं एकर याच्या नावावर करतात की काय…

भजनं ऐकून असं वाटायचं की, हा गडी कायम भजनंच गात असेल, याला काय परपंचात रस नसेल. मग एक दिवस भावानं बिग बॉसमध्ये एंट्री मारुन आमच्या फ्युजा उडवल्या. त्यादिवशी कळलं या गड्यानं तीन लग्न केलीयेत. पहिलं लव्ह मॅरेज, मग अरेंज मॅरेज, मग तिसरं अरेंज प्लस लव्ह आणि मग गडी चौथ्यांदा प्रेमात पडला. या चौथ्या आशिकीवेळी त्याच्यात आणि प्रेयसीच्या वयात ३७ वर्षांचं अंतर होतं. डोन्ट जज, पर्सनल लाईफ ए. नाय का?

तर हे एवढं ऐकल्यावरही आपल्या डोक्यात फिक्स होतं, अनुपभाई म्हणजे भजनच. कल्पना लय सुंदर असतात, पण सत्य त्याहून सुंदर असतंय हे रिचार्ज स्टोअरमध्ये कळलं.

आमचा एक मित्र एकदम शौकीन, त्यात रेग्युलर तहानलेला… त्यानं एकदा टेबलला बसवलं. तसा लय दंगा सुरू होता, स्पीकरचा दाणदाण आवाज सुरु होता… हा काय ऐवजाची ऑर्डर द्यायला तयार होईना. आमच्या टेबलवरुन मसाला पापडाच्या प्लेटा आणि घड्याळाचे काटे पुढं सरकू लागले आणि गर्दीही. स्पीकर जरा निवांत झाला. यानं एका वेटरला शंभरची कोरी नोट दिली आणि म्हणाला… ‘अनुप जलोटा लाव.’ आता इथं कुठं भजन ऐकायचं म्हणून कपाळावर आठ्या आल्या आणि तेवढ्यात स्पीकरवरुन आवाज आला…

जिंदगी जिने को दी जी मैने,
किस्मत मे लिखा था पी तो पी मैने…
मै ना पिता तो तेरा लिखा गलत हो जाता,
तेरे लिखे को निभाया क्या खता की मैने… 

इंग्लिशमधली वाईब आणि मराठीमधली तार एकाच क्षणी लागली आणि ऐवजाची ऑर्डर दिली गेली. पुढच्या एक दोन तासात काय झालं, ते सईद राहीनं लिहिलंय आणि अनुप जलोटानं गायलंय…

जाम चलने लगे दिल मचलने लगे, चेहरे चेहरे पे रंगे-शराब आ गया…
बात कुछ भी न थी बात इतनी हुई, आज महफ़िल में वो बेनकाब आ गया…

आता कोण बेनकाब आलं होतं? तर ती लाईन वाचल्यावर तुमच्या डोळ्यासमोर जो एकमेव चेहरा आला तोच… पुढं अनुप जलोटा काय गातो… तर..

हाथ में हाथ उसका वो ऐसे लगा, जैसे हाथों में कोई गुलाब आ गया…

विषय हार्ड भावांनो. आता कसंय माणूस बारमध्ये असो, घरात असो, मैफिलीत असो किंवा एकट्यात असो… अनुप जलोटाचा आवाज आपल्याला दर्द देत नाय, तर आपला मूड खुश करतो. आठवडाभर कित्येक लडतरी करुन थकलेल्या मनाला आणि शरीराला हे सांगतो… की बाबा या सगळ्या लडतरी कर, कष्ट कर.. पण स्वतःला थोडासा वेळ दे आणि या वेळात अनुप जलोटा ऐक. कारण त्या आवाजात जलवा आहे, प्रेयसीनं पहिल्यांदा केसातून हात फिरवावा असली तरल फिलिंग आहे… सकाळी उठल्यावर त्याचं भजन कानावर पडावं आणि थकलेल्या रात्री त्याची गझल… ते खरं आयुष्य, बाकी ९ ते ५ काय होत राहील.

लय लचांड लावत नाही.. गाण्याची लिंक देतो… तुमचा विकेंड सुखाचा जावो…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.